computer

खऱ्या रेल्वेसारखे दिसणारे एकही खेळणे नाही. म्हणून या तरुणाने स्वतःच रेल्वेगाड्या बनवण्यास सुरुवात केली.

लहान मुलांना त्यांची खेळणी म्हणजे जीव की प्राण असतात. अगदी खाताना किंवा झोपतानाही ती खेळणी जवळ ठेवायची त्यांना सवय असते. बाहेर कुठे फिरायला निघालो तरी ती खेळणी ते सोबत घेतात. त्या खेळण्यांशी ते गप्पा मारतात आणि जणू एका वेगळ्याच जगात जातात. पण जशी मुलं मोठी होतात तशी खेळणी खेळणं मागे पडतात. पण डोंबिवलीचे रहिवासी सुभाष राव हे आजही वयाच्या ४०व्या वर्षी स्वतः खेळणी बनवतात. ही खेळणी म्हणजे रेल्वेच्या हुबेहूब प्रतिकृती आहेत. त्यांना हा छंद लहानपणापासून आहे आणि आजही ते यात रमतात. आज पाहूया सुभाष राव यांनी आपला छंद कसा जोपासला आहे ते!

डोंबिवलीत राहणाऱ्या सुभाष राव यांना रेल्वेची प्रचंड आवड आहे. लहानपणी त्यांच्या घराच्या खिडकीबाहेर लोकल गाड्या धावताना दिसायच्या. या रेल्वेनी त्यांना प्रचंड भुरळ घातली .त्यामुळे खेळणी असोत, कंपास बॉक्स असोत किंवा शाळेची बॅग असो, त्यात रेल्वे असलीच पाहिजे. त्यांनी अनेक फोटोही जमवले होते. खेळणी विकत घेतानाही ते रेल्वेचे गेम्स विकत घ्यायचे. पण तरीही त्यांना वाटायचे कि खऱ्या रेल्वेसारखे दिसणारे एकही खेळणे नाही. म्हणून त्यांनी स्वतः रेल्वेगाड्या बनवण्यास सुरुवात केली.

सुरवात कागदाच्या रेल्वे बनवण्यापासून झाली. कार्ड पेपर बॉक्स, पाणी आणि स्केच रंगांच्या मदतीने त्यांनी स्वतःची पेपर ट्रेन बनवली. त्यांना पालकांकडून खूप प्रोत्साहन मिळाले. मग त्यांनी त्यात अजून कशी सुधारणा करता येईल ते पाहिले आणि त्यात अजून नवनवे मॉडेल्स ते बनवत राहिले. त्यांना तो छंदच जडला. कॉलेजच्या दिवसांमध्ये जेव्हा ते ट्रेनने प्रवास करायचे तेव्हा ट्रेनचा प्रत्येक तपशील त्यांनी जवळून पाहिला. मग त्याची चित्रे काढून संदर्भ गोळा केले. अनेक नामवंत कलाकारांचे काम ते पाहू लागले. त्यावरून अभ्यास करून त्यांनी एक मॉडेल बनवले.
कार्डपेपरच्या जागी मग प्लास्टिकची शीट आणि स्प्रे कॅनसह स्केच पेनने काम करण्यास सुरुवात केली. त्यात सुधारणा करत केबल्स आणि वायर्स, रिफिल, फ्लॉपी डिस्क, टूथपिक्स अशा टाकाऊ वस्तूंचाही वापर ते करू लागले. रेल्वेच्या प्रतिकृती अगदी हुबेहूब बनू लागल्या.

त्यांच्या रेल्वेच्या प्रतिकृती जास्त पैसे खर्च न करता बनवता येतील याचा विचार ते करू लागले. कोणीही घरी आले की त्या प्रतिकृती पाहून मुग्ध होऊन जाई. त्यांनी वेगवेगळ्या ट्रेनच्या १५ प्रतिकृती बनवल्या आहेत. यामध्ये वंदे भारतच्या अत्याधुनिक ट्रेन-18 सोबत मुंबई लोकल (DC AC-DC), YP, हमसफर, तेजस, ICF कोच, दुरांतो, दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, नेरल -माथेरान टॉय ट्रेन, डेक्कन क्वीन, WCM5, DMUs, लोकोमोटिव्ह याच्या हुबेहूब प्रतिकृती आहेत. आणि त्याही ५००रुपयांहून कमी खर्चात!! आजपर्यंत या सर्व प्रतिकृतींची तीन प्रदर्शनं भरवली आहेत. पुढेही त्यांना अनेकठिकाणी प्रदर्शने भरवायची आहेत.

सुभाष राव यांनी कमर्शियल आर्टचे शिक्षण घेतले आहे. सध्या ते जाहिरात एजन्सीमध्ये काम करतात आणि घरी आल्यावर छंदासाठी वेळ देतात. रेल्वेच्या नवीन मॉडेल्सवर रोज एक-दोन तास काम करतात.

आपल्या आवडीला एक उत्तम रूप देऊन सुभाष यांनी एक मार्ग दाखवून दिला आहे. त्यांना बोभाटातर्फे अनेक शुभेच्छा !

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required