computer

आपला मेंदू काय काम करतो याचा शोध या विचित्र अपघातामुळं लागला..

माणसाचा मेंदू सुरुवातीपासूनच वैज्ञानिकांना गोंधळात पाडत आलाय. शंभर दीडशे वर्षापूर्वी आज इतकं प्रगत तंत्रज्ञान नव्हतं. तेव्हा तर हेही माहित नव्हतं की शरीराच्या भागांचं कामकाज मेंदूच्या वेगवेगळ्या भागांकडून नियंत्रित केलं जातं.

त्यावेळचा मेंदूबद्दलचा गैरसमज किंवा कमी ज्ञानात भर पडली ती एका जगावेगळ्या घटनेने. ही घटना ऐतिहासिक होती.

तारीख होती १३ सप्टेंबर १८४८. अमेरिकेच्या उत्तरेच्या वरमाँट येथे एका नवीन रेल्वे लाईनचं काम सुरु होतं. वाटेतले मोठमोठे दगड बाजूला करण्यासाठी तिथे स्फोट घडवण्याचं काम सुरु होतं. हे काम फिनस गेज करत होता.

हे काम तितकसं कठीण नव्हतं, पण धोकादायक होतं. फिनस यंत्राने एक छोटा खड्डा खणायचा. त्यात स्फोटकं भरायची आणि त्याला एका लोखंडी सळईने दाबायचं. हे काम झालं की त्यावर माती टाकली जायची. हे करत असताना एका ठिकाणी त्याने लोखंडी सळई आत टाकल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांकडे बघितलं आणि सळईवर पुन्हा एकदा दाब दिला.

त्याने असं केल्यानंतर सळई दगडाला घासली गेली आणि एक ठिणगी उडाली. या ठिणगीने खालच्या स्फोटकाने पेट घेतला आणि पुढच्या क्षणी ती ३.५ फुट इंच सळई फिनसच्या मेंदूत शिरली होती. हा पाहा फोटो.

सळई डाव्या गालातून आत शिरली होती आणि मेंदूतून आरपार निघाली होती. त्याचा डावा डोळा निकामी झाला होता.

मंडळी, पुढे जे घडलं तो चमत्कार होता. या भयंकर अपघातानंतर फिनस बेशुद्ध तर झाला नाहीच पण स्वतःच्या पायांवर डॉक्टरांपर्यंत जाऊन पोहोचला.

फिनसने पुढे जाऊन विज्ञानाच्या पुस्तकात कायमचं स्थान मिळवलं. मेंदूला झालेल्या इजेमुळे त्याचं व्यक्तिमत्व बदललं. आधीचा त्याचा शांत स्वभाव जाऊन तो रागीट झाला. त्याचा स्वभाव पूर्णपणे बदलला. त्याच्या जवळच्या माणसांना हा बदल चटकन ओळखता आला. त्यांनी म्हटलं की अपघातानंतर फिनस पूर्वीचा फिनस राहिला नव्हता. हे त्याकाळी पण विचित्र होतं आणि आजच्या काळी पण तेवढंच विचित्र आहे. फिनसवर उपचार करणारे जॉन मार्टिन हार्लो यांनी तर फिनसवर अभ्यास करून नोट्स काढले होते. आपला अभ्यास त्यांनी मॅसाचुसेट्स मेडिकल सोसायटी समोर सादर केला होता. या अभ्यासात त्यांनी या स्वभावातील बदल बारकाईने सांगितले आहेत.

मेंदू हा आपल्या स्वभाव सांभाळतो हे आज कोणीही सांगू शकेल, पण त्यावेळी फिनसने हे पहिल्यांदा पटवून दिलं होत. मेंदूच्या विशिष्ट भागाला झालेली इजा संपूर्ण व्यक्तिमत्वावर परिणाम करू शकते हे विज्ञानाने पहिल्यांदा बघितलं.

फिनसवर अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांनी पुढची अनेक वर्ष त्या एका दिवसाचा विचार करण्यात घालवली जिथून हे सर्व सुरु झालं होतं. १३ सप्टेंबर १८४८. १९४० साली न्यूरोलॉजिस्टनी फिनसच्या कवटीचं चित्र तयार केलं. या चित्रातून त्यांनी फिनसच्या मेंदूत सळई कशा प्रकारे शिरली हे तपासून पाहिलं होतं. १९८० साली वैज्ञानिकांनी फिनसच्या जतन करून ठेवलेल्या मेंदूचा सिटी स्कॅन केला. १९९० साली आणखी एक सिटी स्कॅन केला गेला पण यावेळी 3D कम्प्युटर वापरण्यात आला होता.

फिनस गेजचं पुढे काय झालं ?

मंडळी, फिनस १८६० साली म्हणजे दुर्घटनेच्या १२ वर्षांनी मरण पावला. फेफरं आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याचं कारण पण ती दुर्घटनाच होती.

पण त्याने जाण्यापूर्वी विज्ञानाला एक आदर्श केस दिली. त्या केसने आपल्या समजुती बदलल्या. मेंदूला समजून घेण्यासाठी एक नवीन मार्ग खुला झाला. याबद्दल फिनसचे आपण आभारच मानले पाहिजेत.

सबस्क्राईब करा

* indicates required