computer

चक्क रॉकेटने पत्रं, पाकिटे, खाद्यपदार्थ, कोंबड्या आणि साप पाठवले गेले? कुणी, कसे, कुठे आणि का थांबले हे प्रयोग?

टपाल सेवा आणि वाहतूक यांचा इतिहास हातात हात घालून चालणारा. वाहतूक तंत्रज्ञानात जसजशी प्रगती झाली तसतसे लोकांना जणू पंखच फुटले. मजा म्हणून, सहल म्हणून प्रवास करणं, नव्यानव्या प्रदेशांना भेटी देणं सुरू झालं. वाहतूक तंत्रज्ञानातल्या प्रगतीचा आणखी एक परिणाम म्हणजे पोस्टाच्या खात्याचा प्रभाव वाढला. फार पूर्वी लोक पक्षी, प्राणी यांचा संदेशांचं दळणवळण करण्यासाठी वापर करायचे, ते आता एकंदर टपालसेवेकडे संदेशवहनाचे जलद साधन म्हणून बघू लागले. विविध साधने, तंत्रे यांच्यामुळे जसजसा प्रवासाचा वेळ कमी होत गेला, तसतशी संदेश आणि पत्रे दूरच्या व्यक्तीपर्यंत कमी वेळात पोहोचू लागली. थोडक्यात, टपाल व्यवस्था जास्त कार्यक्षम झाली. नंतरच्या काळात तर प्रशांत महासागराच्या अल्याडपल्याड पत्रं पोचवण्यासाठी ट्रान्स-पॅसिफिक एअरमेलसुद्धा सुरु झाली. पण हे सगळं होण्याआधी टपालखात्याने त्या काळी उपलब्ध असलेली वाहतुकीची सर्व साधने वापरून पाहिली होती, अगदी रॉकेट्सचासुद्धा या कामी उपयोग केला होता, हे तुम्हाला माहिती आहे का?

तुम्ही सिनेमात किंवा टीव्हीवर पाहिले असेल, बाणाच्या दांड्याभोवती खलिता गुंडाळून तो बाण हवेतून इच्छित स्थळी पोहोचेल अशा बेताने सोडला जातो. मिसाईल मेलचे हे अगदी सुरुवातीचे स्वरूप. नंतर १८१० मध्ये जर्मन कवी आणि नाटककार हेनरिक व्हॉन क्लेइस्ट यांनी एका लेखात ही कल्पना जरा आधुनिक स्वरूपात मांडली. रॉकेटविज्ञान अजूनही बाल्यावस्थेत असण्याचा काळ होता तो! त्या काळी रॉकेट गनपावडर वापरून उडवले जाई आणि त्याचा जास्त करून वापर व्हायचा तो रणांगणात तोफखाना म्हणून. घोड्यावरून संदेश घेऊन जाणार्‍या माणसाला पत्र पोहोचवण्यासाठी फार वेळ लागे. त्या वेळेच्या एक दशांश वेळात किंवा अर्ध्या दिवसात रॉकेट सुमारे १८० मैलांच्या अंतरावर पत्र पोहोचवू शकत असे. हे लक्षात आले तेव्हा क्लेइस्ट फारच रोमांचित झाला.

(हेनरिक व्हॉन क्लेइस्ट)

पुढे ही कल्पना प्रत्यक्षात अंमलात आली. सर विल्यम काँग्रेव्ह नावाच्या एका ब्रिटिश संशोधकाने स्वतः एक रॉकेट डिझाइन केले. या रॉकेटचा वापर करून त्यांनी क्लेइस्टचा पत्र पोचवण्याचा सिद्धांत प्रत्यक्षात आणला. हे घडलं टोंगा इथल्या लहानशा पॉलिनेशियन बेटावर. क्लेइस्ट राहत असे तिथून इथपर्यंत अर्धी जगप्रदक्षिणा झाली असती. हे करुन तर पाह्यलं, पण उपयोगाच्या दृष्टीने पाह्यले तर हे रॉकेट फारच बेभरवशाचे होते. त्यामुळे पत्र वगैरे पोहोचवण्यासाठी त्यांचा वापर करण्याचा विचार बाजूला सारावा लागला. जवळजवळ एक शतक असंच लोटलं.

(सर विल्यम काँग्रेव्ह)

(काँग्रेव्ह रॉकेट)

१९२७ मध्ये या प्रकरणाने पुन्हा उचल खाल्ली. जर्मन भौतिकशास्त्रज्ञ -अभियंता आणि रॉकेटविज्ञान शाखेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या हर्मन ज्युलियस ओबर्थ याने या कल्पनेचा पुन्हा विचार करायला सुरुवात केली. मध्ये बराच काळ गेला आणि जून १९३८ मध्ये त्याने डॅनझिगमधील सायंटिफिक सोसायटी ऑफ एरोनॉटिक्सच्या वार्षिक बैठकीच्या प्रसंगी एक व्याख्यान दिले. तेथे त्यांनी ऑटोमॅटिक गाईडन्स असलेली लहान रॉकेट्स विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला. अशी रॉकेट्समधून सहाशे ते बाराशे मैलांपर्यंत अर्जंट पत्रं नेऊ शकतील असे त्यांचे म्हणणे होते. प्राध्यापक ओबर्थ यांच्या व्याख्यानाने जगभरात याबाबत मोठ्या प्रमाणात रस निर्माण झाला. जर्मनीमधल्या अमेरिकन राजदूतानेही याची दखल घेतली. पण या क्षेत्रात मुहूर्तमेढ रोवणारा ठरला तो दुसराच कुणी... ऑस्ट्रियाचा एक तरुण अभियंता.

(मधोमध - हर्मन ज्युलियस ओबर्थ)

हा तरुण इंजिनियर राहायचा ऑस्ट्रियन आल्प्समध्ये. त्याचं नाव होतं फ्रेडरिक श्मिडेल. हा भाग सगळा भाग डोंगराळ असल्याने तिथे पत्र पोहोचवणे किती कष्टाचे आहे हे त्याला चांगलेच माहित होते. त्याने आधीच घन-इंधनावर चालणाऱ्या रॉकेट्सवर प्रयोग केले होते आणि १९२८ मध्ये ’स्ट्रॅटोस्फेरिक बलून’द्वारे प्रयोग केले होते. हे ’स्ट्रॅटोस्फेरिक बलून’ म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ५० किमी अंतरापेक्षा जास्त उंचीवर उडणारे बलून. अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर श्मिडेलने १९३१ मध्ये रॉकेट मेलचे पहिल्यांदा प्रक्षेपण केले आणि पाच किलोमीटर अंतरावर १०२ पत्रे पोचवली. हे रॉकेट दुरूनच नियंत्रित केले गेले आणि पॅराशूटचा वापर करून खालीही उतरवले गेले. त्याच्या दुसर्‍या रॉकेटने ३३३ पत्रे वितरीत केली. हे नवा प्रकार कमालीचा यशस्वी झाला!!

(फ्रेडरिक श्मिडेल)

जर्मनी, इंग्लंड, नेदरलँड्स, अमेरिका, भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या अनेक देशांना यातून प्रेरणा मिळाली. पण सगळं सुरळीत कसं चालेल? १९३४ मध्ये एक मोठा अपघात घडला. गेरहार्ड झुकर नावाचा एक जर्मन व्यावसायिक होता. त्याने ब्रिटिशांना आपली रॉकेटस् किती वेगात-किती पत्रं-किती अंतरावर एकावेळी पोचवू शकेल हे दाखवण्याच्या प्रयत्नात एकावेळी ४,८०० पत्रांसह आपले रॉकेट लोड केले आणि स्कॉटलंडच्या एका बेटावरून ते आकाशात सोडले. हे रॉकेट आकाशात जात असताना त्याचा स्फोट झाला आणि त्यातल्या पत्रांचे जळके तुकडे समुद्रकिनार्‍यावर भरकटले. या अयशस्वी प्रात्यक्षिकानंतर झुकरला जर्मनीतून हद्दपार केले गेले. हे कमी की काय म्हणून तेथे हेरगिरी आणि ब्रिटनला सहकार्य केल्याच्या संशयावरून त्याला अटक करण्यात आली.

आता या प्रकरणात आला आणखी एक नवा शिपाई. स्टीफन स्मिथ नावाचा एक अवकाश अभियंता. याने मात्र रॉकेटद्वारे पत्रे पोहचविण्याच्या तंत्रात परफेक्शन आणले. १९३४ ते १९४४ दरम्यान स्मिथने २०० वेळा प्रक्षेपण केले. त्यापैकी ८० प्रक्षेपणांमध्ये पत्रे होती. पत्रेच काय, भात, धान्य, मसाले आणि स्थानिक पातळीवर बनवलेली सिगारेट हे सर्व असलेली खाद्यपदार्थांची पाकिटे पाकिस्तानातल्या क्वेटा येथील भूकंपग्रस्त भागामध्ये रॉकेटद्वारे पोहोचवून स्मिथने इतिहास रचला. मग त्याने त्याच्या एका रॉकेटला एक कोंबडा आणि कोंबडी एकत्र बांधले आणि या घाबरलेल्या पक्ष्यांना नदीच्या दुसऱ्या काठावर सोडले. गंमत म्हणजे घाबरलेले असूनही हे दोन्ही पक्षी ट्रिपमध्ये जिवंत राहिले आणि नंतर कलकत्ता इथल्या एका खासगी प्राणीसंग्रहालयात दान केले गेले. त्याच्या पुढच्या पार्सलमध्ये एक साप आणि एक सफरचंद होते. या विचित्र स्वभावाच्या माणसाला सिक्कीमच्या महाराजांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला, आणि त्यानेही आपले बहुतेक रॉकेट प्रयोग सिक्कीममध्येच केले.

१९५९पर्यंत अमेरिका यात मागे होती. फ्लोरिडाच्या मेपोर्टमधल्या पोस्ट खात्याने अण्वस्त्रांच्या जागी पत्रांनी भरलेले दोन कंटेनर बसवलेले रेग्युलस क्रूझ क्षेपणास्त्र नौदल स्थानकाकडे सोडले. १३,००० पौंड वजनाचे क्षेपणास्त्र ३,००० पत्रे घेऊन निघाले आणि बावीस मिनिटांनी ७०० मैल अंतरावर मेपोर्ट येथे पोचले. ही पत्रे परत घेण्यात आली, शिक्के मारण्यात आले आणि नेहमीप्रमाणेच प्रसारित करण्यात आली. ही सर्व ३,००० पत्रे म्हणजे पोस्टमास्टर जनरलने लिहिलेल्या एकाच पत्राच्या प्रती होत्या. क्षेपणास्त्र प्रक्षेपित करणार्‍या पाणबुडीतल्या प्रत्येक कर्मचार्‍याला पत्राची एक प्रत मिळाली. त्याचप्रमाणे अध्यक्ष आयसेनहॉवर आणि अमेरिकेच्या इतर नेत्यांना तसेच जगभरातील पोस्टमास्तरांना याबद्दलची माहिती मिळाली. या पत्रांच्या यशस्वी वितरणामुळे पोस्टमास्टर समरफिल्ड यांचा उत्साह वाढला. मनुष्य चंद्रावर पोहोचण्यापूर्वीच अमेरिकेतून पाठवलेली पत्रे न्यूयॉर्क ते कॅलिफोर्निया, ब्रिटन, भारत किंवा ऑस्ट्रेलिया येथे काही तासांत जाऊन पोहोचतील अशी स्वप्नं ते बघू लागले.

पण तसे व्हायचे नव्हते. रॉकेटच्या माध्यमातून पत्रे पाठवणे जाम खर्चिक होते. अमेरिकन सरकारच्या रेगुलस क्रूझ क्षेपणास्त्राची किंमत १०,००,००० डॉलर्स इतकी होती, आणि याच्या मोबदल्यात फक्त पोस्टाच्या तिकिटांच्या विक्रीतून केवळ २४० डॉलर्सचा महसूल मिळाला. मिसाईल मेल वापरण्याच्या खर्चाबद्दल पोस्ट ऑफिस किंवा संरक्षण विभाग दोघांनाही स्पष्टीकरण देता आले नाही. तोवर अशीही विमानाने एकाच रात्रीत जगभरात पत्रे वितरित करता येऊ लागली होती. तीही कितीतरी कमी खर्चात!

हा त्या कार्यक्रमाचा शेवट होता. त्यानंतर रॉकेटद्वारे पत्र पोहोचविण्याचे कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत.

 

लेखिका : स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required