ज्येष्ठ इतिहाससंशोधक रा. चिं. ढेरे यांना श्रद्धांजली

विचारवंत आणि वादग्रस्तता या दोन गोष्टी एकाच श्वासात उच्चाराव्या लागतात; भावना दुखावल्या गेल्यामुळे कुणीही कुणावरही कितीही तीव्रतेचा हल्ला करतो; आणि फार सखोल वाचन नसलेल्या आपल्यासारख्या बिझ्झी सामान्य माणसाला अनेक मूलभूत बाबतींत संभ्रम पडून आपण मुके होतो - असे दिवस.

रा. चिं. ढेरे या विचारवंतानं मात्र सामान्य माणसाला या पेचात कधीही पाडलं नाही. विठोबा, खंडोबा, दत्तसंप्रदाय, नाथसंप्रदाय महालक्ष्मी, तुळजाभवानी, गणपतीे… अशा अनेक दैवतांवर लक्ष्यवेधी असं मूलभूत संशोधन मांडून - ते प्रसंगी चाकोरीला धक्का देणारं असून - वाद ओढवून घेतल्याची नोंद रा.चिं.च्या यांच्या नावावर नाही. निरलसपणे संशोधन करत राहावं, संस्कृतीच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत राहावं, प्रसंगी श्रद्धेला तडा जात असूनही-थोरांच्या भाषणातली विसंगती दाखवून देण्याचा दोष पत्करतही-दिसेल ते सत्य निर्भयपणे मांडत राहावं - हा जन्माचा वसा.

या प्रकारच्या कामात भाषेचा तोल साधणं किती कठीण असेल? पण ते ढेर्‍यांना सहजी साधलं.

’लज्जागौरी’ हे त्यांचं विलक्षण काम. मातृदेवतांचा लुप्त इतिहास इतक्या सोप्या नि रसाळ भाषेत सांगणारं, सत्याशी फारकत न घेणारं आणि तरीही सनसनाटी वा सवंग न होणारं - असं दुसरं पुस्तक मराठीत सापडणं दुर्मीळ आहे. मातृदेवतेच्या मूर्तीकडे एक नजर टाकली, तरी हे वादग्रस्त न होता लिहिणं, किती कठीण असेल, त्याचा अंदाज येतो. पण त्यातला जेते आणि जित हा संघर्ष मांडताना तो तोल सांभाळून लिहिणं, ढेर्‍यांना साधलेलं दिसतं. ’लोकदैवतांचा इतिहास’मध्ये त्यांनी गणपतीसारख्या अतिलोकप्रिय आणि आधुनिक दैवताबद्दल लिहिलं आहे. विघ्नकारक अशा गणपतीचं पुढे विघ्नहर्त्या गणपतीमध्ये कसं उन्नयन होत गेलं, त्याचं वर्णन त्यात आहे. ते वाचताना उलगडत जातं, की दैवतांनाही आपापले नशिबाचे फेरे असतात - लोकप्रियता-लोकद्वेषाचं रहाटगाडगं असतं, संस्कृतिसंगराची झळ असते. संशोधनाच्या एका चोख मांडणीत दैवतांमागचं गूढाचं वलय बघता बघता विरतं.

हे ढेर्‍यांनी अनेक दैवतांच्या बाबतीत केलं. विठोबा, महालक्ष्मी आणि दत्त ही इतर काही उदाहरणं.

भाषा या गोष्टीवरही त्यांनी अनेकवार लिहिलं आहे. प्राचीन वाङ्मयातली गधेगाळ आणि त्यामागची लोकभावना, शब्दांचं आणि संज्ञांचं जाणीवपूर्वक नि अजाणता होत गेलेलं उन्नयन आणि अधःपतन, संतसाहित्यातून दिसणारे संस्कृतीचे अवशेष - याबद्दल त्यांनी कमालीच्या सजग नोंदी केल्या आहेत.

या प्रकारचं संशोधन त्या त्या क्षेत्रांमध्ये कायमच होत असतं. दिग्गजांच्या वर्तुळात प्रकाशित होत असतं. बहुतकरून ज्ञानभाषा इंग्रजीत आणि तेही नेमक्या वर्तुळापुरतं उपलब्ध असतं. हे असं चोख, अभ्यासपूर्ण लेखन मराठी भाषेत सहजी उपलब्ध असणं आणि सामान्य वाचकाला सहज कळेल-मिळेल असं उपलब्ध असणं ही आपली श्रीमंतीच आहे. या प्रकारचं लेखन होत असतं, म्हणून सहिष्णुता आणि स्वतःबद्दलची टीकावृत्ती या दोन अतिमहत्त्वाच्या गोष्टी एखाद्या समाजात टिकून राहतात. पुढे अनेक विधायक गोष्टींना-वृत्तींना खतपाणी घालतात.

रा. चिं. ढेरे यांना आदरांजली वाहताना, या प्रचंड अव्याहत कामासाठी रा. चिं. ढेरे आणि त्यांची पुस्तकं काढणारं पद्मगंधा हे जाखडेंचे प्रकाशन या दोन्हीचंही आपण ऋणी असलं पाहिजे.

हे ही वाचा..

१. ‘लोकसंस्कृती’चे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना  ‘पुण्यभूषण पुरस्कार’  ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते देण्यात आला. या समारंभात डॉ. ढेरे यांनी  केलेले  भाषण.

२. रा. चिं ढेरे यांची प्राचीन साहित्यासंबंधी भूमिका

 

-मेघना भुस्कुटे

 

सबस्क्राईब करा

* indicates required