computer

भेटा अवकाशात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिलेला... जाणून घ्या तिचा आजवरचा प्रवास!!

भारतात अवकाशात गेलेल्या लोकांबद्दल मोठा आदर आहे आणि तो असायला पण हवा. अनेक विकसित देशांप्रमाणेच भारताने स्वातंत्र्यानंतर अवकाश तंत्रज्ञानात घेतलेली झेप डोळे दिपवणारी आहे. इतर क्षेत्रांप्रमाणे याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. भारतात आकाशात गेलेली दोन नावे प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे राकेश शर्मा आणि दुसरे कल्पना चावला. आजवर आकाशात जाण्याचा मान कल्पना चावलांच्या रूपाने फक्त एकाच महिलेला मिळाला आहे. पण यात आता अजून एक नाव जोडले गेले आहे.

सिरीशा बांदला या अवकाशात जाणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला ठरणार आहेत. व्हिएसएस युनिटीच्या ६ अंतराळवीरांसोबत ११ जुलै रोजी बांदला या आकाशाच्या दिशेने झेप घेणार आहेत. संशोधक म्हणून त्या या टीमसोबत काम करणार आहेत. बांदला यांनी स्वतः या गोष्टीची माहिती ट्विटरवरून दिली आहे.

गेले काही दिवस जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अमेझॉनचे मालक जेफ बेझोस हे आकाशात जाणार म्हणून चर्चा आहे. पण त्यांच्याही आधी सर्व तयारी पूर्ण करत ब्रान्सन कंपनीने गुरुवारी या मिशनची घोषणा केली. या टीमसोबत ब्रान्सन कंपनीचे मालक रिचर्ड ब्रान्सन हे पण आकाशात जाणार आहेत. या सर्वांना घेऊन जाणारे रॉकेट मेक्सिकोहून लाँच केले जाणार आहे.

सिरीशा बांदला यांचा जन्म आंध्रप्रदेशातील गुंटूर येथे झाला होता. टेक्सास येथे त्या लहानाचा मोठ्या झाल्या आहेत. सुरुवातीपासून अवकाशाबद्दल उत्सुकता असल्याने त्यांनी Purdue विद्यापीठातून Aeronautical - Astronautical इंजिनिअरिंग पूर्ण केली. यानंतर त्यांनी जॉर्ज वाशिंग्टन विद्यापीठातुन एमबीए केले.

त्यांनी commercial spaceflight federation आणि L 3 communication येथे ऐरोस्पेस इंजिनिअर म्हणून काम केले आहे. त्याचप्रमाणे त्या अमेरिकन एस्ट्रोनॉमिकल सोसायटी आणि फ्युचर स्पेस लिडर्स फाउंडेशनच्या संचालक मंडळात सुद्धा त्यांचा समावेश आहे.

सिरीशा यांच्या घरातच संशोधनाचा वारसा आहे. त्यांचे आजोबा भारतात कृषी वैज्ञानिक आहेत, तर वडील डॉ. मुरलीधर बांदला हे ही एक वैज्ञानिक आहेत. एवढ्या मोठ्या काळानंतर भारतीय महिला अवकाश मोहिमेचा भाग बनत आहे ही गोष्ट भारतासाठी मोठ्या अभिमानाची आहे.

 

आणखी वाचा:

स्त्रियांना या ७ गोष्टी करण्याची परवानगी नव्हती!! काही परवानग्या तर गेल्या १० वर्षांत मिळाल्या आहेत..

सबस्क्राईब करा

* indicates required