computer

इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा : पाहा कसे सोडले २० उपग्रह आकाशात

आज दिनांक २२जून २०१६रोजी इस्त्रोने एकाच वेळी २० उपग्रह आकाशात सोडण्याचं एक रेकॉर्ड केलेय. PSLV  C-34 [पोलार सॅटेलाईट लॉंच व्हेइकल] या आकाशात उपग्रह सोडणार्‍या यंत्रणेने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन सेंटरमधून आज भारतासाठी महत्वाचा असा कार्टोसॅट-२ आणि इतर देशांचे काही, असे मिळून एकूण २० उपग्रह एकदम अवकाशात सोडले आहेत. PSLV  या प्रणालीद्वारे भारताने आजवर अनेक भारतीय व अभारतीय उपग्रहांचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले आहे. 

भारताने प्रथमच दहाहून अधिक उपग्रह एकाच रॉकेटमधून सोडण्याचा प्रयोग केला आहे. यापूर्वी २००८साली दहा उपग्रह PSLV  यंत्रणेद्वारे सोडण्यात आले होते. या मोहिमेत सामील असलेले उपग्रह-

१. कार्टोसॅट-२ (इस्त्रो, भारत)

२. स्वयम - (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,पुणे, भारत)

३. सत्यभामासॅट -(सत्यभामा युनिव्हर्सिटी, चेन्नई, भारत)

४.  लापॅन-ए३ [LAPAN-A3]-  (इंडोनेशिया)

५.  ब्रिओस[Brios]- (जर्मनी)

६. M3MSat - (कॅनडा)

७.  GHSSat-D (कॅनडा)

८. स्कायसॅट जेन-२ (टेरा बे्ला, गुगल, अमेरिका)

९. १२ डव सॅटेलाईट्स -(द प्लॅनेट  लॅब्ज, अमेरिका)

 

ही मोहिम बर्‍याच कारणांसाठी एक महत्वाची आहे. एकतर या वेळेस प्रथमच विद्यार्थ्यांनी बनवलेले दोन उपग्रह अवकाशात सोडण्यात येत आहेत. या वीस उपग्रहांचं मिळून वजन १२८८किलो आहे. त्यातला मोठा भाग म्हणजे कार्टोसॅट -२ हा ७२७.५किलो वजनाचा आहे.  तर स्वयम हा सर्वात हलका म्हणजे १ किलो वजनाचा आहे. २६ मिनिटे ३० सेकंदाच्या कालावधीत कार्टोसॅट-२ सर्वात आधी तर १२ डव्ह  सॅटेलाईट्स सर्वात शेवटी अशा क्रमाने हे उपग्रह अवकाशात सोडले जाणार होते. 

 पाहूयात या कार्यक्रमाची तयारी करतानाची काही क्षणचित्रे:-

 

PSLV C-34 ची बांधणी होत असताना

वाहन बांधणी विभागात PSLV C-34ला मोटर्स जोडण्यात येत असताना

शेजारी उभ्या असलेल्या माणसांचे आकार पाहता हे धूड किती प्रचंड आहे याची कल्पना येते.

PSLV C-34 चा पहिला टप्पा पूर्णत्वास जात असताना

PSLV C-34 च्या दुसर्‍या टप्प्याची बांधणी होत असताना

PSLV C-34 मध्ये २० अवकाशयाने जोडली जात असताना..

वरच्या फोटोमध्ये उष्णतारोधक असे यानाचे दोन भागही दिसत आहेत.  इतर फोटोज पाहिल्यानंतर मधोमध दिसणारे यंत्र म्हणजे भारताचा नियोजित उपग्रह कार्टोसॅट-२ आहे असे वाटते. 

२० अवकाशयाने आत ठेवून PSLV C-34 चे उष्णतारोधक कवच बंद केल्यानंतर..

आपल्या पूर्ण तयारीनिशी PSLV C-34

शाळेत शिकल्याप्रमाणे नाकाच्या भागात सर्व उपग्रह व खालच्या भागांत इंधन असते. हे खालचे टप्पे प्रवासात काही विशिष्ट किलोमीटर्स नंतर एक-एक करून यानापासून वेगळे केले जातात.

PSLV C-34 वाहनबांधणी विभागातून सेकंड लॉंचपॅडकडे नेले जात असताना

वरचा फोटो पाहिलात तर असं अवकाशयान बनवण्यासाठीच्या इमारतीची भव्यता लक्षात येईल. पहिल्या चित्रात  इमारतीच्या उभ्या दरवाजांमधून PSLV C-34 बाहेर येताना तर दुसर्‍या चित्रात दरवाजे बंद असतानाची इमारत दिसते. दुसर्‍या चित्रात रूळांवरून अवकाशयाने कशी नेली जातात याचीही कल्पना येते.

सेकंड लॉंचपॅडवर पोटातल्या २० उपग्रहांसह उड्डाणासाठी सज्ज PSLV C-34

भारताचा उपग्रह कार्टोसॅट-२

हे आहे कार्टोसॅट-२ चे बंगळुरूमधल्या प्रयोगशाळेतले छायाचित्र. हा कार्टोसॅटही आज इतर १९ उपग्रहांसोबत अवकाशात सोडण्यात आला. याच्या मदतीने भारताला नकाशाशास्त्रीय संशोधन, ग्रामीण तसेच शहरी आणि किनारपट्टीवरील जमिनींचा वापर, पाणी व्यवस्थापन व इतर गोष्टींच्या संशोधनासाठी मदत होईल.

सबस्क्राईब करा

* indicates required