computer

प्लास्टिकचा बंदोबस्त करण्यासाठी या भारतीयाने शोधलेली कल्पना आज संपूर्ण जग वापरत आहे !!

पर्यावरणाचा प्रश्न जेव्हा जेव्हा समोर येतो तेव्हा तेव्हा सर्वात आधी प्लास्टिक प्रश्नावर तोडगा काढण्याची गरज भासते. या समस्येवर आजवर वेगवेगळे उपाय शोधले गेले आहेत. एका भारतीय शास्त्रज्ञानेही या समस्येवर विचार केला आणि त्यांनी जी कल्पना शोधून काढली ती आज जगभर वापरली जात आहे.

आम्ही शास्त्रज्ञ राजगोपालन वासुदेवन उर्फ आर वासुदेवन यांच्याबद्दल बोलत आहोत. त्यांनी प्लास्टिकपोसून रस्ते तयार करण्याची एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. त्यांच्या संशोधनासाठी त्यांना २०१८ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.  

त्यांचा शोध काय आहे?

ही कल्पना प्लास्टिकचा कचरा साफ करण्यासाठी शोधण्यात आलेली नसून खड्डे बुजवण्यासाठी शोधण्यात आली आहे. आर वासुदेवन यांनी ओळखलं की जर रस्ते रिसायकल केलेल्या प्लास्टिकपासून तयार केले तर खड्ड्यांची समस्या सुटेल. अर्थातच प्लास्टिकची समस्याही सुटेल.

आपण रस्ते बनवण्यासाठी जे डांबर वापरतो त्यात त्यांनी मोठ्याप्रमाणात ‘पॉलिमराइज्ड मिक्स’ (प्लास्टिक एकत्र) एकत्र केलं. १ किलो खडी आणि ५० ग्राम डांबरमध्ये १/१० प्रमाणातील पॉलिमराइज्ड मिक्स असं हे प्रमाण होतं. याचा फायदा असा की प्लास्टिकमुळे एकूण परिणाम मूल्य आणि लवचिकता वाढते. याप्रकारे रस्ता तयार केल्यास रस्ता दुप्पट मजबूत होतो, खड्डे पडत नाहीत, लवकर झीज होत नाही, पावसाच्या पाण्याने रस्त्याचं नुकसान होत नाही.

आर वासुदेवन यांनी शोधलेली ही कल्पना आता गावांमध्ये, शहरांमध्ये एवढंच नाही तर ‘भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण’द्वारे वापरली जात आहे. मुख्यत्वे शहरांना जोडणारे रस्ते हे यापद्धतीने तयार केले जात आहेत. परिणामी जास्तीतजास्त प्लास्टिक कचरा वापरला जात आहे. या कामात लोकांनी सहभागी व्हावं आणि त्यांनी श्रमदाना करावं यासाठी आवाहन करण्यात आलं होतं. या प्रयत्नातून तब्बल १८,००० किलो प्लास्टिक कचरा गोळा झाला आहे.

आज भारतात जवळजवळ १,००,००० किलोमीटर लांब रस्ता हा प्लास्टिकने तयार केलेला आहे. ही संख्या  आणखी वाढत आहे. भारतासोबतच ही कल्पना आता जगभर जाऊन पोहोचली आहे. इंडोनेशिया, बाली, सुराबाया, बेकसी, मक्कासार, सोलो या भागांमध्ये आर वासुदेवन यांच्या कल्पनेचा आधार घेऊन रस्ते तयार करण्यात आले आहेत. नुकतंच वोल्करवेसल्स या डच कंपनीने नेदार्लंडच्या ईशान्य भागात प्लास्टिकच्या वापरातून रस्ते तयार केले आहेत. भविष्यात अमेरिकेत सुद्धा या प्रकारचे रस्ते असतील. यासाठी अमेरिकेकडून १६ लाख पाऊंडची गुंतवणूक केली जाणार आहे.

तर मंडळी, एका भारतीयाने मांडलेली एक क्रांतिकारी कल्पना आज संपूर्ण जगात स्वीकारली  जात आहे. आपली महापालिकाही या कल्पनेचा स्वीकार करेल अशी आपण आशा करू.