computer

एकाच झाडावर येतात ४० वेगवेगळी फळे ? कोणी केलीय ही कमाल ??

मंडळी, तुम्ही झाडांवर फळे पाहिली असतील. एकाच झाडावर खूप  फळे असणे यात कौतुक किंवा आश्चर्य वाटण्यासारखी काही गोष्ट नाही.  पण मंडळी, एकाच झाडावर चाळीस वेगवेगळ्या प्रकारची फळे बघायला मिळाली तर कसे वाटेल? तुम्ही म्हणाल काहीपण चेष्टा करताय राव!! पण हे खरे आहे मंडळी, तुम्हाला विश्वास नाही बसत ना? पुढे वाचाच मग मंडळी..

आजच्या काळात काहीच अश्यक्य नाही म्हणतात ते काय खोटे नाही राव!! एखादा गडी उठून काय शोध लावेल सांगता येत नाही.  असाच एक अवलिया आहे सेम व्हॉन नावाचा, अमेरिकेत शास्त्रज्ञ असलेल्या या पठ्ठ्याने एकाच झाडाच्या वेगवेगळ्या फांद्यावर वेगवेगळी झाडे उगवून दाखवली आहेत. या भन्नाट झाडाला 'ट्री ऑफ 40 फ्रुट' असे नाव देण्यात आले आहे. या झाडावर लिची, चेरी, बदाम यांच्यासारखे ४० स्टोन फ्रुट लागतील. स्टोन फ्रुट म्हणजे ज्यांच्या बिया कडक असतील अशी फळं.

हा सॅम व्हॉन आहे तरी कोण?

मंडळी, हा भाऊ अमेरिकेत शास्त्रज्ञ आहे. त्याचसोबत सिरॅक्युज युनिव्हर्सिटीत व्हिज्युअल आर्टसचा प्रोफेसरसुद्धा आहे. हा मनुष्य तिथे अमेरिकेत कम्युनिकेशन, बॉटनी महाबाहे वनस्पतीशास्त्र, शेती, आणि पर्यावरणाचा तज्ञ म्हणून ओळखला जातो. ट्री ऑफ 40 या त्याच्या नविन प्रकल्पाला 'मॉन्स्टर ट्री' सुद्धा म्हणतात म्हणजे राक्षसी झाड!! मंडळी आता एकाच झाडावर ४० वेगवेगळ्या प्रकारची फळे लागत आहेत म्हटल्यावर त्याला राक्षसी झाड म्हटले जाणे साहजिक आहे. सायन्सचा एक नविन चमत्कार म्हणून या झाडाकडे बघितले जात आहे राव!! 

सॅमभाऊने हे झाड ग्रांफ्टिंग टेक्नॉलॉजी वापरून तयार केले आहे. ग्रांफ्टिंग म्हणजे एका झाडावर दुसरे झाड जोडणे.  आपल्या भाषेत सांगायचे तर कलम करणे.  सॅमभाऊने एके ठिकाणी ग्रांफ्टिंग करताना पाह्यलं आणि त्याला तिथे या झाडाची आयडीया आली. सिरॅक्युज युनिव्हर्सिटीमध्ये लगेच त्याने त्यावर काम करायला सुरुवात केली.

सॅम व्हॉन पेन्सिलव्हेनिया राज्यातल्या एका शेतात लहानाचा मोठा झाला आहे. म्हणजे सॅमभाऊ पण शेतकरी गडी हाय!! शेतकऱ्यांचे आपल्यावर उपकार असल्याचे सॅम भाऊ सांगतो. सॅम सांगतो कि वेगवेगळ्या झाडांवर दुसरे झाडे लावणे म्हणजे माणसाच्या अंगावर दुसऱ्या प्राण्यांचे अवयव लावणे. कुणी काहीही म्हटले तरी हा मास्टरपीस आहे मंडळी. 

हे आज उभे राहिलेले झाड दिसत असले तरी त्यामागे खूप वर्षांची मेहनत आहे मंडळी!! या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे आधी महिनाभर या झाडाला फुले येतात. वसंत महिन्यात या झाडाला गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची फुले येतात. तेव्हा तर काही औरच नजारा असतो. मंडळी सॅम असे म्हणतात कि लोकांनी हे झाड बघितले पाहिजे आणि या झाडाबद्दल जास्तीत जास्त लोकांनी जाणून घेतले पाहिजे. एवढे परफेक्ट झाड त्यांना कुठेच दिसणार नाही. 

या झाडाचे वैशिष्ट्य

मंडळी, सॅमभाऊने या प्रोजेक्टसाठी तब्बल २५० स्टोन फ्रुटस वापरले आहेत. स्टोन फ्रुटच्या ज्या प्रजाती नामशेष होत आहेत त्यांना या झाडाच्या माध्यमातून वाचण्याचा प्रयत्न सॅम करत आहेत. सॅम सध्या अशीच अनेक झाडे बनवण्याच्या तयारीत आहे. हळूहळू करत यांची संख्या वाढवत नेण्याचा सॅमचा उद्देश आहे. सध्या सेन होजे इथे लहान मुलांच्या म्युझियममध्ये हे झाड लावण्यात आले आहे. मुलांना या झाडाकडून शिकता यावे हा उद्देश त्याच्यामागे आहे. 

मग मंडळी, कसा वाटला हा सॅमभाऊंचा कलमकारीचा प्रयोग? हा लेख शेती, वेगवेगळी माहिती आणि बागकामाची आवड असलेल्या तुमच्या  मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा..

सबस्क्राईब करा

* indicates required