सीटबेल्टच्या शोधाने लाखो जीव वाचवणारा माणूस- निल्स बोहलिन!
जगभरात दररोज अब्जावधी गाड्या रस्त्यावर धावत असतील. हे सगळेच वाहन चालक अगदी काळजीपूर्वक वाहन चालवतात असं नाही. काहीजण कुठल्या तरी विचारात असतात, काही जणांनी मद्यपान केलेलं असतं, काही लोकांना अतिघाई असते जी त्यांच्यासोबत इतरांनाही संकटात टाकू शकते. रस्त्यावर आडव्यातिडव्या, सुसाट धावणाऱ्या या गाड्यांमध्ये जर सीट बेल्ट नसतील तर, काय होईल याची कल्पना तरी करवते का? नाही!
मुळात सीटबेल्ट शिवायच्या गाडीचीच आपण कल्पना करू शकणार नाही. अर्थात अनेक जण अजूनही सीट बेल्ट न लावता गाडी चालवतात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालतात ही गोष्ट वेगळी, पण तरीही सीट बेल्टचा हा शोध लावणाऱ्या माणसाचे नील्स बोहलीनचे आपण आभारच मानायला हवेत. कारण त्याच्या या एका शोधामुळे आज अब्जावधी जीव वाचले आहेत. आपल्या संशोधनाने इतक्या मोठ्या प्रमाणात जीव वाचवणारा तो पहिलाच शास्त्रज्ञ असावा.
त्याकाळी गुन्नार एन्जेलू नावाचे गृहस्थ वोल्वोचे चेअरमन होते. त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाचा कार अपघातात मृत्यू झाला होता. याच वेळी त्यांना कल्पना सुचली की कारचालक आणि प्रवासी दोघांचीही सुरक्षा वाढवण्यासाठी कार मध्ये काहीतरी नवे बदल करण्याची आवश्यकता आहे. यासाठी त्यांनी नील्स बोहलीन यांना वोल्वोसाठी काम करण्याचे आमंत्रण दिले. नील्स वोल्वोमध्ये आल्यानंतर गुन्नार यांनी अगदी त्यांच्या पाठीशी लागून हे संशोधन बनवून घेतले. शिवाय त्यांचा आणखी एक उद्देश होता की अशा प्रकारची सुरक्षा देणारी वोल्वो ही जगातील पहिली कार ठरेल. नील्स यांनी आपले संशोधन तडीस नेऊन त्यांचे स्वप्न पूर्ण केले.
नील्स वोल्वो या जगप्रसिद्ध कार निर्मिती करणाऱ्या कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत होता. आपल्या गाड्यांतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी काय काय करता येईल याबाबत संशोधन करत असताना त्याने हा व्ही आकाराच्या तीन पॉइंट्स असणाऱ्या कार बेल्ट्सचा शोध लावला. त्याने या बेल्टचा शोध लावला असला तरी या संशोधनाचे पेटंट त्याने आपल्या नावावर ठेवले नाही. १९५९ साली लावण्यात आलेल्या या शोधामुळे आजवर कित्येक प्राण वाचले असतील यांची गणतीही करता येणार नाही. महत्वाची बाब म्हणजे हे सीट बेल्ट वापरण्यासही अगदी सहज आणि सुरक्षित आहेत.
वोल्वोने पहिल्यांदा व्ही आकाराचा सीट बेल्ट आणला तरी त्यांनीही याचे पेटंट आपल्या नावावर ठेवले नाही. उलट जगातील सर्व गाड्यांना या प्रकारचे सीट बेल्ट वापरता यावेत म्हणून त्यांनी हे संशोधन जगासमोर खुले केले.
व्ही आकाराच्या बेल्टचे नुसते संशोधन करणे गरजेचे नव्हते. लोकांना ते वापरण्यास सोपे जाईल याकडेही लक्ष देणे आवश्यक होते. वाहन चालवताना किंवा प्रवास करताना या सीट बेल्टचा वापर वाढवयाचा असेल तर त्याच्या वापरत सुलभता आणि सहजता यायला हवी. याकडेही वोल्वोने लक्ष दिले. बोहलीनने जास्तीत जास्त आरामदायी, सुलभ आणि सुरक्षित सीट बेल्ट बनवण्याला जास्त प्राधान्य दिले. हा सगळा बदल काही एका रात्रीत होणं शक्य नव्हतं. छाती, कंबर आणि मांड्या तिन्ही ठिकाणी बेल्ट असावा आणि तो फारसा जाचणार नाही किंवा त्रासदायक होणार नाही याचीही काळजी घ्यायची होती. असं हे क्लिष्ट संशोधन प्रत्यक्षात उतरायला सहा वर्षे जावी लागली.
यासाठी वोल्वोने कोट्यावधी डॉलर्स खर्च केले. रस्त्यावरील अपघातांचा अभ्यास केला. १९५० आणि १९६० च्या दशकांत सीट बेल्टमध्ये त्यांनी बरेच बदल केले आणि ते गाड्यांमध्ये वापरून कितपत प्रभावी ठरतात याचा अभ्यासही केला. यातूनच आजच्या सर्वात सुरक्षित आणि वापरण्यास सोपे असणाऱ्या सीट बेल्टचा शोध लागला.
लोकांना या सीटबेल्टचा वापर करण्याची सवय लागण्यासाठी आणखी दहा वर्षे जावी लागली. तरीही त्याकाळात जर वोल्वोने सीट बेल्टमध्ये सुधारणा करण्याचे मनावर घेतले नसते तर कदाचित हे सीट बेल्ट्स आणखी दहा वर्षे उशिरा बाजारात आले असते.
आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वोल्वोने प्रयत्न केले आणि त्यांच्यामुळे जे सुरक्षा कवच आपल्याला मिळाले त्याबद्दल त्यांचे आणि नील्स बोहरीन यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
वोल्वोने या सीट बेल्टचे पेटंट घेतले असते तर इतर कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या कारमध्ये सीट बेल्ट बसवताना वोल्वोची परवानगी घ्यावी लागली असती आणि त्यासाठी त्यांना काही रक्कमही चुकवावी लागली असती. पण वोल्वोने याचं पेटंट घेण्यापेक्षा ते पेटंट-मुक्त ठेवणंच योग्य समजलं. निदान त्यांच्या या निर्णयामुळे इतर कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना अधिकच भुर्दंड तरी सोसावा लागला नाही.
वोल्वो ने हे पेटंट आपल्याकडेच ठेवले असते तर सर्वाधिक सुरक्षित कार बेल्ट देणारी ती पहिली आणि जगातील एकमेव कंपनी ठरली असती. यामुळे आपसूकच त्यांचा ग्राहक वर्ग वाढला असता. पण फक्त पैसे कमवण्यापेक्षा वोल्वोने सर्वानाच्याच सुरक्षेला प्राधान्य देण्याचं ठरवलं.
वाहन क्षेत्रात या तीन पॉइंट्सच्या सीट बेल्टने एक नवी क्रांतीच घडवून आणली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लाखो जीवांचे प्राण वाचवणाऱ्या वोल्वो आणि नील्स बोहरीन यांचं कौतुक करावं तेवढं कमीच.
महत्वाची बाब म्हणजे कार चालवताना सीट बेल्टचा वापर आवर्जून करा. हीच नील्स आणि वोल्वोप्रती खरी कृतज्ञता ठरेल. कारण लोकांचे प्राण वाचवण्यासाठीच या सीट बेल्टचा जन्म झाला आहे.
मेघश्री श्रेष्ठी




