अशी असते अंतराळात टॉयलेटची व्यवस्था !!

५ मे, १९६१. अंतराळवीर अॅलन शेफर्ड हे रॉकेटमध्ये बसले आहेत. सर्व गोष्टी सज्ज आहेत, रॉकेट थोड्याच वेळात अवकाशयान आकाशात झेप घेणार आहे. ही घटना ऐतिहासिक ठरणार आहे कारण अंतराळात जाताच अॅलन हे अंतराळात पाऊल जाणारे पहिले अमेरिकन आणि जगातले दुसऱ्या क्रमांकाचे अंतराळवीर ठरणार आहेत.

रॉकेट लाँच होण्यास फक्त १५ मिनिटं बाकी आहेत आणि तेवढ्यात अॅलनने नियंत्रण कक्षात एक विनंती केली “मला जोराची ‘शू’  आली  आहे”. नासाचे शास्त्रज्ञ त्यावेळी अशा काही गोष्टीसाठी अजिबात तयार नव्हते. त्यांना वाटलं होतं की काहीवेळच्या अभियानासाठी थोडीच कुणाला लघुशंका वगैरे लागेल. त्यामुळे शेवटी अॅलन त्या स्पेस शटलमधून बाहेर पडले, बाथरूमला गेले आणि मग अंतराळात झेप घेतली. (कदाचित नासावाल्यांना असंही वाटलं असेल की अॅलन घरून करून आले असतील राव...असो.)

तर मंडळी मुद्दा असा आहे की अंतराळवीर म्हटलं की बऱ्याच कल्पना आपल्या डोक्यात येतात. गुरुत्वाकर्षण नाही, दूर आकाशात, सर्व लहान लहान दिसणार त्याच बरोबर रॉकेटमधल्या गमतीजमती,  गुरुत्वाकर्षण नसल्यामुळं  उडणारी माणसं, उडणारं जेवण, पाणी, कपडे वगैरे वगैरे. 

आता हे सगळं बघून एक प्रश्न पडला की अशा (नसलेल्या) वातावरणात हे लोक ‘शी’ आणि ‘शू’ कसे करत असतील ब्वा? थांबा राव, लगेच गुगल करू नका.. याचं उत्तर आम्ही शोधून काढलंय...

चला तर अंतराळात बाथरूम कसे असतात पाहू...

अॅलनसोबत घडलेल्या घटनेनंतर तंत्रज्ञान आणि अंतराळात राहण्याची वेळ जसजशी वाढत गेली, तसतशा  यात सुधारणा होत गेल्या. मंडळी अंतराळवीरांसाठी विशेष प्रकारचे टॉयलेट असतात. हे टॉयलेट दोन प्रकारचे असून लघुशंका आणि दीर्घशंका या दोन्ही क्रियांसाठी वेगवेगळ्या टॉयलेटची व्यवस्था असते.  


'शी' साठी (स्रोत)

टॉयलेटच्या नावाखाली तिथे एक लहान सीट असते आणि तिच्यावर नेमकं बसावं लागतं. आपल्याकडे टॉयलेटला फ्लश असतो. पण अवकाशयानात 'वॅक्युम क्लीनर' टाईप यंत्र बसवलेलं असतं. जेव्हा अंतराळवीर त्यांची क्रिया पार पाडत असतात तेव्हा गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे ‘ते’ शटल मध्ये पसरू नये म्हणून मशीन ती सर्व घाण ओढून घेण्याचं काम करते. अशाप्रकारे पसरलेला दुर्गंध फिल्टर करून काढला जातो. 


'शु' साठी (स्रोत)

अशाच प्रकारे लघुशंकेसाठी वेगळी व्यवस्था असते. याला 'वेस्ट कलेक्शन सिस्टम' म्हणतात. या सिस्टममधून सर्व मलमूत्र एकाजागी जमा केले जाते. पूर्वी अवकाशयानातलं टॉयलेट हे तांत्रिकदृष्ट्या आजच्यासारखं प्रगत नसल्यानं अनेक अडचणी यायच्या.  पण पुढे यात बरीच सुधारणा झाली. परिणामी स्पेस टॉयलेट हे शटलमध्ये सुरु केलेलं पाहिलं डिव्हाईस ठरलं.

म्हणजे काय तर जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, टॉयलेट इज वेरी इम्पॉर्टन्ट सरजी !!

सबस्क्राईब करा

* indicates required