computer

व्हेंटिलेटरला पर्याय म्हणून चक्क हेल्मेटचा वापर होतोय? हे 'ओव्हरव्हेल्म्ड' आहे तरी काय?

महिन्याभरापूर्वी क्रिस ऑस्टीन या माणसाला फारसं कोणी ओळखत नव्हतं. पण गेले काही दिवस त्याची सी-लाँग मेडिकल सिस्टीम ही छोटीशी कंपनी चर्चेत आहे. टेक्सासमधल्या या छोट्या उद्योजकाला शोधत चारी दिशांनी लोक येत आहेत. त्याच्या कंपनीचे 'ओव्हरव्हेल्म्ड ' हे हेल्मेटसारखे दिसणारे उपकरण कोवीडच्या पेशंटना श्वासोच्छ्वास करायला मदत करत आहे.
सध्या अमेरिकेत व्हेंटीलेटर्सचा प्रचंड तुडवडा आहे.  ज्या पेशंटना श्वासोच्छ्वास करण्याचा त्रास आहे, पण व्हेंटीलेटरवर ठेवावे अशी गंभीर अवस्था नाही आहे अशांना ''ओव्हरव्हेल्म्ड" जीवनदान देत आहे.

 'ओव्हरहेल्म्ड' हे नक्की काय आहे ते समजून घेऊ या.
कोवीडच्या लागण झालेल्या पेशंटची फुफ्फुसे दुर्बळ झालेली असतात. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन मास्क लावून मदत करण्यात येते. पेशंटची तब्येत फारच ढासळली असेल तर व्हेंटिलेटरची गरज भासते. बर्‍याच पेशंटना ऑक्सिजन मास्क पुरेसा नसतो, पण व्हेंटिलेटरचीही गरज नसते. अशा मध्यावस्थेत असलेल्या पेशंटना पुरेसा प्राणवायू पुरवण्याचे काम  ''ओव्हरव्हेल्म्ड" करते.

ओव्हरव्हेल्म्ड

मोटरसायकल स्वाराच्या डोक्यावर असणार्‍या हेल्मेटसारखीच या 'ओव्हरव्हेल्म्ड'ची रचना असते. त्याला जोडलेल्या नळ्यांतून ऑक्सिजनचा पुरवठा होतो. म्हटलं तर' ओव्हरहेल्म्ड' ची रचना अगदी साधी असते. 'ओव्हरव्हेल्म्ड' हे तसे नवे उपकरण नाही. पण कोवीडमुळे जेव्हा व्हेंटिलेटर फक्त अति-अत्यवस्थ पेशंटसाठी राखून ठेवण्याची गरज भासते, तेव्हा वाढलेल्या मागणीला पुरवणी म्हणून ओव्हरहेल्म्डचा उपयोग होतो आहे. इटलीत अशी उपकरणे नियमित वापरात होती. पण अमेरिकेत आतापर्यंत 'ओव्हरव्हेल्म्ड'चा वापर होत नव्हता.

डॉक्टर भक्ती पटेल यांनी २०१६ साली ऑक्सिजन मास्कच्याऐवजी  'ओव्हरव्हेल्म्ड' चा वापर  करून पाह्यला होता. एकूण ८३ पेशंटवर ऑक्सिजन मास्क वजी 'ओव्हरहेल्म्ड' वापरण्यात आल्यावर त्यांना असे आढळून आले होते की मास्क जर एकूण वेळेच्या ६१ टक्के वापरावा लागत असेल, त्या तुलनेत 'ओव्हरव्हेल्म्ड'चा उपयोग फक्त एकूण वेळेच्या १८.२ टक्के करावा लागतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर असे की पेशंटला ऑक्सिजन मास्कची गरज २४ तासांत १४ तास लागत असेल, तर 'ओव्हरव्हेल्म्ड' चा वापर २४ तासांत जेमतेम ५ तास करावा लागतो.
आता 'ओव्हरहेल्मड'ची उपयुक्तता कळल्यावर त्याची मागणी वाढली आहे. अमेरिकेतील FDA या संस्थेने या उपकरणाला मान्यता दिल्यावर जोन्स हॉपकिन्ससारख्या अनेक नामवंत हॉस्पिटलमध्ये 'ओव्हरव्हेल्म्ड'चा वापर सुरू होणार आहे. कॅनडासारख्या शेजारी देशातून पण 'ओव्हरव्हेल्म्ड'च्या ऑर्डर्स यायला सुरुवात झाली आहे.

कोरोनाच्या साथीमुळे प्रत्येक देशाला त्यांच्या आरोग्य सेवेत असलेल्या तृटी जाणवायला लागल्या आहेत. अशा आणीबाणीच्या प्रसंगी देवदूत कोणत्या रुपाने येईल हे सांगता  येत नाही असे म्हणतात हे खरेच आहे!!
सोबत आम्ही क्रिस आणि 'ओव्हरव्हेल्म्ड'चा एक व्हिडिओ जोडत आहोत तो नक्की बघा.

एरवी एका आठवड्यात काही डझन 'ओव्हरव्हेल्म्ड' ची मागणी सी-लाँग मेडिकल सिस्टीमकडे असायची. तेव्हा हा छोटासा उद्योग क्रिस आणि त्याच्या चर्चचे स्वयंसेवक आणि काही कर्मचारी मिळून सांभाळायचे. आता मागणी काही हजारांत गेल्यावर क्रिसला अनेक हातांची गरज भासते आहे. त्याच्या गावातलेच लोक पुढाकार घेऊन अंगावर पडेल ते काम करण्याची तयारी दर्शवत आहेत. काहीजणांनी तर क्रीसला लागणार्‍या कच्च्या मालाचे पैसे परभारे भरून टाकले आहेत ज्यामुळे त्याला उत्पादनाचा ताण पडणार नाही. व्हर्जिन गॅलेटीकसारख्या  अनेक मोठ्या कंपन्यांनी मदत देऊ केली आहे. क्रिस ऑस्टीन आणि त्यांचे सहकारी रात्रीचा दिवस करून जास्तीतजास्त 'ओव्हरहेल्म्ड 'चे उत्पादन करत आहेत. पण त्यांना एका मर्यादेपलीकडे जाऊन उत्पादन वाढवणे शक्य नाही. यासाठी ज्यांना 'ओव्हरव्हेल्म्ड' बनवायचे असेल, त्यांना डिझाइन विनामूल्य देण्याची क्रिसची तयारी आहे.
 
आता 'ओव्हरहेल्म्ड 'चे एक खास वैशिष्ट्य, व्हेंटिलेटरची किंमत काही हजार डॉलर असते, तर 'ओव्हरव्हेल्म्ड' फक्त १६२ डॉलरमध्ये उपलब्ध आहे. 
कृपया ही माहिती शक्य तितकी शेअर करा, कारण आपल्या महाराष्ट्रात कुठे तरी असा एखादा क्रिस असेल ज्याच्या कल्पनेच्या उपयुक्ततेकडे कोणाचे लक्ष गेले नसेल !

सबस्क्राईब करा

* indicates required