computer

हे १३ प्राणी अन्नाशिवाय कित्येक महिने आणि वर्षे जगू शकतात??

उत्क्रांतीच्या प्रक्रियेत प्राण्यांमध्ये वेगवेगळे बदल होत गेले. त्यातलाच एक बदल होता चयापचय क्रियेचा. हा बदल परिस्थितीनुसार होत गेल्याचं दिसून येतं. उदाहरणार्थ, हिमवर्षाव सरू झाल्यानंतर अस्वल हायबरनेट म्हणजे सुप्तावस्थेत जातात. या काळात त्यांची हालचाल संथ होते आणि ते जवळजवळ ३ महिने अन्नाशिवाय जगू शकतात. हिमवर्षावात अन्न मिळत नसल्यामुळे वर्षानुवर्षांच्या उत्क्रांतीतून अस्वलाच्या शरीरात बदल होत गेले आहेत. त्याचाच हा परिणाम आहे.

अशा प्रकारे पचनक्रिया संथ करण्याची आणि हालचाल मंदावण्याची क्षमता अनेक प्राण्यांमध्ये आढळते. म्हणून तर या पृथ्वीवर अन्नाशिवाय जास्तीत जास्त ३० वर्षं जगणारे प्राणी अस्तित्वात आहेत. याच्या विरुद्ध बाजूला असेही काही प्राणी आहेत जे २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ अन्नाशिवाय राहू शकत नाहीत. यात माणसाचाही समावेश होतो.

याबद्दल आणखी माहिती शोधली असता आम्हाला असे १३ प्राणी आढळले आहेत जे अन्नाशिवाय जास्तीतजास्त काळ जगू शकतात. चला तर त्या १३ प्राण्यांची ओळख करून घेऊया.

१. मांजर - २ आठवडे

मांजराची एकूण पचन संस्था आणि तिचं अन्न ग्रहण करण्याची क्षमता बघता ती २ आठवडे अन्नाशिवाय जगू शकते.

२. उंट - २ महिने

उंटाच्या पाठीवर असलेल्या कुबडामध्ये मेद (Fat) साठवलं जातं. जेव्हा अन्नाची कमतरता असते तेव्हा हे मेद उंटासाठी जीवनदायी ठरतं. या आधारे उंट २ महिने अन्नाशिवाय जगू शकतो.

३. ग्रेट व्हाईट शार्क - ३ महिने

शार्कचं एका वेळचं अन्न इतकं प्रचंड असतं की त्याला पुढचे ३ महिने अन्नाची गरज भासत नाही. आणखी एक गम्मत सांगतो. शार्क वर्षभरात ११ टन अन्न पचवतो.

४. अस्वल - ३ महिने

अस्वल जवळजवळ ३ महिन्याच्या काळासाठी निष्क्रिय होतात. या काळात त्यांना अन्न, पाणी कशाचीही आवश्यकता नसते. एवढंच नाही, तर हालचालही न करता आणि मलमूत्र विसर्जित न करता ते जगू शकतात. 

५. पेंग्विन - ३ महिने

पेंग्विन प्राण्यांत नर पेंग्विनकडे अंडी उबवण्याची जबाबदारी असते. या काळात तो अन्नाशिवाय ३ महिने आपल्या जागी स्थिर राहतो. 

६. व्हेल - ६ महिने

व्हेल म्हणजे देवमासा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जे अन्न खातो ते चरबीच्या रूपाने साठवून ठेवतो. या चरबीच्या आधारे देवमासा ६ महिने अन्नाशिवाय राहू शकतो.

७. अजगर - ६ महिने

अजगराच्या पोटातली चयापचय क्रिया अत्यंत मंद गतीने होत असते. याचे दोन फायदे होतात. एकतर उर्जा वाचते आणि दुसरं म्हणजे एकदा भक्ष्य खाल्ल्यानंतर पुढचे ६ महिने अन्नाशिवाय राहता येतं.

८. गॅलापागोस कासव - १ वर्ष

अजगराप्रमाणे गॅलापागोस कासवांची चयापचय क्रिया मंद असते. याखेरीज हे कासव आपल्या शरीरात पाण्याचा साठा करू शकतात. म्हणून त्यांना १ वर्ष अन्न पाण्याविना राहता येतं.


 

९. विंचू

विंचू  एकावेळी त्यांच्या वजनाच्या एक तृतीयांश एवढं अन्न खातात. त्यामुळे होतं काय, की त्यांची चयापचय क्रिया मंद होते आणि त्यांना अन्नाशिवाय जास्त काळ जगता येतं.

१०. बेडूक - १ वर्ष

पावसाळ्यानंतर बेडूक कुठे जातात प्रश्न पडला असेल ना तुम्हाला ? बेडूक निष्क्रिय अवस्थेत चिखलाखाली राहू शकतात. हा काळ जवळजवळ १ वर्ष एवढा मोठा असू शकतो. याकाळात ते आपल्या साठवलेल्या उर्जेचा  वापर करून अन्नाशिवाय जगू शकतात.

११. मगर - ३ वर्ष

मगर स्थिर राहून आपली उर्जा वाचवते. याचा फायदा असा होतो की ३ वर्ष त्यांना अन्न पाण्याची गरज भासत नाही.

१२. ओल्म - १० वर्ष

ओल्म (Olm) हा सरड्यासारखा प्राणी आहे. तो प्राण्यात राहतो. अन्नाची कमतरता असल्यावर ओल्म स्वतःची चयापचय क्रिया मंद करू शकतात आणि हालचालही कमी करू शकतात. या अंगभूत गुणांमुळे त्यांना १० वर्ष अन्नाशिवाय जगता येतं.

१३. टॅर्डीग्रेड - ३० वर्ष

टॅर्डीग्रेड हा पाण्यात राहणारा सूक्ष्मजीव आहे. तो जगभरात जवळजवळ सगळीकडे आढळतो. अन्नाशिवाय राहण्यात त्याचा जगात कोणीही हात धरू शकत नाही.

टॅर्डीग्रेड जगण्यासाठी जे करतो त्याला शास्त्रीय भाषेत क्रिप्टोबायोसिस म्हणतात. म्हणजे चयापचय क्रिया कमी करणे. एवढी कमी की ती ०.१ टक्के एवढी कमी होते. याशिवाय शरीरातली पाण्याची मात्रा १% एवढी कमी होऊ शकते. टॅर्डीग्रेड आपल्या हालचालींवरही नियंत्रण आणतो. या कारणाने त्याला जास्तीतजास्त ३० वर्षे अन्नाशिवाय जगता येतं. 

 

या सर्व प्राण्यांमध्ये एक सामान गोष्ट आहे. ती म्हणे हे सर्वच प्राणी सुस्त पडून राहू शकतात. म्हणजे आळशी लोकांना जास्त जगण्याचा स्कोप आहे असा याचा अर्थ होत नाही. चला तर जास्त आळस न दाखवता ही पोस्ट लाईक आणि शेअर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required