computer

विज्ञान माहित आहे, पण वैज्ञानिक शोध कसे लिहायचे याचा शोध कुणी लावला हे तुम्हांला नक्कीच माहित नसेल...

मंडळी, इतिहास हा अनेक अज्ञात हिरोंनी भरलेला आहे. काहींचं नावंच कधी इतिहासात लिहिलं गेलं नाही, काहींचं काम इतरांच्या नावावर चिकटलं तर काहींना जाणूनबुजून इतिहासातून वगळण्यात आलं. आता आपल्या जवळचंच उदाहरण बघा ना. शिवकर तळपदे यांनी पहिलं विमान तयार केलं असं म्हटलं जातं. पण आज इतिहासाच्या पुस्तकात ‘राइट बंधु’चं नाव वाचायला मिळतं. आता यात किती तथ्य आहे याच्या खोलात आम्ही जाणार नाही. मुद्दा फक्त एवढाच इतिहासाच्या कागदपत्रांमध्ये नेहमीची वाट सोडून थोड्या आडवाटेने गेलो की असे अनेक अज्ञात हिरो सापडतात. आज अशाच एका ‘अज्ञात हिरो’ला आपण भेटणार आहोत.

 

त्याचं नाव होतं इब्न अल- हेथम (Ibn al-Haytham). तो एक वैज्ञानिक होता. त्याने आपल्या काळाच्या पुढचे अनेक शोध तर लावले पण त्या सोबत एक नवीन पद्धत शोधून काढली जी फार महत्वाची आहे. हा शोध म्हणजे वैज्ञानिक शोध मांडण्याची ‘शास्त्रीय पद्धत’.

मंडळी, न्यूटन असो किंवा आईन्स्टाईन सगळ्यांनी इब्न अल-हेथमची हीच पद्धत वापरली आहे. एखादा शोध लावल्यानंतर तो उलगडून सांगण्यासाठी जी पद्धती वापरली जाते तीच ही पद्धत. म्हटलं तर हा शोध अगदीच किरकोळ आहे पण वैज्ञानिक शोध सादर करताना शोध मांडण्याची ‘शास्त्रीय पद्धत’ महत्वाची असते.

आता त्याला हा शोध कसा लागला किंवा आपण असं म्हणू, त्याने शास्त्रीय पद्धतीने वैज्ञानिक शोध का समजावून सांगितले याचं कारण जाणून घेऊया.

(इब्न अल- हेथमने काढलेली डोळ्याची आकृती)

मंडळी, इब्न अल- हेथमचा जन्म इराक मधील बसरा या ऐतिहासिक शहरात (इसविसन 965- 1040 साली) झाला होता. तो तल्लख बुद्धिमत्तेचा तर होताच पण थोडा विचित्र स्वभावाचा पण होता. त्याला न झेपणारी कामं स्वीकारण्याची सवय होती. त्याच्या या सवयीमुळे पुढे त्याला अनेक अडचणी आल्या.

इब्न अल- हेथमने पहिलं मोठं काम स्वीकारलं ते नाईल नदीवर धरण बांधण्याचं. हे धरण नाईल नदीचा पूर आटोक्यात आणण्यासाठी बांधण्यात येणार होतं. इब्न अल- हेथमच्या लवकरच लक्षात आलं की हे अशक्य आहे. मग त्याने धरण बांधण्याचा नादच सोडला. पुढे त्याला अशा घसघशीत पैसा मिळवून देणारी अनेक कामं मिळाली, पण त्याला आपलं कोणतंच काम तडीस नेता आलं नाही. शिवाय त्याच्याकडे लक्ष ठेवून असलेल्या ‘खलिफा’ त्याच्यावर ‘नाराज’ झाला. त्याला पकडून एका महालात नजर कैदेत ठेवण्यात आलं.

मंडळी, आश्चर्य म्हणजे इब्न अल- हेथमने आपल्या आयुष्यातले महत्वाचे शोध याच कैदेत लावले आहेत. त्याचं झालं असं की, त्याला ठेवण्यात आलेल्या जागी वैज्ञानिक उपकरणे, पुस्तकं आणि महत्वाचं म्हणजे भरपूर वेळ होता. इब्न अल- हेथमला अक्षरशः स्वर्ग मिळाला राव. त्याने लवकरच शोध लावला की प्रकाश हा एका सरळ रेषेत प्रवास करतो, मात्र पाण्यात हाच प्रकाश वक्र होतो (त्याचं वक्रीभवन होतं), त्याने हेही दाखवून दिलं की आरसा काम कसा करतो.

मंडळी, इब्न अल- हेथमने हे शोध फक्त सांगितले नाहीत तर ते आपण कसे शोधले हे त्याने कागदावर दाखवून दिलं. इब्न अल- हेथमची अशी इच्छा होती की त्याने लावलेले शोध इतरांनी करून पाहावेत. त्यामुळे त्याने जे काही शोधलं ते त्याने नोंदवून ठेवलं. आज त्याच्या ४० पेक्षा जास्त पानांच्या नोंदी उपलब्ध आहेत. यात त्याने ग्रहांची गती, प्रकाशाचं विश्लेषण तसेच आर्किटेक्चर आणि इंजिनियरिंग विषयी अनेक महत्वाच्या गोष्टी लिहिल्या आहेत.

इब्न अल- हेथमचे शोध किती महत्वाचे होते याचं उदाहरण द्यायचं झालं तर ‘लिओनार्डो दा विन्चीने त्याचे शोध अभ्यासले होते’ हे उदाहरण पुरेसं ठरेल. इब्न अल- हेथमचं महत्वाचं पुस्तक ‘किताब अल-मनाझीर’ (Book of Optics) त्याच्या मृत्युच्या १०० वर्षांनी लॅटिन मध्ये भाषांतरीत केलं गेलं. हे पुस्तक त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झालं होतं. मग पुढे तो अचानक इतिहासात गडप झाला.

१७ व्या शतकात जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास जोर धरू लागला तेव्हा पुन्हा एकदा इब्न अल- हेथमची आठवण काढण्यात आली. तो पर्यंत इतिहासात त्याचं इब्न अल- हेथम हे नाव बदलून ‘अलहाझेन’ झालं होतं. उच्चार करता येत नसला की जे होतं तेच त्याच्या नावाचं झालं.

मंडळी, अशा या अज्ञात हिरोने विज्ञानाला एक वेगळी दिशा देण्याचं काम केलं.

सबस्क्राईब करा

* indicates required