computer

सतत ६८ वर्षे उचकी लागलेला माणूस? हे कशामुळे घडतं? यावर कुणी उपाय शोधलाय? वाचा सर्वकाही...

'मला लागली कुणाची उचकी'!! असं कधी ना कधी सगळ्यांच्याच बाबतीत होतं. सलग काही मिनिटं जरी उचकी लागली तरी आपल्याला ती सहन होत नाही. कधी एकदा उचक्या थांबतील असे आपल्याला होऊन जाते. पण असाही एक माणूस होऊन गेला ज्याला आयुष्यभर उचक्या येत होत्या. दर मिनिटाला ४० उचक्या देऊन या माणसाने आपले आयुष्य काढले. उचक्या देण्यासाठी त्याचे नाव गिनीज बुकमध्येही नोंदवले गेले.

चार्ल्स ऑस्बोर्न त्याचं नाव. एक छोटासा अपघात आणि त्यांना उचक्यांचा त्रास आयुष्यभरासाठी सहन करावा लागला. ९७ वर्षांचे भलेमोठे आयुष्य हा माणूस जगून गेला. पण त्यातले तब्बल ६८ वर्ष त्यांचे उचक्या देण्यातच वाया गेले.

चार्ल्स ऑस्बोर्नचा जन्म १८९३ साली झाला. इतर लोकांप्रमाणे शेतीत काम करावे आणि समाधानी आयुष्य जगावे असे त्याचे काम सुरू होते. तो अमेरिकेतल्या नब्रास्का राज्यातला. असाच एके दिवशी तो शेतात काम करत होता. तो एका कसायाला डुक्कर लटकवण्यासाठी मदत करत होता. यातच तो जमिनीवर पडला. तो पडला तेव्हा त्याला काही वाटले नाही. पण नंतर त्याला उचक्या सुरू झाल्या. त्या काही थांबण्याचे नाव घेईनात. शेवटी चार्ल्स डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी त्याला सांगितले, 'तुझ्या मेंदूतील पिनच्या आकाराची एक रक्तवाहिनी फुटली आहे.' डॉक्टरांनी त्याच्या पडण्यामुळे मेंदूच्या स्टेममधील एक लहान भाग नष्ट झाला आणि त्यामुळे हा सर्व प्रकार सुरू झाल्याचे त्याला सांगितले.

त्यानंतर ऑस्बोर्नला मिनिटाला सरासरी २० ते ४० उचक्या येत असत. मे १९९१ मध्ये वयाच्या ९७ व्या वर्षी मृत्यूने त्याला गाठले. तोवर त्याला अंदाजे ४० कोटींहून अधिक वेळा उचक्या लागल्या होत्या. सतत ६८ वर्षं हा त्रास सहन करत तो जगला. पण याही परिस्थितीत हा गडी प्रयत्न सोडत नव्हता. अनेक ठिकाणी जाऊन त्याने यावर काही करता येते का यासाठी प्रयत्न केले. पण कोणालाच इलाज सापडला नाही. एकदा मात्र काहीतरी होईल अशी आशा त्याला लागली होती.

मेयो नावाच्या एका क्लिनिकमधल्या एका डॉक्टरांनी त्याला कार्बन मोनॉक्साईड आणि ऑक्सिजनवर ठेवून उचकी थांबवून दाखवली. पण त्याचे नशीब इथेही फुटकेच होते. उपचारात एक घातक तृटी होती. कार्बन मोनॉक्साईड शरीरासाठी अपायकारक आहे. त्याच्या उपस्थितीत सुरक्षितपणे श्वास घेणे शक्य नव्हते. त्याऐवजी त्याने उचकीवेळी येणारा वैशिष्ट्यपूर्ण आवाज कमी करणारे श्वासोच्छवासाचे वेगळेच तंत्र शिकून घेतले. उचकीचा आवाज येऊ नये यासाठी ऑस्बोर्न उचकी आल्यावर श्वास घेत असे. त्यासाठी तो दर मिनिटाला तीन किंवा चार वेळा आपली छाती वाकवायचा. याने व्हायचे काय की, त्याला उचकी आली हे तर प्रत्येकाला समजायचे, पण तिचा आवाज येत नसे. अशा पद्धतीने त्याला त्याच्या या त्रासामुळे तारेवरची कसरत करावी लागत होती.

आता विचार केला तर आपल्याला वाटू शकते की हा माणूस कायमस्वरूपी दुःखात राहत असेल. पण त्याने ही परिस्थिती स्वीकारली होती. ऑस्बोर्न एक आनंदी, मजेदार, प्रेमळ माणूस म्हणून वावरत असे. त्याच्या त्रासाबद्दल तो विशेष बोलत नसे आणि लोकांसोबत मस्तपैकी मजामस्ती करत असे. जवळच्या लोकांची आपुलकीने विचारपूस करणे हे तर त्याचे नेहमीचेच होते.

१९७८ मध्ये ऑस्बोर्नच्या उचकीचा सलग ५६ वर्षे पूर्ण करण्याचा विक्रम झाला होता. त्यावेळी त्याने असोसिएटेड प्रेसला सांगितले होते की, "माझी या त्रासापासून सुटका केली तर ते करणाऱ्याला जे हवे ते मी देईन." याच मुलाखतीमुळे ऑस्बोर्नच्या उचकीने जगाचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली. त्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आणि 'द टुनाईट शो स्टारिंग जॉनी कार्सन' आणि 'दॅट्स इनक्रेडिबल' या रिअलिटी टेलिव्हिजन शोमध्ये त्याने हजेरी लावली.

आधीही तो या त्रासाच्या सुरुवातीला १९३६ मध्ये ऑस्बोर्न रॉबर्ट रिप्लेच्या 'बिलीव्ह इट ऑर नॉट' या रेडिओ कार्यक्रमात दिसला होता. या प्रसिद्धीमुळे हजारो सहानुभूतीच्या पत्रांचा ओघ त्याला सुरू झाला होता. या पत्रांत साहजिकच अनेकांनी बरे होण्यासाठी स्वतःच्या सूचना त्याला देऊ केल्या. परंतु कोणीही अल्पशा दिलाशापेक्षा त्या बिचाऱ्याला अधिक देऊ शकले नाही. सर्व गोष्टींचा विचार केला असता ऑस्बोर्नने जे आयुष्य जगले ते तुफान म्हणावे लागेल.

महाशयांनी दोनदा लग्न केले होते आणि त्याला आठ मुले झाली. त्याचा व्यवसाय हा शेतीची यंत्रसामग्री विकून आणि पशुधनाचा लिलाव करून उदरनिर्वाह करणे हाच होता. त्याला फक्त उचकी येत असे आणि बाकी सर्व व्यवस्थित होते असेही काही नाही. त्याला यामुळे इतरही अनेक त्रास सहन करावे लागत होते. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस ऑस्बोर्नला ब्लेंडरद्वारे जेवण घालावे लागत असे. तरीही तो त्याचे वजन स्थिर ठेवू शकला. तो अनेकदा चिकन, मटनाचा रस्सा अन्नात मिसळत असे आणि दुपारच्या जेवणासाठी दूध आणि अनेक बिअर्स सोबत तयार ठेवायचा. अशा पद्धतीने भरभक्कम असे ९७ वर्षांचे आयुष्य तो जगला.

१९९० मध्ये ऑस्बॉर्नची उचकी अचानक थांबली. सुमारे एक वर्षानंतर मे १९९१ मध्ये काही महिने आनंदाने उचकीमुक्त राहिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. फक्त एक वर्ष त्याला विनाउचकीचे काढता आले. आयुष्यभर असा विचित्र त्रास घेऊन तो जगला असला तरी याच गोष्टीने तो जगभर प्रसिद्ध झाला.

ऑस्बॉर्नचा हा आजार म्हणा किंवा त्रास म्हणा पुढे अनेक संशोधकांना विषय खोलात जाऊन समजून घ्यायला उपयोगी पडला. सॅन अँटोनियो येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास हेल्थ सायन्स सेंटरचे न्यूरोसर्जन अली सेफी यांनी १९२२ च्या दरम्यान ऑस्बोर्नच्या बरगड्यांना किरकोळ दुखापत झाल्याचा नवा निष्कर्ष मांडला. खालच्या फासळ्या डायफ्रामशी जोडलेल्या असतात, छाती आणि पोट यांच्यातील एक स्नायू जो आकुंचन पावतो तो उचकी निर्माण करतो. यातून त्यांना भन्नाट आयडिया आली. उचक्या थांबत नाहीत यासाठी खराब झालेला डायाफ्राम जबाबदार असू शकतो असा निष्कर्ष काढत त्यांनी तात्काळ उचकी दूर करणारे उपकरण शोधले.

सेफीच्या मते, दुसरी शक्यता अशी आहे की ओसबॉर्नच्या डोक्याला मार लागला आणि त्याला स्ट्रोक आला. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या वेक्सनर मेडिकल सेंटरमधील न्यूरोलॉजिस्ट डायना ग्रीन-चांडोस यांनी २०१५ मध्ये सांगितल्याप्रमाणे, बाहेरील कुठला त्रास नसताना दीर्घकाळापर्यंत वेदनादायक उचकी येणे हे स्ट्रोकचे लक्षण असू शकते, विशेषत: जेव्हा छातीत दुखणे आणि चक्कर येणे यासारख्या लक्षणांचा अनुभव रुग्णास येत असेल तर वरील शक्यता ही मोठी असते.

बर्‍याच वेळा, उचकी ही अति दारू किंवा सोडा पिणे, जास्त खाणे, उत्तेजित होणे किंवा च्युइंगम चघळत असताना हवा गिळणे यासारख्या क्रियांमुळे उद्भवत असते. या परिस्थितीत मात्र ती केवळ काही मिनिटे टिकते. परंतु काही उचक्या या ४८ तासांपेक्षा जास्त काळ चालू राहतात, त्या वेळी त्यांना क्रॉनिक किंवा सतत येणाऱ्या उचक्या मानले जाते. ऑस्बोर्न सारख्या दुर्मिळ प्रकरणांमध्ये, उचकी एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकू शकते ज्यामुळे त्या असह्य होतात.

दीर्घकाळ टिकणार्‍या उचक्यांची कारणे अनेक आहेत आणि काही प्रकरणांमध्ये ते शोधणे कठीण आहे. त्यामध्ये मज्जातंतूचे नुकसान, मध्यवर्ती मज्जासंस्थेचे विकार, मद्यपान, मधुमेह, भूल देणे आणि कर्करोग यांचा समावेश होतो. २००० च्या दशकात इंग्लंडमधल्या ख्रिस सँड्स यांनी सुमारे तीन वर्षे उचक्यांचा त्रास सहन केला. शेवटी डॉक्टरांनी निष्कर्ष काढला की सतत उचक्या होण्यामागे त्याला असलेला ब्रेन ट्यूमर आहे. या स्थितीसाठी उपचार कुठले आणि कसे करायचे याबद्दल बरीच डोकेफोड डॉक्टरांना करावी लागत असते.

यात पुढे जाऊन घडलेली भन्नाट गोष्ट म्हणजे अली सेफीने उचक्या थांबवण्यासाठी जे यंत्र शोधले होते. त्याचा प्रसार करून विकण्यासाठी HiccAway नावाचा स्टार्टअप सुरू केला आहे. शार्क टॅंकच्या एका एपिसोडमध्ये देखील तो त्याच्या या उचकी थांबवणाऱ्या मशीनची माहिती सांगताना दिसला होता. HiccAway हे साध्या हिचकीपिंग बाउट्ससाठी डिझाइन केलेले आहे, जुनाट किंवा गुंतागुंतीच्या केसेससाठी नाही हे अली स्वतः सांगतो. हे डिव्हाइस उचकीसाठी उपचाराप्रमाणे काम करते. यासाठी त्याने शोधलेली पद्धत म्हणजे, पेपर टॉवेलद्वारे पाणी पिणे.

'जेव्हा तुम्ही पेपर टॉवेलमधून पाणी पिता, तेव्हा तुम्ही ते पाणी अधिक जोराने ओढता, असे सेफी म्हणतो. यातून काय होते, जेव्हा तुमच्या तोंडातून पाणी शोषले जाईल तेव्हा छातीत एक व्हॅक्यूम बनवण्यासाठी डायफ्राम पूर्णपणे खाली खेचले जातो. डायाफ्राम जबरदस्तीने खाली खेचल्याने उबळांचे चक्र खंडित होऊ शकते, असे सेफी म्हणतो. त्याने ऍनेस्थेसियोलॉजिस्ट म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती. सातत्याने उचकी येणारे लोक दुर्मीळ असतात असे वाटत असले तरी सेफीच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी उचकीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होणारे अंदाजे ५००० लोक ४८ तासांपेक्षा जास्त काळ उचक्या करत असतात.

सध्या इतकी प्रगती आरोग्यव्यवस्थेत असूनही, ऑस्बॉर्नचा आजार सुरू झाल्याच्या एका शतकानंतरही, दीर्घकाळापर्यंत उचकी येणे हा यावर कायमचा उपाय शोधला जात नाही. सेफीच्या म्हणण्यानुसार, डॉक्टर काहीवेळा पेनकिलर औषधांचा वापर करतात तात्पुरते उचकी थांबवतात, परंतु ही औषधे रुग्णांची झोप उडवतात.

काही असो.. सतत ६८ वर्षे उचक्या लागणारा हा माणूस दुर्मिळ होता याबद्दल काही दुमत नाही..

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required