computer

प्लास्टिकच्या थैलीचा कचरा हा या कंपनीचा कच्चा माल आहे- 'थैली'वाले आशय भावे नेमके काय करतात ?

प्लास्टिक पर्यावरणाला किती घातक आहे हे वारंवार सांगितले जाते. त्याचा वापर कमी व्हावा म्हणून कडक कायदेही आहेत. पण तरीही काही वस्तूंना प्लास्टिकशिवाय पर्याय नाही त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर सर्रास केला जातो. प्लास्टिक फेकण्यापेक्षा त्याचा पुनर्वापर कसा होईल यावर संशोधन चालू असते. तुम्ही प्लास्टिकपासून पेट्रोल बनवतात हे ऐकलेच असेल आणि आता एका भारतीय स्टार्टअप कंपनीने प्लास्टिकच्या कचऱ्यापासून स्निकर्स म्हणजे बूट बनवले आहेत. हे कसे बनवले जातात याविषयी आपण माहिती घेऊयात.

२३ वर्षांचे आशय भावे हे याचे संस्थापक आहेत. त्यांनी 'थैली' नावाची कंपनी जुलै २०२१ मध्ये सुरू केली. प्लास्टिकचा अश्या अनोख्या पद्धतीने पुनर्वापर करून ते पर्यावरणाला हातभारच लावत आहेत. कंपनीचे थैली हे नाव प्लास्टिकच्या पिशव्यांसाठीच्या हिंदी शब्दावरून ठेवण्यात आले आहे. त्यांच्या बुटाची एक जोडी १० पिशव्या आणि १२ बाटल्यांपासून बनविली जाते. हे बूट अत्यंत टिकाऊ असून जगभरात यांना मागणी आहे. थैलीच्या कारखान्यात १७० लोक काम करतात. तीन वेगवेगळ्या कंपन्यांसाठी हे शूज बनवले जातात. दर आठवड्याला जवळजवळ १५,००० जोड्या बनवण्यात येतात. हे बूट जगभरात $110 (सुमारे ₹८,०००) रुपयांत विकले जातात.

प्लास्टिकचे स्नीकर्स कसे बनवले जातात?

प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि प्लास्टिक कचरा "ट्रायोटॅप टेक्नॉलॉजीज" नावाच्या कंपनीकडून घेतला जातो. या पिशव्या कोणत्याही रसायनाशिवाय गरम पाण्यात स्वच्छ केल्या जातात आणि नंतर वाळवल्या जातात. नंतर साध्या हीटिंग टेक्नॉलॉजीचा म्हणजे प्लास्टिक गरम करून वापर करून "थॅलीटेक्स" (ThaelyTex) तयार केले जाते. यात कोणतेही रसायन टाकले जात नाही. त्यापासून मग वेगवेगळ्या आकाराचे बूट बनवले जातात. १०-१२ पिशव्या वापरून शूजची एक जोडी तयार होते. हे बूट आपण नेहमी जे बूट वापरतो अगदी तसेच दिसतात. हे बूट कचऱ्यापासून बनवलेले आहेत हे कळणारही नाही. याच्या लेसदेखील प्लास्टिकचा पुनर्वापर करून बनवल्या जातात. सर्वात विशेष म्हणजे हे बूट ज्या बॉक्समध्ये दिले जातात, हे बॉक्स ही पर्यायवरणपूर्वक कागदापासून बनवला जातो. या बॉक्सेसमध्ये रोपांच्या बिया असतात. बिया पेरून नवी रोप उगवता येतात

जगात फुटवेअर उद्योग हा $७० अब्ज पेक्षा जास्त किमतीचा आहे. यातही Adidas, Nike आणि Reebok सारख्या मोठ्या कंपन्यांची मक्तेदारी आहे, त्यामुळे कोणत्याही नवीन फुटवेअर उद्योगासाठी आपले पाय रोवणे तसे कठीण आहे. परंतु आशय भावेंसारखे तरुण उद्योजक यातून नफा कमवत आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्लास्टिक कचऱ्याचे अत्यंत टिकाऊ शूजमध्ये रूपांतर करणाऱ्या या विलक्षण स्टार्टअपबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमचे विचार आमच्यासोबत जरूर शेअर करा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required