computer

टेस्लाची कार हॅक केली म्हणून टेस्लाने त्यांना कार गिफ्ट केली ?? काय आहे हे प्रकरण ??

मंडळी, विचार करा तुम्ही एक कार हॅक केली आहे आणि त्याच्या बदल्यात कार कंपनीने तुम्हाला कार गिफ्ट केली आहे ? ती कार कंपनी जर टेस्ला असेल तर ? दिवसा तारे दिसतील भाऊ. असं खरोखर घडलं आहे. चला तर बघूया !!

नुकताच Pwn2own या जागतिक दर्जाच्या हॅकिंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हॅकर्स म्हणजे आपण समजतो तसे चोरटे दगाबाज हॅकर्स नव्हते राव. हा कार्यक्रम white hackers म्हणजे ज्याला आपण अधिकृत हॅकर्स म्हणतो त्यांनी आयोजित केला होता.

Pwn2own कार्यक्रमाचा हेतू हा इलेक्ट्रॉनिक्स, गॅजेट्स (मोबाईल फोन वगैरे.) आणि विविध सेवांमधल्या त्रुटी दाखवण्याचा होता. या कार्यक्रमात fluoroacetate हॅकरच्या टीमने दोन तरुणांना नियुक्त केलं होतं.

मंडळी, या दोघांचं नाव होतं अमाटा कामा आणि रिचर्ड झु. त्यांनी चक्क टेस्ला कार हॅक करण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे ते यात यशस्वी पण झाली. त्यांनी टेस्ला मॉडेल ३ कारच्या वेब ब्राउझर मधून कार हॅक करून दाखवली. टेस्ला मध्ये वेब ब्राउझरची infotainment system असते. या दोघांनी मिळून या infotainment system वर निशाणा साधला होता. याबदल्यात त्यांना भरभरून कौतुकाच्याही पलीकडचं बक्षीस मिळालं आहे.

टेस्ला कार शिवाय त्यांनी अवघ्या ४ मिनिटात सफारी ब्राउझर पण हॅक करून दाखवला होता. त्यांच्या या जबरदस्त कामगिरीसाठी त्यांना एकूण ३.८ कोटी बक्षिसातील तब्बल २.६ कोटी रुपये मिळाले आहेत. आणि टेस्ला तर्फे एक कार पण भेट मिळाली आहे.

टेस्ला आणि टेस्ला मॉडेल ३ कार विषयी थोडक्यात :

टेस्ला ही एक जगप्रसिद्ध कार कंपनी आहे. टेस्ला हे नाव नोकोला टेस्ला या प्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या आडनावावरून घेतलेलं नाव आहे. डीझेल आणि पेट्रोलच्या जमान्यात टेस्ला त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कार्ससाठी ओळखली जाते. आता बोलूया तेस्ला मॉडेल ३ कार बद्दल.  ही गाडी ऑटोड्राईव्ह मोडमध्ये म्हणजे ड्रायव्हरशिवायही चालू शकते. म्हणजे बघा, गाडीत बसून स्वारगेटला चल म्हटलं तर ट्रॅफिकमध्येसुध्दा ती अपघात न करता तुम्हाला तिकडे आपोआप पोचवू शकते. हां, आता रस्त्यावरच्या इतर ड्रायव्हरने माती खाल्ली तर टेस्ला त्याला काही करू शकत नाही.  ड्रायव्हरशिवाय चालवली जाण्यासाठी या गाडीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्टवेअर आहेत. इतकं हाय लेवलचं सॉफ्टवेअर या गाडीत असल्यानं ती हॅक झाली तर आतल्या पॅसेंजरना खूप धोका होऊ शकतो.

तर मंडळी, या हॅकर्सची तर बल्ले बल्ले झाली आहे. कोण म्हणतं सनदशीर मार्गाने हॅकिंग केल्यास पैसे नाही मिळत ?? हे बघा भक्कम उदाहरण !!

सबस्क्राईब करा

* indicates required