डोहाळ्यांवरून ओळखा बाळाचे गुण

आयुर्वेद शास्त्रामध्ये गर्भिणी विज्ञानामध्ये डोहाळ्यांना फार महत्त्व दिलेलं आढळतं. शास्त्रात डोहाळ्यांना दौहृद् असं म्हणतात. 

दौहृद् म्हणजे शब्दशः दोन हृदयांची असा अर्थ आहे. या काळात स्त्रीच्या शरीरात तिचं स्वतःचं एक आणि तिच्या होणा-या बाळाचं एक, अशी सामान्यपणे ती दोन हृदयं स्वतःच्या शरिरात बाळगत असल्याने तिच्या या अवस्थेला दौहृदावस्था आणि तिला दौहृदिनी असं संबोधलं जातं.

शास्त्रानुसार मनाचं स्थान हृदय आहे. गर्भिणीमध्ये दोन हृदय असल्यामुळे या अवस्थेत तिच्या आवडीनिवडींमध्ये मोठा बदल झालेला अढळतो. या अवस्थेत गर्भिणी तिच्या वैयक्तिक आवडीनिवडींच्या विपरित गोष्टींची मागणी करते. ही मागणी तिच्या गर्भाच्या हृदयस्थ मनाची मानली जाते आणि यालाच सामान्य भाषेत डोहाळे म्हणतात.

शास्त्रानुसार हे डोहाळे गर्भाच्या इच्छा असल्यामुळे त्या पूर्ण करणं, त्या गर्भाच्या वाढीच्या आणि पोषणाच्या दृष्टीने अत्यावश्यक ठरतं. ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या डोहाळ्यांचं आणि त्यानुसार गर्भाबद्दलच्या काही ठोकताळ्यांबद्दल डाॅक्युमेन्टेशन केलेलं दिसतं. या संबंधीत यादीचा पडताळा कसा घ्यावा हे संशोधकांचं काम आहे पण आपल्यासारख्या सामान्यांसाठी त्यांची माहिती घेणं मनोरंजक व्हावं...

डोहाळ्यांवरून भावी सन्तानाविषयी शास्त्र-ग्रंथांमध्ये पुढील विवेचन केलेलं आहे -

-ज्या स्त्रीला राजाचे (सत्ताधिशाचे) दर्शन करण्याची इच्छा होईल, ती स्त्री धनवान आणि भाग्यवान मुलांना जन्म देते.

-ज्या स्त्रीला शेला, शाल, जरीची कापडं, लोकरीचे कपडे, अलंकार यांची अभिलाषा उत्पन्न होते ती स्त्री अलंकार-प्रिय आणि ललित (नटण्याची आवड असलेली) मुले प्रसवते.

-जी स्त्री देवतांच्या प्रतिमांची, मूर्तींची मागणी करते, तिला देवानुचर अर्थात देवतांच्या पार्षदांसारखी मुले प्राप्त होतात.

-तपस्वींच्या आश्रमात जाण्याची इच्छा होणार्‍या स्त्रीला धर्मशील आणि जितेन्द्रिय संतान  प्राप्त होते.

-स्त्री हिंसक प्रवृत्तीच्या जीवांच्या दर्शनाची इच्छा धरते, तिला हिंसाशील (दुष्ट स्वभावाची) मुले जन्मास येतात.

-जिला घोरपडीचं मांस खाण्याची इच्छा होते तिला झोपाळू आणि ज्या वस्तूच्या मागे लागेल त्या वस्तूच्या प्राप्तीपर्यंत प्रयत्न न सोडणारी मुले होतात.

-जिला गाय, बकरी, मेंढी अशा प्राण्यांचं मांस खाण्याची इच्छा होते, तिला बलवान आणि सर्व दुःख सहन करणारी मुले होतात.

-म्हशीचं मांस खाण्याची इच्छा होणार्‍या  स्त्रीला पराक्रमी, डोळ्यात लालीमा असणारा आणि शरीरावर भरपूर लोम असणारी मुले होतात.

-शूकर अर्थात डुकराचे मांस खाण्याची इच्छा होणारी स्त्री झोपाळू पण शूर मुले प्रसवते.

-हरिणाचं मांस खाण्याची इच्छा धरणारी स्त्री वेगवान आणि वनात फिरण्याची आवड असणार्‍या मुलांना जन्म देते.

-महाशूकर किंवा गवा अथवा वनगायीचे मांस खाण्याची इच्छा झालेल्या स्त्रीस विग्नमनस म्हणजे खिन्न प्रकृतीची मुले होतात.

-तित्तर पक्षाचे मांस खाण्याची इच्छा होणा-या स्त्रीस घाबरट मुले होतात.


 

सबस्क्राईब करा

* indicates required