computer

चक्क मातीच्या फरशांनी समुद्रातील प्रवाळ कसे वाढवले जात आहेत? ही नवीन पद्धत एकदा पहाच !!

हवामानातल्या बदल मानवी जीवनासारखाच सागरी जीवनावरही बराच परिणाम होतो. इतर सर्व प्रदूषणांप्रमाणे जल प्रदूषण तर नेहमीच होत आले आहे. यामुळे कोरल रिफ्स म्हणजेच प्रवाळ खडक किंवा प्रवाळ बेटांचे अस्तित्व झपाट्याने कमी होत आहे. या प्रवाळ खडकांमध्ये हजारो सागरी जीव राहतात. हे प्रवाळ खडक सामान्यतः ते समुद्रात आपोआप बनतात आणि वाढतातही. पण गेल्या काही वर्षांपासून असे खडक बनण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्याचा परिणाम सागरी जीवांवर होत आहे. म्हणूनच हाँगकाँग युनिव्हर्सिटीच्या (एचकेयू) आर्किटेक्ट्स आणि सागरी वैज्ञानिकांनी समुद्रात प्रवाळ खडक पुन्हा तयार करण्यासाठी एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. या टीमला असा विश्वास आहे की या पद्धतीमुळे प्रवाळ खडकांचे पुनरुज्जीवन होऊ शकते. नक्की हे लोक काय करत आहेत हेच आज  समजून घेऊयात.

प्रवाळ खडकांत समुद्रात आढळणाऱ्या छोट्या जीवांच्या वसाहती असतात. या वसाहती स्वच्छ पाण्यात चांगल्या वाढतात. बहुतेकदा त्यांना "समुद्रांच्या रेनफोर्डस्" असे म्हणतात. एचकेयू टीमने प्रवाळ पुनर्संचयनासाठी नोव्हल 3 डी प्रिंटेड रीफ टाइल्स म्हणजेच फरशा तयार केल्या आहेत. या फरशा चिकणमातीच्या आहेत. सध्याच्या प्रयोगानुसार त्या होई हा वान मरीन पार्कमध्ये ठेवल्या गेल्या आहेत. या मानवनिर्मित किंवा कृत्रिम 3 डी प्रिंटेड रीफ टाइल्स प्रवाळ वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करतात. या फरशांची निर्मिती समुद्री वातावरण लक्षात घेऊनच झालेली आहे. तसेच यात वापरलेली सामग्री ही पर्यावरणास अनुकूल आहे. होई हा वान मरीन पार्कमध्ये ४० चौरस मीटर जागेवर या प्रयोगातल्या प्रवाळ म्हणजेच कृत्रिम रीफ टाइल्सचे ४०० तुकडे असलेले स्लॅब ठेवण्यात आले आहेत.  

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पृथ्वीवरचा प्रत्येक जीव तितकाच महत्त्वाचा ठरतो. साहजिकच यात लहानसहान समुद्री जीवही येतातच. या कारणामुळे प्रवाळ खडक समुद्री परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ठरतात. वादळ, पूर आणि उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी बऱ्याच मत्स्य प्रजाती या प्रवाळ बेटांचा उपयोग करतात. हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर, गेल्या काही वर्षांत हाँगकाँगमध्ये प्रवाळ खडकांची संख्या कमी झाली आहे. ग्रीन पॉवर या हाँगकाँगच्या पर्यावरण गटाच्या म्हणण्यानुसार गेल्या दशकभरात साई कुंगच्या आयलँडमध्ये प्रवाळांची संख्या सुमारे ८० टक्क्यांनी कमी झाली आहे. हळूहळू ती नष्ट होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे. म्हणून शास्त्रज्ञांनी हा नवीन प्रयोग करायचा विचार केला. पुढील दोन वर्षांत संशोधक या कृत्रिम 3D टाइल्समध्ये प्रवाळांच्या वाढीचे निरीक्षण करतील.

वैज्ञानिकांना आशा आहे की हा प्रकल्प हाँगकाँगमधील सागरी जीवन पुनरुज्जीवित करण्यास मदत करू शकेल. हा प्रयोग यशस्वी झाला तर इतर ठिकाणीही हे तंत्र वापरून प्रवाळ खडकांच्या वाढ, संगोपन आणि पुनरुज्जीवनास चांगलाच हातभार लागेल. 

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required