computer

२५००वर्षांचा इस्त्रीचा इतिहास!! काच, दगड, लाकूड, धातू, गॅस, वीज.. अरे, इस्त्री करण्यासाठी लोक काय काय वापरायचे!!

आजच्या प्रेझेंटेशनच्या जमान्यात 'एक नूर आदमी और दस नूर कपडा' हे खरं आहे. धुतल्यावर इस्त्री न करता सुरकुतलेले कपडे तसेच घालून बाहेर जा बरं! किमान चार लोकांच्या 'टोचणाऱ्या'(!) नजरा तुमच्याकडे वळतील. इस्त्रीचे कपडे वापरणं किंवा कपड्यांना इस्त्री करणं ही केवळ फॅशन नाही, ती एक शतकानुशतकं चालत आलेली परंपरा आहे. आणि हे आजचं नाही, जगभरात पूर्वीपासूनच व्यक्ती कशी दिसते आणि तिचे कपडे कसे आहेत यावरून तिचा दर्जा ठरवण्याची पद्धत आहे.

इसवी सन पूर्व चारशेमध्ये ग्रीक लोक गॉफरिंग आयर्न नावाचं उपकरण वापरत. ही इस्त्री म्हणजे लाटण्यासारखा असणारा दंडगोल होता. वापरण्यापूर्वी हा दंडगोल तापवला जाई. रोमन लोकांकडे आधुनिक इस्त्रीसारखी दिसणारी उपकरणं इस्त्री करण्यासाठी वापरली जात. यापैकी एक म्हणजे हँड मँगल. यामध्ये धातूच्या सपाट पृष्ठभागाने कपड्यावर मारून त्यावरच्या सुरकुत्या घालवल्या जात. चीनमध्ये इस्त्री करण्यासाठी लोक पॅन आयर्न नावाच्या इस्त्रीचा वापर करत. ही इस्त्री मोठ्या आकाराच्या आईस्क्रीमच्या चमच्याप्रमाणे दिसत असे. यामध्ये गरम कोळसा किंवा तापलेली वाळू ठेवण्यासाठी तळाशी एक कप्पा असे. यामुळे इस्त्रीचा तळ गरम राही आणि त्याच्या साह्याने कापडावरील सुरकुत्या नाहीशा करता येत.

पहिल्या शतकात चिनी लोक कपड्यांना इस्त्री करण्यासाठी गरम धातूचा वापर करत असत. त्यानंतर इस्त्रीमध्ये आणि इस्त्री करण्याच्या पद्धतीमध्ये अनेक बदल होत गेले आणि आधुनिक अवतार असलेली विजेची इस्त्री वापरात आली. इस्त्रीचा शोध लावण्याचं श्रेय कुण्या एका व्यक्तीला किंवा संस्कृतीला देता येत नाही. याचं कारण अनेक देशांमध्ये अनेक संस्कृतींमध्ये इस्त्रीच्या साहाय्याने कपड्यांच्या सुरकुत्या घालवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात होत्या. याव्यतिरिक्त इस्त्रीचा उपयोग कपड्यांवरील जीवाणू, रोगकारक कीटक इत्यादी नष्ट होण्यासाठी केला जात असे.

पूर्वीच्या काळी श्रीमंत लोक, सरदार, उमराव यांच्याकडे इस्त्री करण्याचं काम नोकरांकडे असे. बहुधा नोकराण्या हे काम करत. केवळ कपडेच नाही, तर टेबलक्लॉथ, नॅपकिन्स, चादरी हेही इस्त्री करून नीटनेटके ठेवण्याचं काम या नोकराण्यांकडे असे. शिवाय खास, महाग कपडे इस्त्रीसाठी जास्त विश्वासू, अनुभवी, आणि इस्त्री करण्यात कुशल अशा नोकराणीकडे जात. सर्वसामान्य लोक रोजच्या वापरासाठी इस्त्री केलेले कपडे वापरत नसत. फक्त चर्चमध्ये जाताना घालायचे कपडे किंवा विशेष प्रसंगी घालायचे कपडे इस्त्री करून वापरले जात.

चीनी, रोमन लोक कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवण्यासाठी काच, लाकूड, दगड यांचा वापर करत. या गोष्टींचा वापर पुढेही एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत सुरू राहिला. काचेच्या इस्त्रीमध्ये मशरूमच्या आकाराचे स्मूथर्स असत आणि त्यांना तापवण्यासाठी वाफेजवळ ठेवलं जाई. अशा प्रकारच्या इस्त्र्या त्याकाळी लूटमार करणाऱ्या स्त्रियांच्या थडग्यातही आढळल्या आहेत. त्यांना ओलसर करण्यासाठी पाण्याचा वापर केला गेला असेल. पण बहुधा त्या गरम केल्या जात नसत. इंग्लंड आणि इतर ठिकाणी धातूच्या इस्त्रीची ओळख होऊनदेखील एकोणिसाव्या शतकापर्यंत हीच पद्धत रुढ होती. कारण ते छोट्या कपड्यांसाठी वापरायला अतिशय सोयीचं होतं. या कामांसाठी इस्त्री गरम करणं किंवा कपड्याखाली चादर अंथरणं गरजेचं नसे.

मध्ययुगाच्या शेवटी लोहारांनी साध्या सपाट इस्त्रीच्या यशस्वी निर्मितीस सुरुवात केली. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात इस्त्रीचे दोन प्रकार प्रचलित होते त्यापैकी एक म्हणजे फ्लॅट आयर्न (सपाट तळाची इस्त्री) किंवा सॅड आयर्न आणि दुसरी म्हणजे बॉक्स आयर्न.

सॅड आयर्न मध्ये सॅड हा शब्द सॉलिड या अर्थी वापरलेला आहे. यामध्ये कास्ट आयर्नचे तुकडे इस्त्री म्हणून वापरले जात आणि ते चूल किंवा फायरप्लेस अशा जागी विस्तवाजवळ टेकूच्या आधाराने तापवण्यासाठी उभे करून ठेवले जात. काही इस्त्र्यांची पकड धातूची असे. त्यामुळे तापल्यावर त्यांना एका पॅडमध्ये किंवा जाडजूड कापडाच्या चिंधीमध्ये पकडावं लागे. काहींना लाकडाची हँडल्स होती. या प्रकारची इस्त्री वापरण्यासाठी अनुभवी कुशल व्यक्तीची गरज असे. ही इस्त्री विशिष्ट तापमानाला तापवावी लागे, जेणेकरून तापमान तर पुरेसे असेल पण त्यावर काजळी न धरता पृष्ठभाग स्वच्छ राहील. यासाठी एका वेळी दोन इस्त्र्या वापरल्या जात असत- एक प्रत्यक्ष वापरासाठी आणि दुसरी तापवण्यासाठी. इस्त्री पुरेशी तापली आहे की नाही हे बघण्यासाठी इस्त्रीच्या तापलेल्या बाजूवर थुंकत. थुंकीची जितकी चटकन् वाफ होईल तितकी इस्त्री तापलेली. हे काम करताना काळजी न घेतल्याने महागडे कपडे जळणं किंवा फाटणं यासारख्या गोष्टीही घडत असत. त्यासाठी शिक्षा म्हणून थेट कामावरून कमी केलं जात असे. त्यावेळच्या हाउसकीपिंगच्या पुस्तकांमध्ये यासाठी घ्यावयाची काळजी आणि सूचना दिलेल्या असत.

बॉक्स आयर्न ही इस्त्री हाताळायला तुलनेने सोपी, वजनाला हलकी होती. या इस्त्रीच्या तळाकडच्या भागात फुललेला कोळसा भरला जाई. त्यामुळे ही इस्त्री जास्त काळ गरम राही. या इस्त्रीचा वापर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर केला गेला. यात कोळशाचा धूर होण्यासाठी हवेची छिद्रं आणि बिजागऱ्या असलेली झाकणं असत. या इस्त्र्या त्यांच्या स्टॅन्डसह मिळत.
काही विशिष्ट कामांसाठी खास तयार केलेल्या इस्त्र्या असत. चुण्या, फ्रिल असलेल्या कपड्यांसाठी क्रिम्पिंग(सुरकुत्या अधिक स्पष्ट आणि उठून दिसण्यासाठी), गॉफरिंग(लेसच्या जवळ असलेल्या चुण्या स्पष्ट दिसण्यासाठी), फ्ल्यूटिंग(फ्रिलमुळे तयार होणारा पॅटर्न कायम राखण्यासाठी), रुशिंग(लाटांसारखा परिणाम निर्माण करण्यासाठी) इत्यादी कामं करण्याची सेटिंग्ज असलेल्या इस्त्र्या वापरल्या जात. याखेरीज शिंप्यांकडे स्वतःच्या टेलर्स आयर्न असत. त्या उघड्या शिवणी प्रेस करण्यासाठी वापरत. त्यांच्या हंसाच्या मानेसारखा आकार असलेल्या मुठी आणि ओल्या कापडावर ही गरम इस्त्री फिरवताना येणारा हिस्स्स असा आवाज यामुळे 'गीज' म्हणत.

विजेविना इस्त्री करणं कष्टाचं काम होतं, कारण त्यांची काळजी तितकीच घ्यावी लागायची. या इस्त्र्यांवर गंज चढू नये म्हणून नियमितपणे त्यावर ग्रीसचा हलकासा थर द्यावा लागे. शिवाय स्टार्च केलेल्या कपड्यांना इस्त्री चिकटू नये म्हणून मेण लावावं लागे. इस्त्रीला सँड पेपरच्या साहाय्याने पॉलिश करावं लागे.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत गॅस उपलब्ध झाला आणि गॅसवर चालणारी इस्त्री अस्तित्वात आली. १८७४ मध्ये या इस्त्रीला सर्वप्रथम पेटंट मिळालं. त्यावेळी घरोघरी गॅस वाहून नेणाऱ्या लाईन्स होत्या. गॅसवर चालणारी इस्त्री या पाइपलाईनला जोडून इस्त्री करता येत असे. या इस्त्रीमध्ये एक बर्नर होता. त्याला गॅसचा पुरवठा केला जाई. बर्नरला आगकाडीच्या साहाय्याने पेटवल्यावर इस्त्री गरम होत असे. मात्र या इस्त्रीची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे कधीकधी गॅस लीक होत असे किंवा इस्त्री खूप तापत असे. असं असलं तरी सॅड आयर्नच्या तुलनेत गॅसवर चालणारी इस्त्री वजनाला हलकी असल्यामुळे कित्येकांना सोयीची वाटत असे. त्यानंतर लवकरच इतर इंधनांवर चालणाऱ्या इस्त्र्या बाजारात आल्या. या प्रकारची इस्त्री गरम करण्यासाठी तेल, गॅसोलीन, पॅराफीन आणि इतर इंधनांचा वापर केला जाई.

पुढे विजेवर चालणाऱ्या इस्त्रीचा शोध लागला. ही इस्त्री हेन्री सीलीने शोधून काढली. काढता घालता येईल अशा वायरमधून या इस्त्रीला विजेचा प्रवाह जोडला जाई. त्यामुळे इस्त्रीच्या आतील कॉइल्स गरम होत. पण या इस्त्रीत त्या काळातल्या इतर इस्त्र्यांप्रमाणेच इलेक्ट्रिक कॉर्ड्स नव्हत्या. ही इस्त्री स्टॅंडवर गरम केली जाई, पण त्यात एक मोठा अडथळा होता. ही इस्त्री स्टॅंडवर हळूहळू गरम होत असे, पण थंड होताना मात्र लवकर काम करतानाच होत असे. त्यामुळे ती पुन्हापुन्हा गरम करावी लागे.

शतक संपतासंपता इस्त्रीमध्ये अनेक सुधारणा झाल्या. १९०३ मध्ये इस्त्री इलेक्ट्रिक कॉर्डला जोडण्यात आली. तर १९२० मध्ये शुद्ध चांदी वापरून तयार केलेली स्वयंचलित उष्णता नियंत्रित करणारी कॉर्ड अस्तित्वात आली. पुढे तापमान नियंत्रणासाठी थर्मोस्टॅटही वापरले जाऊ लागले. १९२६ मध्ये वाफेवर चालणाऱ्या इस्त्रीचा शोध लागला. यामुळे कडक, कोरड्या कपड्यांनाही लीलया इस्त्री करता येऊ लागली.

इतर अनेक उपकरणांप्रमाणेच इस्त्रीही आता नव्या रूपात समोर आली आहे. आजही ती सेवेसी तत्पर आहे. 'आमच्या ह्यांना घरीच केलेली इस्त्री लागते' असं ठसक्यात सांगणारी एखादी गृहिणी असो वा घरोघरी इस्त्रीचे कपडे पोचवणारा भय्या; इस्त्री आता सगळ्यांच्या खऱ्या अर्थाने मुठीत आली आहे.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required