computer

इलेक्ट्रीक बॅटरीवाल्या गाड्या अचानक पेट घेण्याच्या वाढत्या घटना पाहता या वाहनांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतो.

उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. तापमानात प्रचंड वाढ होत आहे. याचा फटका जसा पक्षी, प्राणी आणि माणसांना बसतो आहे तसाच तो इ-स्कूटर्सनाही बसतो आहे. इ-स्कूटर दळणवळण क्षेत्रातील एक नवी नांदी ठरेल अशी अशा वाढत असतानाच भारतात ठिकठिकाणी इ-स्कूटरने अचानक पेट घेण्याच्या घटना वाढत असल्याचे पाहून ही आशा लवकरच फोल ठरेल की काय, अशी शंका वाटत आहे.

गेल्या आठवड्यात भारतात ठिकठिकाणी ओला, ओकिनावा आणि प्युअर इव्ही सारख्या कंपन्यांच्या गाड्यांनी अचानकच पेट घेतला. यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी या गाड्यांचे असे अचानक पेट घेणे खूपच चिंतेत टाकणारे आहे. या घटनांमुळे अशा गाड्यांच्या सुरक्षिततेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. विशेषत: या इ-स्कूटरला चार्ज्ड ठेवणाऱ्या बॅटऱ्या खरच सुरक्षित आहेत की यामुळे नवे धोके निर्माण होऊ शकतात, याबद्दल प्रत्येकाच्याच मनात धास्ती आहे.
इ-स्कूटर्स पेट का घेत आहेत, हे तपशीलवार जाणून घ्या!!

मोबाईल फोन किंवा स्मार्टवॉचमध्ये ज्याप्रकारच्या लिथियम बॅटरीज वापरल्या जातात, त्याच प्रकारच्या बॅटरीज या इ-स्कूटरमध्येही वापरल्या जातात. या बॅटरीज वजनाला हलक्या आणि इतर बॅटरीजच्या तुलनेत वापरण्यास अधिक सुलभ आणि प्रभावी असल्याचे मानले जाते. पण याक बॅटरीज आता अचानक पेटू लागल्या आहेत. त्यामुळे भविष्यात यांच्यासाठी काही दुसरा पर्याय शोधावा लागणार का? हाही एक प्रश्न आहे.

रि-चार्जिंग करून वापरण्याच्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर लिथियम बॅटरीजचा वापर केला जातो. याप्रकारच्या ली-आयन बॅटरीजमध्ये एक ॲनोड, एक कॅथोड, सेपरेटर, इलेक्ट्रोलाईट आणि दोन करंट कलेक्टर वापरले जातात. यातील ॲनोड आणि कॅथोडमध्ये लिथियम वापरलेले असते. ॲनोडमधील लिथियमचे धन भरीत इलेक्ट्रोलाईट्स हे कॅथोडमध्ये नेले जातात आणि सेपरेटरच्या साहाय्याने ते पुन्हा ॲनोडमध्ये आणले जातात. लिथियमच्या या हालचालीमुळे ॲनोडमध्ये काही मुक्त संचार करणारे इलेक्ट्रॉन्स तयार होतात. हे इलेक्ट्रॉन्स पॉजिटिव्ह करंट कलेक्टरमध्ये चार्ज निर्माण करतात.

आता लिथियम बॅटरीज इतर बॅटरीजच्या तुलनेत सरस का म्हटल्या जातात ते पाहूया. याचे पहिले चांगले वैशिष्ट्य म्हणजे या वजनाला हलक्या असतात त्यामुळे स्मार्टफोन किंवा इलेक्ट्रिक गाड्यामध्ये यांचा वापर करणे सुलभ ठरते. शिवाय या बॅटरीज इतर बॅटरीजच्या तुलनेत जास्त टिकाऊ असतात. ली-आयन बॅटरीजमध्ये १५०w/hkg इतकी ऊर्जा साठवली जाते. ही ऊर्जा लेड बॅटरीजच्या तुलनेत कितीतरी पट जास्त आहे. म्हणजेच या बॅटरीज इतर बॅटरीजच्या तुलनेत जास्त परिणामकारक ठरतात. म्हणूनच इ-स्कूटर, इ-कार किंवा स्मार्टफोनचे चार्जिंग अधिक काळ टिकू शकते.
ली-आयन बॅटरीजचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे याची उच्च ऊर्जा घनता. ज्यामुळे कधी कधी या बॅटरीजचे काम बिघडते. यासाठी त्यांना एक बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम बसवली जाते. ही सिस्टीम ली-आयनच्या कामावर लक्ष ठेवते जसे की बॅटरीतील व्होल्टेज, त्यातून वाहणारी वीज याकडे लक्ष देण्याचे काम या सिस्टीमचे असते. ज्यामुळे लिथियम बॅटरीची कार्यक्षमता आणखी सुधारते.

असे असले तरी काही ठिकाणी या बॅटरीजमध्ये झालेल्या अचानक बिघाडामुळे या गाड्या पेट घेत आहेत. यामागचे कारण शोधून या बॅटरीजमध्ये काही सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्या त्वरित अंमलात आणाव्यात अशा सूचना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिल्या आहेत.

बॅटरीचे चार्जिंग कमी झाल्याने, तर कुठे कुठे बॅटरीजना सेफ्टीसाठी वापरला जाणारा इंन्शुलेशन टेपच वापरला न गेल्याने अशा घटना घडल्याचे समोर आले असले तरी, या बॅटरीजची कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढवणे गरजेचे असल्याचे या घटनांवरून स्पष्ट होते.
तूर्तास तरी इ-स्कूटर आणि त्यांच्या बॅटरीज या चिंतेचे कारण बनल्या आहेत एवढे नक्की.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required