computer

दिवसेंदिवस वीज कोसळण्याचे प्रमाण का वाढते आहे?

बाबूजी ज़रा धीरे चलो। बिजली खड़ी यहाँ बिजली खड़ी|| हे गाणं ऐकायला जितकं मजेदार आहे त्याहूनही प्रत्यक्षात वीज कोसळणं हा अनुभव लाखो पटीने भयावह आहे. मान्सूनच्या सुरुवातीच्या दिवसापासून आषाढ महिना संपेपर्यंत विजा कडाडणे आणि कोसळणे हा अपेक्षित निसर्गक्रम आहे. पण गेल्या काही वर्षांत वीज कोसळण्याचे प्रमाण वाढते आहे ही चिंतेची बाब आहे. बोभाटाच्या आजच्या लेखात हाच मुद्दा आपण सविस्तर वाचूया!

दरवर्षी भारतात २५०० लोक वीज अंगावर कोसळल्याने मरण पावतात. सरकारी नोंदीप्रमाणे २०१८ साली २३०० लोकांनी जीव गमावला होता. Lightning Resilient India Campaign ही संस्था भारतातील अशा घटनांचा लेखाजोखा ठेवण्याचा प्रयत्न करते. प्रयत्न करते असे म्हणायचे कारण असे की बिहार -उत्तर प्रदेश सारख्या राज्यात वीज कोसळण्याच्या घटना पुराच्या दरम्यान होत असल्याने काही वेळा खात्रीलायक संख्या कळत नाही. तरीही गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण या वर्षी ३३% जास्त होते.

या घटना आजपर्यंत खुल्या मैदानात किंवा माळावर आणि ग्रामीण भागांत होत होत्या. पण नव्या आकडेवारीनुसार शहरी भागांत वीज कोसळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे असे का होते याचे उत्तर पर्यावरण बदलात दडलेले आहे. स्थानिक तापमानात होणारी वाढ आणि हवेतील बाष्पाचे वाढते प्रमाण या दोन कारणांनी शहरी भागात वीज कोसळण्याचे प्रमाण वाढते आहे. असे असले तरी बर्‍याचशा टॉवरमध्ये वीज निवारण करणारी यंत्रणा ज्याला 'लाईटनींग अ‍ॅरेस्टर' असे म्हणतात ती नसतेच.

वन्यजीवनावरही याचा परिणाम दिसतो आहे. यावर्षी आसाम राज्यात १८ हत्तींचा मृत्यू वीज कोसळल्याने झाल्याची बातमी आहे. आता या संख्येबद्दल काही स्वयंसेवकांनी संशय व्यक्त केला आहे. पण सरकारी नोंदीप्रमाणे हे सर्व मृत्यू वीज कोसळल्यानेच झाले आहेत. अशा घटनांची आगाऊ सूचना देणे सध्यातरी शक्य दिसत नाही. भारतीय शास्त्रज्ञांनी अशी धोक्याची सूचना देणारे अ‍ॅप्लीकेशन बनवले आहे, पण ते पुरेसे नाही. सध्यातरी वीज कोसळण्याची आगाऊ सूचना देणारी यंत्रणा उपलब्ध नाही.

आतापर्यंत आपण वाचली ती सर्वसाधारण माहिती आता आकड्यांच्या स्वरुपात वाचू या.

१९६७ ते २०१९ या काळात ज्या नैसर्गिक आपत्तींमुळे जे जीवीतहानी झाली त्यांची आकडेवारी अशी आहे.
उष्णतेच्या लाटा-१२% , हिमवर्षाव १०%,चक्रीवादळ ९%, भूस्खलन १०% ,पूर १४%,भूकंप ९% साथीचे रोग ३%, आणि वीज कोसळल्याने सर्वाधिक म्हणजे ३३% मृत्यू झाले आहेत.

वीज पडणे म्हणजे ढगातून वीज जमिनीवर कोसळणे. याखेरीज ढगांच्या आत म्हणजे वातावरणातच ही वीज कोसळते आणि जमिनीपर्यंत पोहचत नाही. वीज पडण्याचे असे दोन प्रकार घडत असतात. यापुढची आकडेवारी जर वाचलीत तर कदाचित चिंतेने पुढच्या पावसाळ्यात झोप लागणार नाही.

एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या काळात वर्षभरात एकूण १,३८,६०,३७८ वीज कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यांपैकी ८६,९०,७४७ वेळा त्या वातावरणातच म्हणजे ढगातच झाल्या. ५१,६९,६३१ वेळा वीज जमिनीवर कोसळली.

याच काळात म्हणजे एप्रिल २०१९ ते मार्च २०२० एकूण मनुष्य जीवीतहानीचे आकडे वाचले तर असे कळते की ७१% हानी झाडाखाली उभे असल्याने झाली. २५% लोकांवर थेट वीज कोसळली, तर १ % हानी अप्रत्यक्षरित्या झाली. मृतांमध्ये ७७% शेतकर्‍यांचा समावेश आहे.

या सगळ्याचा अभ्यास करणार्‍या ज्ञानशाखेला Fulminology असे नाव आहे आणि हे सगळे आकडे वाचल्यावर तुमच्या मनात जर भयगंड निर्माण झाला तर त्याला 'अ‍ॅस्ट्राफोबीया' असे शास्त्रीय नाव आहे. कोणत्याही भयावर ज्ञानाने विजय मिळवता येतो म्हणून 'अ‍ॅस्ट्राफोबीया' टाळण्यासाठी सोबत दिलेल्या चित्राचा जरूर अभ्यास करा.

सबस्क्राईब करा

* indicates required