जुन्या काळातल्या कॅसेट टेप्स आठवतात? मग कॅसेट टेप्सच्या जनकाबद्दल या गोष्टी माहित असायलाच हव्या !!

'ये हात नही फासी का फंदा है' किंवा 'कितने आदमी थे?' हे डायलॉग रुपेरी पडदा गाजवलेल्या त्या काळातील शोले या हिट हिंदी चित्रपटातील आहेत. ह्या चित्रपटातील डायलॉग्ज गाण्यांइतकेच, किंबहुना त्यापेक्षा जास्त लोकप्रिय ठरले. आजही हा चित्रपट रसिक आवडीने पाहतात पण हे सगळं कशामुळं शक्य झालं, तर त्याचं जे संग्रहण केलं गेलं त्यामुळं. त्या अर्थाने एका व्यक्तीचे आपल्याला नक्कीच आभार मानायला हवेत. लू ऑटन नावाचा डच अभियंता ही ती व्यक्ती. ऑटन हा कॅसेट टेपचा जनक म्हणून सगळ्या जगात ओळखला जातो.
'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' असं म्हटलं जातं. हे ऑटनच्या बाबतीत तंतोतंत खरं होतं. त्याला लहानपणापासूनच तंत्रज्ञान विषयात रस होता. पुढे त्याने डेल्फ्ट ह्या नेदरलँडमधील एका विख्यात विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं. एकीकडे शिक्षण घेताना त्याने त्याच वेळी दुसरीकडे एका एक्सरे टेक्नॉलॉजी फॅक्टरीत ड्राफ्टींग टेक्निशियन म्हणून नोकरी स्वीकारली. शिक्षण पूर्ण केल्यावर १९५२ मध्ये फिलिप्स ह्या नावाजलेल्या कंपनीमध्ये प्रॉडक्ट डेव्हलपमेंट विभागाच्या प्रमुखपदाची धुरा त्याच्यावर सोपवण्यात आली. त्या काळातही फिलिप्स टेप रेकॉर्डर्सचं उत्पादन करत होती. मात्र ही साधनं आकाराने मोठी, वजनदार आणि त्यामुळेच हाताळायला कठीण होती. त्यामुळे त्याच्या कामाची सुरुवातच त्या टेप रेकॉर्ड्सना तुल्यबळ पर्याय शोधण्यापासून झाली.
त्यांचं ध्येय साधं होतं. ह्या टेप्स व त्यांच्या प्लेअर्सना वापरण्यास अधिक सोपं-सुटसुटीत बनवणं. सन १९६० च्या सुरुवातीला कॅसेट टेपचा विकास करण्याच्या काळात त्याच्या कोटाच्या खिशात बसेल अशा आकाराचा एक लाकडी ब्लॉक त्याने बनवला. हा लाकडी ब्लॉक त्या काळातल्या बल्की टेपरेकॉर्डरपेक्षा कैक पटीनं हाताळण्यास सोपा होता. यानंतर यात उत्तरोत्तर अधिक प्रगती होत गेली. सन १९६२ मध्ये ह्या ब्लॉकला अंतिम स्वरूप प्राप्त झालं आणि त्याची निर्मिती प्रत्यक्षात उतरली. हा आविष्कार जगात अतिशय लोकप्रिय ठरला. या कॅसेट्सनी विक्रीचा उच्चांक गाठला. तब्बल १० हजार कोटींपेक्षा जास्त कॅसेट्सची विक्री झाली. या ग्राहकांमध्ये अनेक संगीताचे चाहते होते. ते या कॅसेट्सवर स्वतःची गाणी रेकॉर्ड करून ठेवत. गाण्यांव्यतिरिक्त सिनेमांचे डायलॉग्ज, भाषणं हेही यावर कायमस्वरूपी साठवता येई. त्या काळात ही निर्मिती प्रचंड गाजली. एका सुवर्णयुगाची ही सुरुवात होती.
मात्र प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेल्या या टेप कॅसेट्सचा कालांतराने पडता काळ सुरू झाला. याला निमित्त ठरलं ते कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजे सीडीचं आगमन. गंमत म्हणजे या सीडीच्या विकासातही ऑटनचा हातभार लागला होता!
ऑटन यांनी एका ठिकाणी दिलेल्या मुलाखतीदरम्यान कॅसेट टेपच्या यशाचं रहस्य सांगितलं. त्याच्या मते कॅसेट टेपच्या यशाचं गमक त्याच्या साधेपणातच दडलं होतं. ह्याच्याच जोडीला प्लेअर्स आणि रेकॉर्डस् ह्या बॅटरीजवरसुद्धा चालवता यायच्या. त्यामुळे त्या वापरण्यास, हाताळण्यास सुलभ आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज वाहून नेता येतील अशा झाल्या. त्या अर्थाने आपल्या आवडीचं संगीत लोकांना खिशात ठेवून इकडून तिकडे नेता आलं!
निवृत्तीपश्चातही अनेक वर्षे ते त्यांच्या तंत्रज्ञान या लाडक्या विषयात कार्यरत राहिले. नुकताच, ६ मार्च २०२१ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण या शोधाच्या रूपाने ते ह्या जगात अमर झाले आहेत हे नक्की.
लेखिका: स्मिता जोगळेकर