computer

जांभई घेताना लाळ का उडते? हे आहे वैज्ञानिक कारण !!

आपल्या शरीरात अनेक घडामोडी किंवा हालचाली घडत असतात. त्यात बऱ्याचश्या मेंदूच्या नियंत्रणाखाली असतात तर काही अचानक घडतात ज्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. त्या क्रिया अगदी निरुपयोगी वाटतात. जसं कधीकधी बोलताना अचानक तोंडातून लाळ फवारली जाते. जांभई देताना तर बऱ्याचदा असा अनुभव येतो. कंटाळा आला की आपण जांभई देतो किंवा झोपेतून उठल्यावर जांभई देतो पण अचानक कधी लाळ बाहेर उडते आणि समोर कोणी असेल तर फार विचित्र वाटतं. असं का घडतं?

जेव्हा अशी लाळ फवारली जाते त्या क्रियेला ग्लिकिंग  (Gleeking) म्हणतात. ग्लिकिंग म्हणजे साप जसा त्याच्या तोंडातून विष फवारल्यावर ते विष लांबपर्यंत उडतं तसंच आपल्या तोंडातूनही लाळ उडते. आपण काही आंबट पाहिल्यावर किंवा खाल्यावरही लाळ उडते. आपण म्हणतो ना तोंडाला पाणी सुटले तेव्हा मोठ्या प्रमाणात लाळ आपल्या जिभेखाली स्त्रवली जाते आणि तिथे साठते.

तोंडात येणारी लाळ तयार करणाऱ्या ग्रंथींना ‘लाळग्रंथी’ म्हणतात. लाळ तयार करणाऱ्या ग्रंथी अनेक आहेत. जर तुम्ही आरश्यात जीभ वरच्या बाजूला वळवून पाहिली तर अनेक लाळग्रंथी दिसतील. जर जीभ वरच्या बाजूला हलवली तर या लाळग्रंथीवर दाब दिला तर ग्लिकिंग होते. जर तोंड मोठं उघडून अजून मोठा 'आ' केला तर ही लाळ अगदी काही फुटापर्यंत उडू शकते.

आपल्या तोंडात अनेक स्नायू असतात. जेव्हा आपण तोंडाचा उपयोग बोलण्यासाठी किंवा खाण्यासाठी करतो तेव्हा आपले या जिभेवर नियंत्रण असते. जिभेखालील लाळग्रंथीवर दाब असतो. पण अचानक जांभई येते आणि जिभेच्या खालचे पाणी अचानक उडते आणि तोंड उघडे असल्याने बाहेर उडते. हे बऱ्याचदा आपल्या नियंत्रणात नसते.

समजा दोनदा किंवा तीनदा लागोपाठ जांभई दिलीत तर दरवेळेला ही लाळ उडत नाही कारण हे लाळेची नलिका भरल्याशिवाय हे घडत नाही. त्यामुळे आजूबाजूला लोक असतील तर जांभई देताना जरा काळजी घ्या, शिंकताना जसं तोंडावर आपोआप रुमाल ठेवतो तसं जांभई देताना ही तोंडावर हात असणं गरजेचं आहे नाहीतर आपल्यालाच लाज वाटेल.

हे विज्ञान तुम्हाला माहित होतं का? नसेल माहित तर ही नवीन माहिती कशी वाटली तुम्हाला? कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required