computer

वाचा जगाला चक्राऊन सोडणाऱ्या एलियन सांगाड्याची गोष्ट....हा सांगाडा खरंच एलियनचा होता का ?

मंडळी, एलियन आहेत की नाहीत या गोष्टीवर अनेक वर्षांपासून वैज्ञानिक आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञ काथ्याकूट करत आहेत. एलियन नाहीत आणि एलियन आहेत या दोन्ही मतांना बरोबर ठरवणारे पुरावे पण जगात आहेत. आता प्रश्न पडतो की ऐकायचं कोणाचं??

मंडळी, २००३ साली जेव्हा चिलीच्या ॲटाकामा वाळवंटात चक्क एका एलियनचा सांगाडा सापडला, तेव्हा सगळ्यांचीच खात्री पटली की एलियन असतात. पण थांबा, सत्य काही तरी वेगळंच होतं.

आज आपण या एलियन सांगाड्यामागची कथा वाचणार आहोत. चला तर सुरुवातीपासून सुरु करूया.

हा सांगाडा कसा सापडला याबद्दल वाद आहेत. तरी एक प्रसिद्ध कथा इथे सांगतो. स्थानिक रहिवाशी ऑस्कर मुनोज हा ला नोरीया या ओस पडलेल्या गावात काही दागिने मिळतात का ते शोधायला गेला होता. तिथे त्याला पांढऱ्या कपड्यात बांधून ठेवलेला एलियनचा सांगाडा सापडला. हा एलियनचाच सांगाडा आहे हे त्या सांगाड्याला बघताक्षणीच कोणीही सांगू शकत होतं. हा फोटो नीट पाहा.

या सांगाड्याने शास्त्रज्ञांना चांगलंच गोंधळात पाडलं होतं. गोंधळात पाडणारी मुख्य गोष्ट म्हणजे या सांगाड्याला साधारण माणसापेक्षा कमी हाडं होती आणि त्याची कवटी माणसाच्या कवटीसोबत जुळत नव्हती. या सांगाड्याला “ॲटाकामा ह्युमनॉईड” नाव देण्यात आलं. ह्युमनॉईड म्हणजे मानवसदृश.

आम्ही या पुढे या सांगाड्याचा त्याच्या टोपणनावाने म्हणजे ‘ॲटा’ नावाने उल्लेख करणार आहोत.

तर, ॲटा २००३ ला सापडला. पण त्याला प्रसिद्धी मिळाली २०१३ साली. यूएफओ डॉक्युमेंटरी ‘सिरीअस’ (Sirius) मध्ये ॲटाला एलियन असतात याचा पुरावा म्हणून सादर करण्यात आलं होतं. या डॉक्युमेंटरीचं काम सुरु असताना स्टॅन्फोर्ड विद्यापीठाचे गॅरी नोलन यांनी ॲटाविषयी ऐकलं आणि त्यांनी ॲटावर अभ्यास करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांना एक्स-रे आणि सांगाड्याच्या ‘अस्थि-मज्जा’चे नमुने घेण्याची परवानगी मिळाली.

एवढं समजूनही अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहिले होते.

नोलन यांनी केलेल्या अभ्यासात असं आढळलं की ॲटाला साधारण माणसापेक्षा कमी, म्हणजे १० फासळ्या आहेत. त्यांनी मग रेडियोलॉजिस्ट राल्फ लॅचमन यांना ॲटाचा अभ्यास करण्यास सांगितलं. राल्फ लॅचमन यांनी तर म्हटलं की मी माझ्या उभ्या आयुष्यात असलं काही बघितलेलं नाही.

मंडळी, ‘एक्स-रे’ ने मात्र ॲटा कोण आहे हे स्पष्ट केलं. हा सांगाडा कोणत्याही एलियनचा नसून ५ महिन्यांच्या गर्भाचा होता. ॲटा एक मुलगी होती. सर्वात महत्वाचं म्हणजे ती काही प्राचीनकाळातली नव्हती तर तिला जाऊन केवळ ४० वर्ष झाली होती.

ॲटाचा सांगाडा कोणत्याही बाजूने मानवी वाटत नव्हता. याचं कारण काय असू शकेल? या उत्तरासाठी कॅलिफोर्निया विद्यापीठाचे बायोलॉजिस्ट अतुल बुट्टे यांनी ॲटाच्या जनुकीय (genome) संरचनेचा संपूर्ण अभ्यास केला. बुट्टेंच्या सहकारी संचिता भट्टाचार्य यांनी केलेल्या अभ्यासातून असं आढळलं की ॲटाच्या DNA मध्ये तब्बल ५४ बदल (mutation) होते. या बदलांचाच परिणाम म्हणून तिचं शरीर मानवी शरीरापेक्षा वेगळं दिसत होतं. यातले काही बदल हे विज्ञानाला ठाऊक होते,  तर काही नवीन होते.

संशोधनातून तिचा मृत्यू कसा झाला याच उत्तरही सापडलं. तिच्या जनुकीय बदलांमुळे तिच्यात झपाट्याने वाढ होत गेली आणि त्यामुळे तिचा आईच्या पोटात असतानाच मृत्यू झाला.

मंडळी, हे बदल का झाले, त्यामागची कारणं काय होती आणि तो ॲटाचा सांगाडा एका ओसाड गावात कपड्यात बांधून कोणी ठेवला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required