computer

रशिया ते पाकिस्तान, एक गरुड आयुष्यभरात नक्की किती प्रवास करु शकतो? वाचा इथे !!

आपल्याला बऱ्याचदा वाटत असतं की आपल्याला जर पंख असते तर किती बरं झालं असतं, हवं तिकडे उडत गेलो असतो. तसं पाहता लोक एकमेकांना उडत जा वगैरे म्हणतातच किंवा काही लोक नेहमी हवेत पण असतातच. तो पॉईंट वेगळा राव.

मुद्दा असा आहे की पक्ष्यांच्या बाबतीत माणसाला नेहमीच उत्सुकता वाटत आलीय. आता आजचा हा किस्साच पाहा ना.

नुकतंच सौदी अरेबियामध्ये फाहद काश या तरुणाला एक मेलेला गरुड आढळला. या गरुडाच्या पाठीवर एक ट्रॅकर लावलेला होता. फाहदने ट्रॅकर काढल्यावर त्यावर त्याला एक मेल अॅड्रेस दिसून आला.

पुढे मिळालेली माहिती फारच रंजक होती. रशियाच्या शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी २० वर्षांपूर्वी जवळजवळ २० गरुडांवर ट्रॅकर बसवले होते. या ट्रॅकरने गरुडांच्या प्रवासाचा नकाशा छापला जाणार होता. ट्रॅकर लावलेले गरुड आढळले तर संपर्क साधता यावा यासाठी मेल अॅड्रेस पण देण्यात आला होता.

राव, ट्रॅकरने रेकॉर्ड केलेला नकाशा पाहून आपण थक्क होतो. गरुडाने २० वर्षात केलेला प्रवास हा माणसाने आपल्या संपूर्ण हयातीत केलेल्या प्रवासापेक्षा मोठा आहे. रशिया, सौदी अरेबिया, इराक, उझबेकिस्तान, कझाकस्तान, सुदान ते पाकिस्तानच्या पश्चिमेच्या हद्दीपर्यंत हा गरुड जाऊन आलाय. हा पाहा नकाशा.

या नकाशाच्या मदतीने गरुडांच्या प्रवासाची पद्धत आपल्या लक्षात येते. त्याने समुद्रावरून उडणं टाळल्याचं स्पष्ट दिसतंय. समुद्र टाळण्यासाठी त्याने फिरून जाणं पसंत केलंय. बरेच पक्षी समुद्रावरून प्रवास करतात, पण या नकाशावरून असं दिसतंय की गरुड त्याला अपवाद आहेत.

या गरुडाने केलेला प्रवास नेमका किती किलोमीटर होता हे समजलेलं नाही, पण आणखी एका संशोधनात या गोष्टीचं उत्तर सापडतं. ‘ब्रिटीश बर्ड’ नावाच्या शास्त्रज्ञांच्या टीमने ट्रॅक केलेल्या १६ गरुडांचा प्रवास सांगतो की ते दररोज ३५५ किलोमीटरचा प्रवास करायचे. या नकाशावरून आणि मिळालेल्या माहितीवरून असं दिसतंय की गरुड हे सतत प्रवास करणारे पक्षी आहेत. पण ते समुद्र का टाळतात हे अजूनही कोडंच आहे.

मंडळी, हा एवढा मोठा प्रवास बघून आपल्याला पण पंख असायला हवे होते असं नक्कीच वाटू शकतं.

सबस्क्राईब करा

* indicates required