computer

सुंदर पिचाईने फिजिक्समध्ये शून्य मार्क्स मिळवलेल्या मुलीचं कौतुक का केलंय ?

परीक्षेत चांगले मार्क मिळवण्याचं मुलांवर प्रचंड दडपण असतं. थ्री इडियट्सच्या भाषेत सांगायचं तर चांगले मार्क्स नाही मिळाले तर चांगली नोकरी नाही मिळणार, चांगली नोकरी नाही मिळाली तरी कोणता बाप आपली मुलगी देणार आहे?

तर, आता परिस्थिती थोडी सुधारली आहे. परिक्षेत चांगले मार्क्स मिळवण्याचं जे प्रेशर मुलांवर पूर्वी होतं ते आता कमी झालंय. परीक्षेत कमी मार्क्स मिळाले म्हणजे मुलाचं भविष्यात काहीच होणार नाही हा गैरसमज दूर होतोय.

आज आम्ही जी गोष्ट सांगणार आहोत ती सुद्धा एका ‘ढ’ विद्यार्थिनीची आहे. तिने फिजिक्समध्ये शून्य मार्क्स मिळवले होते, पण आज तिचं कौतुक चक्क गुगलचा CEO सुंदर पिचाई करतोय.

त्या विद्यार्थिनीचं नाव आहे सराफिना नॅन्स. वय  वर्ष २६. तिने चार वर्षापूर्वी क्वांटम फिजिक्सच्या परीक्षेत शून्य मार्क्स मिळवले होते. शून्य मार्क मिळवले म्हणजे कोणालाही वाटेल की या विषयात त्या विद्यार्थ्याचं काहीही होऊ शकत नाही. सराफिनाने या समजुतीला फाटा देत तोच विषय पुन्हा घेतला आणि आज ती खगोलशास्त्रात (astrophysics ) पीएचडी करत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सारख्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठात  ती शिकत आहे. एवढंच नाही तर ती अमेरिकेतल्या National Science Foundation ची सदस्य झाली आहे.

सराफिनाने क्वांटम फिजिक्स सोडण्याचा निर्णय घेतला होता, पण तिने जिद्दीने त्या विषयावर अभ्यास केला. तिच्या जिद्दीमुळेच आज तिला यश मिळालं आहे.

सराफिनाच्या प्रेरणादायी कथेने जगभरातील लोकांना तर प्रोत्साहन दिलंच पण मातब्बर लोकांकडून कौतुक पण  मिळवलं. गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी सराफिनाचं कौतुक केलं आहे. सुंदर पिचाई यांनी केलेलं ट्विट पाहा.

मंडळी, मेहनत आणि जिद्द अंगी असली की काहीही अशक्य नसतं हे सराफिनाने सिद्ध केलंय. तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या.