computer

३५ लाख वर्षापूर्वीचे जीवाणू टोचून हा शास्त्रज्ञ नेहमीच तरुण राहिल? काय आहे त्याचं संशोधन ?

नेहमी तरुणच राहण्याची माणसाला फार पूर्वीपासून इच्छा आहे. याचे पडसाद जगभरातल्या दंतकथांमध्ये उमटलेले आढळतात. बऱ्याच दंतकथांमध्ये अमुक एका जागी चिरतारुण्याचा झरा असल्याचे उल्लेख आढळतात. आपल्याकडे नाही का, ययातीने मुलाचंच तारुण्य घेतल्याची कथा सांगितली जाते.

आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात ‘बोटॉक्स’ सारख्या पद्धतीने बरेच सेलेब्रिटी एका इंजेक्शनवर चेहरा तुकतुकीत आणि तरुण करून घेताना दिसतात. पण त्याचं काय आहे, शरीर ऑपरेशन्स करून तरुण दाखवता येईल हो, पण वय तर वाढतच राहणार. वय कोणीही कमी करू शकत नाही.

मंडळी,   नेहमी चिरतरुण राहणं शक्य आहे असं वाटणारे एक शास्त्रज्ञ आहेत आणि यासाठी त्यांनी स्वतःवरच एक प्रयोग केला आहे. चला तर बघूया, त्यांनी काय केलंय?

(अॅन्तोली बृचकोव्ह)

असं म्हणतात की अॅन्तोली बृचकोव्ह नावाच्या या शास्त्रज्ञांना सैबेरियाच्या याकुत्स्क इथल्या पर्वतावर चिरतारुण्याचा फॉर्म्युला सापडला आहे. हा फॉर्म्युला खरं तर ‘Bacillus F’ नावाचा एक विशिष्ट बॅक्टेरीया आहे. या बॅक्टेरीयावर संशोधन केल्यावर बृचकोव्ह यांना आढळलं की हे जीवाणू तब्बल ३५ लाख वर्षापूर्वीचे आहेत.

Bacillus F जिवाणूंवर संशोधन करणारे आणखी एक शास्त्रज्ञ व्हिक्टर चर्न्योव्हस्की यांनी हे जीवाणू किटक, उंदीर तसेच झाडांमध्ये टोचून बघितले. निरीक्षणात असं दिसून आलं की हे जीवाणू या सजीवांच्या आयुर्मानात भर घालत आहेत. डॉक्टर चर्न्योव्हास्की यांनी तर Bacillus F जीवाणूंना ‘अमृत’ म्हटलंय.

मंडळी, विज्ञानाच्या जगतात अमृत सापडल्याचे असे अनेक दावे झाले आहेत आणि होत आहेत, पण या घटनेत गोष्ट इथेच थांबत नाही. यापुढील निरीक्षणात सैबेरियाच्या याकुत्स्क भागाचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून असं लक्षात आलं  की याकुतीया भागातले लोक इतरांपेक्षा जास्त काळ जगतात. कारण त्यांच्या पाण्यात Bacillus F जीवाणू आढळतो.

Bacillus F जीवाणूचं रहस्य आहे तरी काय ?

अॅन्तोली बृचकोव्ह आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या जीवाणूचा DNA मिळवला. पण त्यांना हे समजत नव्हतं की Bacillus F जीवाणू अमर कसे आहेत. बरेच प्रयोग केले पण याचा पत्ता लागत नव्हता. हे अत्यंत किचकट काम होतं.

मग अॅन्तोली बृचकोव्ह एका दुसऱ्या प्रश्नाकडे वळले. माणसांवर Bacillus F जीवाणू काय परिणाम करेल? हा शोध घेण्यासाठी त्यांनी स्वतःच्याच शरीरात Bacillus F जीवाणू टोचले.

पुढे काय झालं?

ही घटना २०१५ ची आहे. तुम्हाला वाटत असेल की त्यांचा पचका झाला असावा तर तसं नाहीय. अॅन्तोली बृचकोव्ह अजूनही जिवंत आहेत. ते म्हणतात की २०१५ पासून मला सर्दी आणि ताप आलेला नाही. मला पूर्वीपेक्षा जास्त उत्साही वाटत आहे’

मंडळी, हे खरंच Bacillus F जीवाणूंची कमाल आहे की आणखी काही आहे हे याचा शोध अजून लागायचा आहे. Bacillus F जीवाणू लाखो वर्ष कसे जगतात आणि त्यांचा खरोखर माणसाला काही उपयोग आहे का यावर संशोधन व्हायचं आहे. त्यामुळे माणसाला अमृत सापडलं म्हणता येणार नाही.

काही का असेना, पण ३५ लाख वर्षापूर्वीचे जीवाणू शरीरात टोचून घेणारा हा कदाचित एकमेव शास्त्रज्ञ असावा.

सबस्क्राईब करा

* indicates required