computer

निसर्ग नि मानवाचे हित पणाला लावणार्‍या या वैज्ञानिकाचा बळी त्यानेच शोध लावलेल्या यंत्राने घेतला!! जाणून घ्या याचे उपयोगी मानले गेलेले हानीकारक शोध!!

उकडतंय? एसी ऑन करा! बाहेर खूप ऊन आहे ना? अरे मग उघडा फ्रिज, मस्तपैकी गार पाण्याची बाटली ओठांना लावा. ती पाण्याची गार धार घशातून पोटात उतरत जाताना किती ‘आहा ssss’ वाटतं ना? अशा वेळी कळत नकळत आपण हे शोध लावून आपलं आयुष्य सोपं करणारे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचे आभार मानतो की नाही? पण आपलं आयुष्य सुकर होणं या स्वार्थी विचारापलीकडं जाऊन आपण कधी गंभीरपणे विचार केलाय का? आपण नक्की कशाची किंमत देऊन हे सुख मिळवत आहोत?

चला तर वाचू या थॉमस मिगेली (ज्यु) या शास्त्रज्ञाची कहाणी. यानं असे काही शोध लावले की त्यातून माणसाच्या काही समस्यांवर उत्तरं जरुर मिळाली, पण बदल्यात पर्यावरणाची अपरिमित हानी झाली. निसर्गाच्या असंतुलनाचा धोका पत्करत लावलेले हे शोध खरंच इतके अपरिहार्य होते का? असाच प्रश्न आज मनात उभा राहतो.

या शोधांची सुरुवात झाली जनरल मोटर्सच्या फॅक्टरीत! थॉमसने वाहन चालवताना होणार्‍या इंजिन नॉकिंगच्या समस्येवर उत्तर शोधलं. त्याकाळी कारच्या इंजिनातील पेट्रोलचे ज्वलन नीट न झाल्याने गाडी सुरु करताना कर्कश्श आवाजाने सर्वच त्रस्त होते. मिगेली तेव्हा जनरल मोटर्स कार कंपनीमध्ये चार्ल्स केटरिंग बरोबर काम करत होता. चार्ल्सने इलेक्ट्रिक स्टार्टरचा शोध लावला होता आणि त्याने मिगेलीवर 'कार नॉकींग'वर उपाय शोधण्याची कामगिरी सोपवली. अनेक प्रयोगाअंती मिगेलच्या लक्षात आले की पेट्रोलमध्ये टेट्राइथाइल लेड(TEL) मिसळल्यास हा आवाज येत नाही. कसलाही आवाज न होता रस्त्यावरून शांततेत पळणारी वाहने ही मिगेलने दिलेली वैज्ञानिक भेट लोकांना खूप आवडली आणि लोकांच्या प्रशंसेस तो पात्र ठरला. पण लवकरच हे सिद्ध झालं की हा शोध हवा प्रदूषित करत आहे. हवा विषारी बनवत आहे. पेट्रोलमध्ये मिसळलेला शिसे (लेड) हा धातू श्वसनमार्गातून दीर्घ काळ शरीरात स्वीकारल्याने जनरल मोटर्स कंपनीमधील कित्येक कर्मचाऱ्यांचा मृत्यूदेखील झाला. रोममध्ये सापडलेल्या कही जुन्या कागदपत्रांवरून हे सिद्ध झाले होते की शिसे हा धातू अत्यंत विषारी असून त्याने माणसे वेडी होऊ शकतात किंवा मरुही शकतात. एवढे सगळे माहीत असूनही केटरिंग आणि मिगली यांनी आर्थिक फायद्यावर लक्ष केन्द्रित करून त्यांच्या या शोधाची जाहिरातबाजी केली. यासाठी खूप जास्त पैसे मोजावे लागत नव्हते, शिवाय लोकाना हवं ते देण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत याचा त्यांनी दावा केल्याने आरोग्यास धोका या मुद्द्यावर फारशी चर्चाच झाली नाही.

लिड म्हणजेच शिसे हे आरोग्यास कसे धोकादायक नाही हे सिद्ध करण्यासाठी मिगलीने एक मिनिटासाठी तो श्वासात भरुन घेतला होता नि त्यातून पुरता बराही झाला नव्हता. त्याचवेळी केटरिंगशी फोनवर बोलता बोलता मिगेली म्हणाला, “तुला कल्पना आहे आपल्याला किती पैसे मिळतील? २०० डॉलर्सहून जास्त!!!” हे उद्गार या स्वार्थी विचाराचे साक्ष देतात.
पैसा नि त्याबरोबर येणार्‍या सुखसोयींची स्वप्ने इतकी चमकदार असतात की माणसाची विवेकबुद्धि आंधळी होते.

जाहिरात करताना शिसे हा शब्दच वापरला गेला नाही. पर्यायाने लोक सावध झालेच नाहीत. इथील या नावाने हे प्रॉडक्ट प्रथम १९२३ मध्ये डेटॉन येथे विकले गेले. १९९६ मध्ये त्याच्या विक्रीवर बंदी आली, पण तोवर अपरिमित हानी झाली होती. श्वासातून प्रवेश करत अंतर्गत अवयवांवर हल्ला चढ़वत या विषारी वायूने लोकांच्या मानसिकतेवर परिणाम केला. तरुण पिढी आक्रमक नि हिंसक बनली. लहान मुलांनी केलेल्या गुन्ह्यात वाढ झाली. अपरिपक्व वयात मुली गरोदर राहण्याचे प्रमाण वाढले. पण मिगेली थांबला नाही. एवढा हाहा:कार माजवल्यानंतर देखील मिगेलीने दुसर्‍या शोधाकडे लक्ष वळवले.

१९२० च्या दरम्यान वापरल्या जाणार्‍या रेफ्रिजरेटरमध्ये वायूगळतीचा धोका जास्त होता. त्यामुळे त्यांचा वापर धोकादायक झाला होता. मिगेलीला आता असा वायू शोधायचा होता जो ज्वलनशील नाही आणि श्वासातून शरीरात गेल्यास अपायकारक नाही. ध्येयप्रेरित मिगेली तीन दिवस बैठक मारून बसला आणि पुन्हा एकदा निर्मिती झाली अशा शोधाची ज्याने आणखी काही बळी घेतले शरीर नि मनःस्वास्थ्याचे! घरगुती रेफ्रिजरेटर आणि एसीमध्ये त्याने क्लोरोफ्लुरोकार्बन (CFC) वापरायचे ठरवले!!

नेहमीप्रमाणे आर्थिक फायद्यावर नजर ठेवून असणार्‍या कंपन्यांनी ही संधीदेखील सोडली नाही. CFC सुरक्षित आहे हे सिद्ध करण्यासाठी मिगेलीने तो वायूही श्वासात भरून घेतला आणि जळणाऱ्या मेणबत्तीवर सोडून ती मेणबत्ती विझवली. मिगेली सर्वांच्या नजरेत हीरो ठरला. १९४१ मध्ये त्याला प्रतिष्ठेचा प्रिस्टले अवार्ड देऊन गौरवण्यात आले. अमेरिकन केमिकल सोसायटीचा अध्यक्ष म्हणून त्याची नियुक्ती देखील करण्यात आली.

परन्तु CFCचा वापर हा पर्यावरणास हानीकारक होता. अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासून आपले रक्षण करणार्‍या वातावरणातील ओझोनच्या थराचे या वायूमुळे भरून येणार नाही असे अतोनात नुकसान झाले. अजूनही पृथ्वी ग्रह याचे दुष्परिणाम भोगत आहे.

आयुष्याच्या शेवटी करावे तसे भरावे याची प्रचीती मिगेलीला आली. नियतीचा न्याय कठोर असतो. रासायनिक शोधांवरून मिगेलीने आपले लक्ष तांत्रिक शोधाकडे वळवले. पोलिओ आणि पक्षाघात यामुळे त्याचे शरीर जर्जर नि अधू झाले होते. छोट्या छोट्या गोष्टींसाठी तो इतरांवर अवलंबून राहू लागला होता. आपल्याला कोणाचीही मदत न घेता बेडवरून उठता यावे म्हणून त्याने एक यंत्र शोधले. २ नोव्हेंबर १९४४ ला असेच बिछान्यावरून उठण्याच्या प्रयत्नात त्याने शोध लावलेल्या यंत्राच्या चेनचा त्याच्या गळयाभोवती फास बसून त्याचा मृत्यू झाला.

आपला शोध मानव जातीस कल्याणकारी नाही याची कल्पना असताना आपल्या बँकेत हिरव्या नोटा जमा व्हाव्यात म्हणून निसर्ग नि सामान्य माणसाचे हित पणाला लावणार्‍या या वैज्ञानिकाचा बळी त्यानेच शोध लावलेल्या यंत्राने घ्यावा हे दुर्दैव म्हणायचे की नियतीचा न्याय?

 

राजेश्वरी कांबळे

सबस्क्राईब करा

* indicates required