computer

ट्राफिकने कंटाळलेल्या लेको, आता येतेय उडणारी कार !!

Subscribe to Bobhata

आपण कारने निवांत प्रवास करत असतो आणि प्रवासात अचानक ट्रॅफिक जामने व्यत्यय आणला तर चिडचिड होते ना मंडळी? आजकाल ट्रॅफिक जाम ही एक नित्याची डोकेदुखी बनली आहे. एकदा यात अडकलो की कधी बाहेर निघणार याची खात्री नसते. मग अशा वेळी हमखास एक विचार मनात येतो… साला, कारला पंख असते तर? छान उडत उडत गेलो असतो. खरंय ना मंडळी? पण हा विचार आला की दुसऱ्याच क्षणी वर्तमानाची जाणीव होते आणि आपल्या कल्पनांचे विमान परत जमिनीवर येते… पण जर आम्ही सांगितले की ही कल्पना सत्यात उतरली आहे तर? होय मंडळी… आता उडणारी कार खरोखर अस्तित्वात आली आहे. आता लवकरच भविष्यात आपण उडणाऱ्या कार मध्ये बसू शकू. चला तर मग जाणून घेऊया या कारची अधिक माहिती… 

जपान म्हणजे नवनवीन तंत्रज्ञानाचे माहेरघरच. इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अनेक घडामोडी इथे घडत असतात. इथल्या अशाच एका कंपनीच्या मनात आले की भूकंप, सुनामी किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमधून सुखरूप आणि त्वरित बाहेर पडू शकू अशी एक कार बनवावी. मग काय, तंत्रज्ञांची टीम लागली कामाला आणि बनवून टाकली 'द फ्लाईंग कार'. NEC कॉर्पोरेशन ही ती कंपनी. 

एनइसी च्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, ही कार त्यांनी खास चालकविरहित उड्डाणे घेण्यासाठी बनवली आहे. या कार मध्ये चालक नसणार आहे. असतील तर ती फक्त प्रवासी लोक. पूर्ण कार ऑटोमॅटिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. या कारची नुकतीच टेस्टिंग घेण्यात आली. जमिनीवरून 10 फूट अंतरापर्यंत या कारचे यशस्वी उड्डाण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून बंदिस्त जाळीत हा प्रयोग केला गेला. पण मंडळी, हा काही पहिलाच प्रयोग नव्हता बरं का. मागे एकदा 2017 मध्ये पण टेस्टिंग झाली होती. मात्र त्यावेळी कार क्रॅश झाल्याने त्यात परत सुधारणा केल्या गेल्या. 

दिसायला एखाद्या ड्रोन सारखी असणारी ही उडणारी कार एखाद्या मोठ्या मशीन सारखी आहे. याला चार पंखे (प्रोपेलर) लावलेले आहेत. यात ऊर्जेसाठी बॅटरी बसवल्या आहेत. आता या बॅटरीची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न तंत्रज्ञ करत आहेत. जर त्यांचे प्रयोग यशस्वी झाले तर अवघ्या काही वर्षातच ही कार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. सध्या तरी या कारचा उपयोग जपान येथील माई प्रांताच्या अनेक बेटांवर प्रवास करण्यासाठी होणार आहे. या बेटांवर हॉलिवूड सेलिब्रिटी सुट्टी घालवण्यासाठी नेहमी येत असतात. 

मंडळी, आपण जरी याला उडणारी कार म्हणत असलो तरी याचे नाव ऑटोमोबाईल क्षेत्रात याचे नाव EVtol (Electric vertical takeoff and landing) असे आहे. या EVtol निर्मितीचा प्रयत्न करण्यामध्ये फक्त एनइसी ही एकटीच कंपनी नाही. बाकी अनेक कंपन्या या स्पर्धेत पूर्वीपासूनच आहेत. उदाहरणार्थ, अमेरिकेची उबर एअर, फ्रान्सची झपाटा या कंपन्या त्यांच्या उडणाऱ्या कार या वर्षाच्या शेवटपर्यंत सादर करतील अशी शक्यता आहे. मात्र या स्पर्धेत ग्राहक बाजी मारणार हे निश्चित असते. कारण आपलीच कार विकली जावी यासाठी कमीत कमी दर या कंपन्या ठेऊ शकतात. 

हेलिकॉप्टर उपलब्ध असताना परत ही उडणारी कार कशासाठी असा प्रश्नही पडू शकतो मंडळी. पण कार आणि हेलिकॉप्टर मध्ये फार फरक आहे. एक तर या कारला तुलनेने कमी जागा लागते आणि दुसरं म्हणजे ही हेलिकॉप्टर सारखा मोठा कर्कश्य आवाज अजिबात करत नाही. परत हेलिकॉप्टरचा मेंटेनन्स आणि चालकाची ट्रेनिंग या बाबी सामान्य माणसाच्या बजेटच्या आवाक्याबाहेर आहेत. 

तर मंडळी, कशी वाटली ही उडणारी कार? यात बसून प्रवास करायला मजा येईल ना? आता बिनधास्त स्वप्ने बघा मंडळी. कारण स्वप्नातूनच सत्याची निर्मिती होते. काही वर्षांपूर्वी मोबाईल हे असेच एक स्वप्न होते जे सत्य बनून आता सध्या तुमच्या हातात आहे. हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा. आणि ही महत्त्वाची बातमी तुम्ही शेअर करायला विसरणारच नाही. बरोबर ना?

 

लेखक : अनुप कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required