नाशिकच्या सृष्टी भामरेने जिंकलीय एलन मस्क फाऊंडेशनची आंतरराष्ट्रीय स्पर्धा!!

देशभरात विविध ठिकाणी शिकणारे विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण कौशल्याने जगभर डंका वाजवताना दिसतात. यात विविध प्रोजेक्ट्स तयार करणे किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणे अशा ठिकाणी भारताचे नाव दिसणे ही गोष्ट आनंदाची असते.

आयआयटी मुंबई येथील काही विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठेची अशी कार्बन रिमूव्हल स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा जगातील सर्वात लोकप्रिय उद्योजक एलन मस्क यांच्या निगराणीखाली पार पडली. अशी स्पर्धा जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे कौतुक व्हायलाच पाहिजे. या स्पर्धेत जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील संशोधनासाठी तब्बल१ कोटी ८५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. श्रीनिवास अय्यर, अन्वेशा बॅनर्जी, सृष्टी भामरे, शुभम कुमार असे स्पर्धा जिंकणाऱ्या चार विद्यार्थ्यांची नावे आहेत. यात महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब म्हणजे सृष्टी भामरे महाराष्ट्राची कन्या आहे. कार्बनचे मीठात रूपांतर करणारे तंत्रज्ञान ही टीम तयार करत आहे.

मस्क फाउंडेशनकडून क्सप्राईज कार्बन रिमूव्हल नावाचा १०० मिलियन डॉलरचा प्रकल्प राबवला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही स्पर्धा घेण्यात आली. या विजेत्यांची घोषणा ग्लासगो येथे भरलेल्या COP -26 सस्टेनेबल इनोव्हेशन फोरम या कार्यक्रमात करण्यात आली. या स्पर्धेत जगभरातून १९५ संघ सहभागी झाले होते. यापैकी १० देशांतून २३ विजेत्यांना यात गौरविण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या चार विद्यार्थ्यांचा हा संघ भारतातील एकमेव संघ आहे. या चार विद्यार्थ्यांपैकी सृष्टी भामरे या विद्यार्थिनीने नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील पिंपळकोठे या खेडेगावातून येऊन एवढ्या मोठ्या उंचीवर झेप घेतली आहे.

सृष्टीने बोभाटाशी बोलताना आपला प्रवास आणि स्पर्धा जिंकल्यानंतर असलेली भावना सांगितली आहे. "मी IIT Bombay येथे energy science या शाखेत शिक्षण घेते. प्रथम वर्षापासूनच त्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर 2021 च्या जून महिन्यात या स्पर्धेची संधी चालून आली. सुरुवातीला या विषयाबद्दल अगदी कमी माहिती होती. त्यानंतर research papers आणि संबंधित माहिती वाचायला सुरुवात केली. प्राध्यापक आणि टीम मेंबर्स यांच्या साहाय्याने त्या कल्पनेवर प्रत्यक्षात काम करायला सुरुवात झाली. कॉलेजचे ऑनलाईन सेमिस्टर आणि हा प्रोजेक्ट दोघे सांभाळणे थोडे कठीण झाले होते, परंतु टीमच्या साहाय्याने ते ही शक्य झाले. ही आता पहिली स्टेज पूर्ण झाली. दुसऱ्या स्टेजमध्ये आमची कल्पना प्रत्यक्षात साकारायची आहे. सध्या आनंद तर खुप आहे पण खरे ध्येय हा पूर्ण प्रोजक्ट यशस्वीपणे पार पाडणे हेच आहे."

सृष्टीचे वडील रामकृष्ण भामरे माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत, तर आई जि. प शाळेत शिक्षिका आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातील या मुलीने फक्त तिच्या आई वडिलांचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव जगात गाजवले आहे असे म्हणता येईल.

सृष्टी भामरे आणि तिच्या संपूर्ण संघाला भविष्यात अधिकाधिक नवे शोधकार्य करून पर्यावरण बदल य क्षेत्रात भरीव कार्य करण्यासाठी बोभाटाकडून शुभेच्छा...

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required