computer

इंजीनियरींग करणार्‍या प्रत्येक मुलीने पी के थ्रेसीआची प्रेरणादायी जीवनगाथा वाचायलाच हवी

इन्फोसिसच्या अध्यक्षा सुधा मूर्तींपासून ते पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नुयींपर्यंत अनेक भारतीय स्त्रियांनी खास पुरुषी समजल्या जाणाऱ्या अशा क्षेत्रातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज या भारतीय स्त्रियांचे यश पाहून आपले डोळे दिपून जातात. या यशाला त्यांच्या कुटुंबीयांपासून ते भारतात स्त्री शिक्षण आणि स्त्री सबलीकरणासाठी झटणाऱ्या हजारो ज्ञात-अज्ञात लोकांचा हातभार लागला आहे यात वादच नाही. इंजिनियरिंग हे क्षेत्र तसे आजही पुरुषी समजले जाते. मुली इंजिनियरिंगसाठी प्रवेश घेतात तेव्हा कंप्युटर किंवा सॉफ्टवेअर इंजिनियरिंगलाच जास्त प्राधान्य दिले जाते. आजच्या काळातही इंजिनियरिंगसाठी प्रवेश घेणाऱ्या मुलींचे एकूण प्रमाण फक्त २८.६%इतके आहे. ऑटोमोबाइल, बांधकाम अशा क्षेत्रापासून मुली आजही दूरच राहतात. पण ज्याकाळी स्त्री शिक्षणही ही बाबच समाजात दुरापास्त समजली जात होती त्याकाळी तीन मुलींनी इंजीरीयरिंगची पदवी प्राप्त करून नेत्रदीपक कामगिरी करून दाखवली होती. आपला समाज बालविवाह आणि पडदापद्धती अशा विचित्र प्रथांच्या चिखलात रुतला होता त्याकाळी पी. के. थ्रेसिया यांनी पहिली इंजिनियर होण्याचा मान तर मिळवलेलाच, पण पीडब्ल्यूडीसारख्या सरकारी खात्यात नोकरी करून भारतातील पायाभूत सुविधांचा पाया रचण्यात मोठे योगदान दिले होते. काळाच्या ओघात स्त्रियांनी आणि भारतानेही मोठी झेप घेतली पण या प्रगतीचा पाया रचणाऱ्या पी. के. थ्रेसियाकडे मात्र दुर्लक्ष झाले.

मद्रास युनिव्हर्सिटीच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, गुंडी(सीइजी) मधून ललिता, लेलम्मा जॉर्ज आणि पी. के. थेर्सिया अशा तिघींनी १९४४ साली आपले इंजिनियरिंग पूर्ण केले. इंजिनियरिंगमध्ये पदवी पूर्ण करणाऱ्या या तिघीही पहिल्या भारतीय मुली होत्या. थेर्सियाने पदवी घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्यात विभागीय त्या अधिकारी म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर १९७१ साली तिला केरळ राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात मुख्य अभियंता पदावर बढती मिळाली. एका राज्याची मुख्य अभियंता होण्यापर्यंत मजल गाठणारी ती पहिली भारतीयच नव्हे, तर पहिली आशियाई महिला होती. पुढची आठ वर्षे तिने यशस्वीपणे हा पदभार सांभाळला.

केरळच्या त्रिसूर जिल्ह्यात १२ मार्च १९२४ रोजी एका ख्रिश्चन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील काक्काप्पन हे एक सामान्य शेतकरी होते. कात्तूर येथील सेंट मेरीज हायस्कूल मधून थेर्सियांनी माध्यमिक आणि पदवी शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनापासूनच थेर्सिया एक हुशार विद्यार्थिनी होत्या. अगदी पदवी शिक्षणापर्यंत त्यांच्यातील ही चमक थोडीही फिकी पडली नाही

आपल्या मुलीने इंजिनियर व्हावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. जिथे अनेक लोक मुलींना शाळेत जाण्याचीही परवानगी देत नव्हते तिथे काक्काप्पन आपल्या मुलीचे इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी ते वाटेल ते कष्ट उपसायला तयार होते. त्याकाळी केरळमध्ये मुलींना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जात नव्हता हे माहीत असूनही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. त्यांना चेन्नईच्या सिईजी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. थेर्सियांनी यशस्वीरित्या इंजिनियरिंग पूर्ण केले, पण आपल्या मुलीचे हे यश पाहण्यासाठी तिचे वडील जिंवत राहिले नव्हते. वडिलांच्या पश्चात थेर्सियांच्या आई कुंचालीची यांने कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली.

स्त्रियांवरील सामाजिक बंधनाचा तिच्या कुटुंबीयांनी कधीच बाऊ केला नाही. उलट ही सगळी बंधने झुगारून आवडत्या क्षेत्रात काम करण्यास त्यांनीच प्रोत्साहित केले. थेर्सियांना मुख्य अभियंता म्हणून बढती मिळाली तेव्हा एका मल्याळम वृत्तपत्राने त्यांचा जाहीर सत्कार आयोजित केला होता, यावेळी बोलताना थेर्सीया म्हणाल्या होत्या, “तीन महिने काम केल्यानंतर मला कळाले की इंजिनियरचे काम महिला समजतात तितके अवघड नसते,” त्यांच्या या मनोगतामुळे अनेक महिलांमध्ये या क्षेत्रात येण्याची मनीषा निर्माण झाली नसली तरच नवल!

पदवी पूर्ण करून थेर्सिया पीडब्ल्यूडीमध्ये रुजू झाल्या आणि त्यांना टी. बी. सॅनेटोरियमच्या बांधकामावर सहाय्यक बांधकाम अभियंता म्हणून काम पाहावे लागले. केरळच्या मुलाकुन्नाथुकावु येथे हा सॅनेटोरियम बांधले गेले आहे. पुढे १९५६ साली कार्यकारी अभियंता म्हणून एर्नाकुलम येथे त्यांची बदली करण्यात आली.

मुख्य अभियंता म्हणून काम करत असताना थेर्सियांनी स्वतःच्या कार्यकाळात ३५ नवे पूल बांधून तयार केले. या काळात तिने दरवर्षी एक नवा पूल बांधून पूर्ण केला. अनेक ठिकाणच्या रस्त्यांचे काम मार्गी लावले. अनेक ठिकाणी सरकारी हॉस्पिटलच्या बांधकामाचे कामही त्यांच्याच देखरेखीखाली पूर्ण झाले. उदाहरणच द्यायचे झाल्यास कोझिकोड मेडिकल कॉलेजशी सलंग्न असणारे वुमेन्स आणि चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे देता येईल. या हॉस्पिटलचे बांधकाम थेर्सियांच्याच अखत्यारीत पूर्ण झाले. त्यांनी अनेक सरकारी शाळा आणि दवाखान्यांचे बांधकाम स्वतःच्या कार्यकाळातच पूर्ण करून घेतले.

थेर्सिया फक्त वरून येणारे आदेश पाळणे या प्रकारातील अधिकारी नव्हत्या, तर त्या काम करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रयोगशील राहण्याचे महत्त्व त्यांना चांगले ठाऊक होते. त्यांनी केरळमधील रस्त्यांचे बांधकाम करत असताना रबरयुक्त डांबराचा वापर करण्याचा प्रयोग करून पहिला. त्यांच्या अशा नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे त्यांना इंडियन रोड कॉंग्रेसच्या विशिष्टता आणि मानके समितीची सक्रीय सदस्य होण्याचा बहुमान प्राप्त झाला.
 

आपल्या कामात अडथळे नको, मन लावून काम करता यावे म्हणून थेर्सियांनी आजन्म अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. स्वतःला त्यांनी इतके झोकून दिले होते की इतर कुठल्या गोष्टींची त्यांना जाणीवही होत नव्हती. १९७९ मध्ये त्या सरकारी सेवेतून निवृत्त झाली. सुमारे ३४ वर्षे त्यांनी केरळ राज्याच्या पीडब्ल्यूडी विभागात इमाने-इतबारे सेवा बजावली. सरकारी सेवेतून निवृत्त होताच त्यांनी स्वतःची कंपनी सुरु केली. या कंपनीचे नाव होते “ताज इंजिनियर्स.” निवृत्तीनंतरही त्यांचे काम थांबले नव्हते हेच यावरून लक्षात येते.

ललिता, लीलम्मा आणि पीके थेर्सिया या तिघींनी इंजीयारिंग क्षेत्रातील वाट पहिल्यांदा चोखाळली. त्यानंतर इंजिनियरिंग या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन थोडा बदलला. कर्मठ आणि परंपरागत वातावरणातही या तिघींनी जो रस्ता निवडला तो निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. त्याकाळातले या तिघींचे धाडस आजच्या काळातही प्रेरणेचा दीपस्तंभ बनून उजाळा देत राहील.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required