computer

एडिसनपेक्षा जास्त शोध आपल्या नावावर असलेला भारतीय शास्त्रज्ञ !!

गुरतेज संधू हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं नसणार, पण थॉमस अल्वा एडिसन हे नाव आणि त्याने लावलेले शोध तोंडपाठ असतील. तुम्हाला माहित आहे का गुरतेज संधू या अज्ञात शास्त्रज्ञाच्या नावावर एडिसन पेक्षा जास्त शोध आहेत ?

एडिसनच्या नावावर १०८४ शोध आहेत तर गुरतेज संधूच्या नावावर १३२५. जगातल्या सर्वात विपुल संशोधन केलेल्या शास्त्रज्ञांच्या यादीत या भारतीयाचं स्थान ७ व्या क्रमांकावर आहे.

गुरतेज संधू हे आज ५८ वर्षांचे आहेत. ते अमेरिकेच्या आयडाहो राज्यात राहतात. ते मायक्रॉन टेक्नोलॉजीचे उपाध्यक्ष आहेत, याखेरीज ते स्वतंत्रपणे संशोधक म्हणून पण काम करतात.

संधू यांचे आईवडील रसायनशास्त्रात होते. कॉलेजनंतर त्यांच्यासमोर वैद्यकशास्त्रात जाण्याचा मार्ग होता, पण त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर “मला इंजिनियरिंग करायचे होते, कारण तिथे रक्ताशी संबंध येत नाही.”

अशाप्रकारे आपल्या इंजिनियरिंगकडे ते वळले. त्यांनी आयआयटी दिल्ली येथून इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंग मध्ये पदवी घेतली आणि नॉर्थ कॅरोलायना विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पीएचडी मिळवली. हे वर्ष होतं १९९०.

शिक्षण झाल्यावर नोकरी शोधण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्याकडे भरपूर पर्याय होते, पण त्यांनी मायक्रॉन टेक्नोलॉजी सारख्या स्टार्टअप कंपनीची निवड केली. मायक्रॉन टेक्नोलॉजीची निवड करण्यामागचं कारण असं की या लहानशा कंपनीत राहून त्यांना आपल्या कल्पनेप्रमाणे काम करता येणार होतं.

मायक्रॉन टेक्नोलॉजीमध्ये काम करतानाच त्यांनी आयुष्यातला पहिला शोध लावला. ते Moore's Law या नावाने प्रसिद्ध असलेल्या नियमावर काम करत होते. या नियमाप्रमाणे तंत्रज्ञानामुळे एका सर्किटमधल्या ट्रांझिस्टर्सची संख्या प्रत्येक वर्षाला दुप्पट होत जाईल.

गुरतेज संधू यांनी या नियमाचा आधार घेऊन एका चीपमध्ये जास्तीतजास्त किती मेमरी युनिट्स बसू शकतात हे शोधून काढलं. हा शोध लागल्यानंतर पुढच्या काळात चीप उत्पादकांनी या संशोधनाचा वापर सुरु केला आणि त्याचा त्यांना फायदा झाला.

गुरतेज संधुंच्या एका संशोधनात त्यांनी मायक्रोचिप्सशी ऑक्सिजनचा संपर्क येऊ न देता चीपला टायटेनियमचा मुलामा देण्याची कल्पना मांडली. या संशोधनातून मायक्रोचिप्स खराब होण्यापासून वाचू लागली. आज जवळजवळ सगळेच मायक्रोचिप्स उत्पादक या पद्धतीचा अवलंब करतात.

यानंतर गुरतेज संधूंनी असे अनेक लहानसहान शोध लावले. यातले बरेच मायक्रॉन कंपनीच्या नावावर आहेत. शेवटी हे शोध संधुंचे असल्याकारणाने मिळणारा आर्थिक फायदा वाटला जातो.

गुरतेज संधू यांनी artificial intelligence, सेल्फ ड्रायव्हिंग कार, बिग डेटा, आणि अशा अनेक गोष्टींवर संशोधन केलंय. त्यांच्या प्रत्येक संशोधनातून त्यांच्या नावावर असलेले शोध वाढतच गेलेत. दुर्दैवाने भारताला त्यांना कोणी फारसं ओळखत नाही. हा लेख वाचून तुम्हाला गुरतेज संधू हे नाव नक्कीच लक्षात राहील यात शंका नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required