हा ‘आईस एग’ काय प्रकार असतो ? हे बर्फाचे गोळे आले कुठून ?

मंडळी, फोटोत दिसणारे अंड्यासारखे बर्फाचे गोळे हे ‘आईस-एग’ नावाने व्हायरल होत आहेत. फिनलंडच्या किनाऱ्यावर बर्फाचा हा नवीन प्रकार पाहायला मिळतोय. आता आपल्याला असं वाटेल की बर्फाळ हवामानाच्या देशांमध्ये असे प्रकार घडतच असतील, पण फिनलंडच्या लोकांच्या मते त्यांनी कधीच असं काही बघितलेलं नाही. हे त्यांच्यासाठी पण रहस्य आहे.
आईस एग म्हणजे बर्फाची अंडी हे नक्की आहे तरी काय ?
मंडळी, आईस-एग बनण्याची प्रक्रिया एका खास वेळेत होते. हे नेहमीच घडतं असं नाही. यासाठी पाण्याचं तापमान जवळजवळ गोठण्याच्या बिंदूपर्यंत आलेलं असावं लागतं आणि हवेचं तापमान शून्य अंश सेल्सियसच्या थोडं खाली असावं लागतं. तसेच हवा चांगली खेळती असावी लागते. किनाऱ्यावर रेती किंवा दगड असावे लागतात.
हे आईस एग्स गाळ जमा झालेल्या जागी किंवा दगडांच्या भागात तयार होतात. या भागात असलेलं पाणी थंड हवामानात गोठायला सुरुवात होते आणि वाऱ्यामुळे त्यांना मोठाल्या अंड्याचा आकार येतो. समुद्राच्या पाण्याने हे गोळे किनाऱ्यापर्यंत येतात आणि तोवर त्यांचा आकार चांगलाच वाढलेला असतो.
हा प्रकार सगळीकडेच होतो असे नाही. त्यासाठी लागणारं हवामान अनेक वर्षातून एकदा येतं. चला तर आईस एगचे काही भन्नाट फोटो पाहूया.