काय आहे व्हॉयेजर गोल्डन रेकॉर्ड्स ? वाचून मराठीचा अभिमान वाटेल राव !!!

पृथ्वी बाहेरील जगाशी संपर्क साधण्याचे अनेक वर्षापासून प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे १९७७ साली अवकाशात सोडलेले व्हॉयेजर १ व २ हे यान. यांना ‘व्हॉयेजर प्रोग्रॅम’ म्हणतात. पृथ्वीपासून कोसो दूर हे मानवरहित यान आजही अंतराळातील माहिती पृथ्वीवर पोहोचवत आहेत. सौरमाला, गुरु, शनी, युरेनस, नेपचून इत्यादी दूरच्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी यांचा वापर होतो. ह्या वर्षी व्हॉयेजर प्रोग्रॅमला सुरुवात होऊन ४० वर्ष पूर्ण झाली आहेत.


स्रोत

मंडळी या यानांची खासियत म्हणजे यांच्यावर बसवण्यात आलेली ‘व्हॉयेजर गोल्डन रेकॉर्ड्स’ अर्थात सोनेरी तबकडी. परग्रहावरील माणसांना पृथ्वीवरील गोष्टींची ओळख करून देण्यासाठी या रेकॉर्ड्स मध्ये अनेक प्रकारचे आवाज रेकॉर्ड करण्यात आले आहेत. पक्षांचे आवाज, रेल्वेचा आवाज, कुत्र्याचे भुंकणे, इत्यादी. यात अवाजांबरोबरच पृथ्वीवरील ५५ भाषांमधल्या शुभेच्छा देखील सामील आहेत. मंडळी, अभिमानाची गोष्ट म्हणजे यात मराठी भाषेचा देखील समावेश आहे.

ही शुभेच्छा आहे : “नमस्कार. ह्या पृथ्वीतील लोक तुम्हाला त्यांचे शुभविचार पाठवतात आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही ह्या जन्मी धन्य व्हा.”

शुभेच्छांशिवाय या रेकॉर्ड्स मध्ये जगातील निवडक संगीताचा सुद्धा समावेश आहे. यातही मराठीने बाजी मारलीये राव. भारतातून फक्त एक गाण्याची रेकॉर्ड यात सामील आहे. आणि ती आहे 'केसरबाई केरकर' यांचा आवाजातील 'जात कहाँ हो अकेली गोरी' हे गीत. आहे की नाही कमाल ?

५५ भाषांमध्ये जगभरातील प्राचीन भाषांपासून आजच्या काळात बोलल्या जाणाऱ्या निवडक भाषांचा समावेश आहे. दक्षिण आशियाई भाषात मराठी बरोबरच हिंदी, बंगाली, गुजराती, उर्दू, पंजाबी, कन्नड, ओरिया, सिंहली, नेपाळी, राजस्थानी, तेलगु अश्या १२ भाषांचा समावेश आहे. याखेरीज पृथ्वीला समजून घेण्यासाठी ११६ छायाचित्र या रेकॉर्ड्स बरोबर जोडली आहेत ज्यांच्या मार्फत पृथ्वीबाहेरील लोकांना पृथ्वी कशी आहे ते समजून घेता येईल.

ही सगळी माहिती आणि रेकॉर्ड्स तुम्ही व्हॉयेजर च्या वेबसाईटवर पाहू शकता.

मंडळी जगात ६००० पेक्षा जास्त भाषा आहेत, एकट्या भारतात अनेक भाषा बोलल्या जातात पण त्यातून मराठीची निवड होणे हे खरच अभिमानास्पद आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required