computer

'शकुंतला': एका भारतीय स्टार्ट-अप कंपनीचा खाजगी उपग्रह अवकाशात !

भारतातील इस्रो,अमेरिकेतील नासा या सरकारी संस्था अंतराळ मोहिमा राबवत असतात.अनेक शास्त्रज्ञ मेहनत घेऊन उपग्रह, तसेच मंगळ,चंद्र यांवरील मोहिमा यशस्वी करत असतात. इतर क्षेत्रांप्रमाणे याही क्षेत्रात खाजगी कंपन्यांना आपली कामगिरी दाखवण्याची संधी मिळावी अशी इच्छा अनेक स्वतंत्र शास्त्रज्ञांना वाटत होती.

अमेरिकेत एलन मस्क यांच्या स्पेस एक्स या कंपनीने नासाच्या बरोबरीच्या काही मोहिमा यशस्वी करून दाखवल्याने ज्यांना सरकारी संस्थेसोबत काम करण्याची संधी मिळत नाही, त्यांच्या आशा जागृत झाल्या होत्या.आता भारतातील पिक्सेल या कंपनीने अशीच कामगिरी करून दाखवली आहे. 

पिक्सेल या कंपनीने एलन मस्कच्या स्पेस एक्स कंपनीच्या मदतीने आपले पूर्ण क्षमतेचा खाजगी उपग्रह तयार करून तो आकाशात सोडला आहे. स्पेस एक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटसोबत हा 'शकुंतला' नावाचा उपग्रह आकाशात सोडण्यात आला आहे. 

पिक्सेल या कंपनीला या उपग्रहाच्या मदतीने जगभरातील घडामोडींचा अंदाज घेऊन त्यांचे विश्लेषण रियल टाईमला-जसे घडते त्या क्षणी- करता येणार आहे. शकुंतला नावाचा हा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडला जाणे भारतासाठी महत्वाचा आहे. खाजगी कंपनीने उपग्रह बनवून तो यशस्वी करून दाखवल्याने  जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली गेली आहे.

शकुंतला (TD-2) हा आतापर्यंत अंतराळात उड्डाण केलेल्या सर्वोच्च रिझोल्यूशनच्या हायपरस्पेक्ट्रल कमर्शिअल कॅमेऱ्यांपैकी एक आहे, ज्यामुळे ग्रहासाठी 24x7 हेल्थ मॉनिटर तयार करण्याच्या आपण एक पाऊल जवळ आलो आहोत, असे कंपनीने म्हटले आहे. 

अमेरिकेतील केप कॅनवेरल येथून SpaceX च्या ट्रान्सपोर्टर-4 मिशनवर शुक्रवारी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. कंपनीकडून सांगण्यात आले की, या प्रक्षेपणामुळे कंपनीचे जे ध्येय आहे, त्याच्या अगदी जवळ पोहचलो आहोत.

२०१७ साली पिक्सेल ही कंपनी स्पेस एक्स कडून आयोजित करण्यात आलेल्या हायपरलूप पॉड स्पर्धेत काही फायनलिस्ट स्पर्धकांपैकी एक होती. तर आता ५ वर्षांनी कंपनीने थेट स्पेस एक्स बरोबर भागीदारी करत आकाशात झेप घेतली आहे. पिक्सेलची ही कामगिरी कौतुकास्पद म्हणावी अशीच आहे. 

शकुंतला हा उपग्रह १५ किलोपेक्षा कमी वजनाचा आहे, हा उपग्रह दिसू शकणाऱ्या आणि इन्फ्रारेड स्पेक्ट्रममधून 10-मीटर प्रति पिक्सेलच्या रिझोल्यूशनसह रंगाच्या 150 पेक्षा जास्त बँडमध्ये परिभ्रमण करणारे फोटो कॅप्चर करण्यास सक्षम आहे,  पिक्सेलआधी हायपरस्पेक्ट्रल उपग्रह नासा, ईएसए आणि इस्रो अशा काही निवडक संस्थांनी प्रक्षेपित केले आहेत.

या प्रक्षेपणामुळे २०२३ च्या सुरुवातीला पिक्सेल करू पाहणाऱ्या पहिल्या वहिल्या कमर्शियल फेज सॅटेलाईटसाठी मोठा बेस तयार झाला आहे. पिक्सेल ही कंपनीने बिट्स पिलानी मधून इंजिनिअरिंग करून बाहेर पडलेले दोन इंजिनिअर क्षितिज खंडेलवाल आणि आवेश अहमद यांनी स्थापन केली आहे.

पिक्सेल कडून स्पेस एक्सच्या तोडीच्या मोहीमा होऊन भारतीय अंतराळ क्रांतीत मोठे योगदान दिले जावे अशा अपेक्षा आपण करू शकतो.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required