प्राणघातक इंजेक्शन : अमेरिकेत मृत्युदंड असा दिला जातो...यापुढे तर फाशीची शिक्षा सुद्धा फिकी पडेल !!

एका माणसाने दुसऱ्या माणसाची किंवा अनेक माणसांची केलेली हत्या किंवा खून, याला पूर्वापार सजा करण्याची एकच पद्धत होती ती म्हणजे-गुन्हेगारांना मृत्युदंड देणे. यालाच कॅपिटल पनिशमेंट असेही म्हणतात. कायद्याच्या माध्यमातून जरी ही शिक्षा म्हटली तरी तो एकप्रकारचा खूनच आहे, अशी समजूत असलेल्या बऱ्याच देशांनी गेल्या काही वर्षात मृत्यूदंडाची शिक्षा रद्दबातल केली आहे. तुम्हाला आठवत असेल तर मुंबई स्फोटाच्या खटल्यात याकुब मेमनला फाशीची शिक्षा झाली, पण अबू सालेम दोषी असूनही त्याला फाशीची शिक्षा देता आली नाही. त्याचे कारण असे की पोर्तुगाल सरकारने प्रत्यार्पणाच्या शर्तीत त्याला फाशी देता येणार नाही ही एक अट घातली होती.

स्रोत

हा एक आंतरराष्ट्रीय वादविवादाचा विषय आहे. पण याहूनही मोठा वादाचा विषय आहे तो म्हणजे मृत्युदंड ठोठावण्याच्या पद्धतीचा !! भारतात ब्रिटिश काळापासून  दोरखंडाची फाशी देण्याची एकच पद्धत चालत आली आहे. इंडोनेशिया, मलेशियासारख्या देशात बंदुकीच्या फैरी झाडून शिक्षा ठोठावली जाते. काही अरब देशात सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली जाते किंवा तलवारीने मुंडके उडवले जाते. काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जनतेद्वारे दगडफेक करून गुन्हेगाराला मारणे,  ज्याला ‘लिन्चींग’ असे म्हणतात हा पण प्रघात होता. तर मग वादाचा मुद्दा असा की, गुन्हेगाराला मृत्युदंड द्यावा तो कमीतकमी वेळात, कमीतकमी वेदना होतील अशा पद्धतीनेच द्यावा असा आग्रह काही मानवतावादी संस्थांचा आहे.

काही देशांनी यातून एक मध्यममार्ग काढला तो म्हणजे इलेक्ट्रिकच्या शॉकने शिक्षा अंमलात आणणे. या पद्धतीत ज्याला मृत्युदंड दिला जातो त्या व्यक्तीच्या शेवटच्या काही सेकंदात चेहऱ्यावर ज्या वेदना दिसतात त्या बघून इलेक्ट्रिक चेअरवर देखील काही देशात बंदी आणली गेली. 

स्रोत

अमेरिकन संघराज्याच्या प्रत्येक राज्याला सजा देण्याच्या पद्धतीवर स्वातंत्र्य आहे.  त्यामुळे काही राज्यात अजूनही इलेक्ट्रिकल चेअर वापरली जाते. औषधशास्त्रात होणाऱ्या प्रगतीमुळे प्राणघातक इंजेक्शन देऊन मृत्यू देणे हा नवा मार्ग बहुतेक राज्यात आता वापरला जातो. अर्थातच ही अमेरिका आहे, त्यामुळे या पद्धतीवरही आक्षेप घेणारे अनेक लोक समूह किंवा मानवतावादी संघटना आहेत.

कुठली औषधं कमीतकमी वेळात आणि कमीतकमी त्रासात गुन्हेगाराला मृत्यू देतील याचे अधिकाधिक संशोधन सध्या चालू आहे. यामध्ये रोक्युरीयम ब्रोमाईड (झेमुरॉन) या मज्जातंतूवर परिणाम करणाऱ्या इंजेक्शनचा वापर सध्या अमेरिकेत केला जातो. 

अमेरिकेखेरीज चीन, थायलंड, तैवान, मालदीव, व्हियेतनाम, या देशातही प्राणघातक इंजेक्शनचा वापर केला जातो. 

या इंजेक्शनमध्ये असतं काय ?

स्रोत

प्राणघातक इंजेक्शन हे एकच इंजेक्शन नाही तर यात वेगवेगळ्या टप्प्यात दिल्या जाणाऱ्या रसायनांचे डोस असतात. यामध्ये बार्बीक्युरेट (झोपेचे इंजेक्शन), मज्जासंस्था बंद पडणारे रसायन किंवा औषध आणि पोटॅशियमचे इंजेक्शन असते. 

आता प्रत्यक्षात ही शिक्षा कशी दिली जाते ते बघूया.

स्रोत

प्रथम गुन्हेगाराला एका स्ट्रेचरवर बंघून ठेवण्यात येते. त्याच्या दोन हातांवर दोन कॅन्युला लावले जातात. कॅन्युला म्हणजे सलाईनसाठी लावण्यात येते तशी सुई. यात फरक फक्त इतकाच असतो की ही सुई टेफलॉनपासून बनवलेली असते आणि सुईची लांबी दीड ते २ इंच असते. दोन्ही हातांना लावलेल्या कॅन्युलापैकी एका कॅन्युलातून सुरुवातीला बार्बीक्युरेटसोडियम थायोपेंटॉलचा डोस दिला जातो. यामुळे गुन्हेगार बेशुध्द पडतो. हा डोस मोठ्या प्रमाणात दिला जात असल्याने श्वसनाची गतीपण मंदावते. त्यानंतर पॅरालेटिक्स (पॅनक्युरोनियम ब्रोमाईड) म्हणजे मज्जातंतूंवर आघात करणारे रसायन ढकलले जाते. त्यामुळे श्वसनपटल आणि फुफ्फुसाचे मज्जातंतू यांच्यामधली सुसंगती नाहीशी होते. यापाठोपाठ सोडियम क्लोराईड दिले जाते, ज्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होते आणि हृदयक्रिया बंद पडून मृत्यू होतो. १० मिनिटात खेळ खल्लास. या दरम्यान कार्डियाक मॉनिटर जोडलेला असतो आणि त्यावरून गुन्हेगाराची स्थितीसमजून येऊ शकते.

स्रोत

अर्थातच, काही झालं तरी ही एक हत्या आहे. त्यामुळे अमेरिकेतील सामाजिक संस्थांच्या दबावाखाली अमेरिकन औषधी कंपन्यांनी या कारणासाठी औषधे विकण्यावर स्वयंघोषित बंदी घातली. काही संस्थांच्या मते ही पद्धत सुद्धा फाशी इतकीच क्रूर आणि पाशवी आहे. म्हणून केवळ एकाच इंजेक्शनचा वापर याकामासाठी व्हावा असा या सामजिक संस्थांचा आग्रह आहे. या प्रकारच्या फाशीत थोडे विचित्र अनुभव देखील आहेत. एकदा  इंजेल डायज नावाच्या एका गुन्हेगाराला ३५ मिनिटं झाली तरीही मृत्यू आला नाही तर दुसऱ्या एका घटनेत एका गुन्हेगाराची नस शोधण्यातच २ तासांचा वेळ लागला. अर्थातच या दोन्हींना मारते समयी अनंत वेदनांना सामोरं जावं लागलं.

गुन्हेगारांना लवकर आणि कमीतकमी वेदनांनी मृत्यू यावा म्हणून औषधं किंवा मृत्युच्या पद्धतींवर संशोधन होत आहे. पण मुळात असे गुन्हेगारच तयार होऊ नयेत म्हणून काय केलं पाहिजे यावर संशोधन होणं गरजेचं आहे. हो ना मंडळी?

सबस्क्राईब करा

* indicates required