computer

आरशातून प्रतिबिंब पाडणारे १२००वर्षांहून जुने चीनचे जादुई आरसे!! यांचं रहस्य काय आहे?

चीनला रहस्यांचा देश म्हणून आख्या जगात ओळखलं जात. “चायनीज मँजिक मिरर” ही त्याच रहस्यमयी खजिन्यातील एक वस्तू आहे. ह्या आरशांच्या एका बाजूला चकचकीत असं कांस्य असतं. याचा उपयोग सामान्य आरशासारखाच केला जातो. तर दुसऱ्या बाजूला विविध आकार, अक्षरे, अंक, विविध चिन्हे ह्यांची नक्षी असते. आरशावर सूर्यकिरण पडले तर भिंतीवर आरशाच्यामागे असणारी नक्षी उमटते. जणूकाही सूर्याची किरणे समोरच्या आरशाला भेदून मागच्या नक्षीदार पृष्ठभागाचं प्रतिबिंब उमटवतात असं वाटतं. पण गंमत म्हणजे कांस्य हा धातू पारदर्शक नसतो. म्हणून ह्या जादुई आरशांविषयीचं रहस्य ही नेहमीच एक कुतूहलाची गोष्ट आहे.

(आरसा आणि आरशाची आतली बाजू)

असं म्हणतात की चीनमध्ये या जादुई आरशांची निर्मिती पाचव्या शतकापासून सुरु झाली होती. “रेकॉर्ड ऑफ एन्शंट मिरर” या जवळपास १२०० वर्षांपूर्वीच्या ह्या पुस्तकात अश्या जादुई आरशांचे रहस्य, त्यांची निर्मिती अशी सारी माहिती लिहून ठेवली होती. पण दुर्दैवाने हे पुस्तक आज हरवलेले आहे.

ह्या आरशांची निर्मिती हान राजवंशाच्या (२०६ BC -२४ AD) साम्राज्यापासून सुरु झाली. आठव्या-नवव्या दशकापर्यंत हे आरसे जादूचेच आहेत असं मानलं जात होतं. अकराव्या शतकातला राजकारणी आणि व्यासंगी विद्वान शेन कुओ ह्याने आपल्या ‘द ड्रीम पूल एसेज’ ह्या पुस्तकात ह्या आरशांविषयी वैज्ञानिक स्पष्टीकरण दिलं आहे. तो असं लिहितो की, 

“हे आरसे प्रकाशभेदक आहेत. त्यांच्या मागील भागावर प्राचीन लिपीतली २० अक्षरं आहेत. ही अक्षरं समजण्यास अगदी कठीण आहेत. हे आरसे प्रखर सुर्यप्रकाशात धरले तर मागील बाजूस असणारी अक्षरं घराच्या भिंतीवर प्रतिबिंबित होतात. भिंतीवर ती अक्षरं अजून स्पष्ट दिसतात. जणूकाही हे आरसे आपल्यामधून प्रकाशकिरण आरपार नेतात, जे बाकी इतर आरसे अजिबात करत नाहीत. माझ्या घरी असे तीन खूप प्राचीन आरसे आहेत. पण मला हे कळत नाही की बाकीचे आरसे ह्या आरशांहून पातळ असतात तरी सूर्यकिरणे त्यांच्यामधून आरपार कशी काय जात नाहीत!

प्राचीन लोकांकडे नक्कीच खास कला असणार. काही लोक ह्या आरशांच्या निर्मितीवर चर्चा करतात, त्यांच्यामते हा आरसा निर्माण करताना पुढील पातळ भागाचे आधी कास्टिंग झाले असावे, त्यानंतर मागील नक्षीदार जाड भागाचे कास्टिंग झाले असावे. ह्याचा परिणाम असा झाला असावा की पातळ भाग आधी थंड झाला असावा त्यानंतर मागील भाग उशिरा थंड झालेला असणार. म्हणूनच कांस्याच्या(आरशाच्या) पृष्ठभागावर सूक्ष्म सुरकुत्या पडल्या असणार. ह्या इतक्या सूक्ष्म असाव्यात कि त्या उघड्या डोळ्यांनी अजिबात दिसत नाहीत.” 

एक प्रसिद्ध सिद्धांत असाही आहे की आरशांच्या पृष्ठभागावरचे सूक्ष्म चढउतार मागे असणाऱ्या नक्षीसोबत समांतर आहेत. म्हणूनच जेव्हा ह्या पृष्ठभागावर सूर्यकिरण पडतात तेव्हा हाच पृष्ठभाग मागील भागावरील आकार, नक्षी भिंतीवर प्रतिबिंबित करतो. हे चढउतार उघड्या डोळ्यांना अजिबात दिसत नाहीत. हा पाहा, या फोटोवरून हा मुद्दा लगेच लक्षात येण्यासारखा आहे.

शांघाईमधल्या येथील ऐतिहासिक संग्रहालयात अश्या आरशांचे १०,००० नमुने जमा केले आहेत. त्यापैकी चारच आरशांमध्ये आजही ही जादू घडते. मागील बऱ्याच वर्षांत अनेक सिद्धांत मांडण्यात आले. चायनीज संशोधकांनी ह्या आरशांमागचं गूढ सोडवण्यात आता यश मिळवलं आहे. त्यांच्या मते ज्या भागावर अक्षरे, नक्षी ह्यांचा पॅटर्न असतो तो भाग समोरच्या आरश्याच्या भागापेक्षा जाड असतो. जेव्हा आरशाचं ओतकाम केलं जातं तेव्हा काही विशिष्ट बदल घडून येतात त्यामुळे जाड आणि पातळ भागातील वक्रतेमध्ये अतिसूक्ष्म असा फरक निर्माण होतो. हा फरक केवळ काही मायक्रोमीटर इतका सूक्ष्म असतो. उघड्या डोळ्यांना तो दिसणे शक्य नसते.

गंमत म्हणजे असे हे जादूई आणि गूढ आरसे जपान मध्येही बनवले जायचे. त्यांना ‘Makkyo’ असे म्हटले जाते. आज आपण विज्ञानाच्या मदतीने बरंच काही करु शकतो. पण साधनं आणि तंत्र नसताना प्राचीन काळातही लोकांनी अशा अद्भुत आश्चर्याच्या गोष्टी केलेल्या पाहून थक्क व्हायला होतं!

 

लेखिका: स्नेहल बंडगर

सबस्क्राईब करा

* indicates required