computer

विषाणू आणि त्याबद्दलच्या वैज्ञानिक संकल्पना : भाग २

विषाणू आणि त्याबद्दलच्या वैज्ञानिक संकल्पना तुम्हाला माहित असायलाच हव्या !!

पृथ्वीवर लाखो विषाणू मानवजातीला अजूनही अज्ञात आहेत. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की जेमतेम पाच हजार व्हायरस म्हणजे विषाणूंची माहिती आपल्याला आहे. विषाणूंची बाधा तशी कोणालाही होऊ शकते. वनस्पती, प्राणी, इतकंच काय, बॅक्टेरियाला पण विषाणूंची लागण होऊ शकते. विषाणूंना घर करायला जिवंत पेशींची गरज असते. एकादा का या पेशीत प्रवेश मिळाला की त्यांची जोमाने वाढ होते. यासंदर्भातील वेगवेगळ्या संकल्पना समजून घेण्यासाठी आम्ही दोन भागात माहिती देणार आहोत.

यापैकी पहिल्या भागात बॅक्टेरीओफेज, एंडोसायटोसीस, व्हायरल लेटन्सी आणि अशाच इतर संकल्पना आपण समजून घेतल्या. आजच्या दुसऱ्या भागात कम्युनिटी ट्रान्समिशन, सोशल डिस्टन्सींग, आयसोलेशन, आणि क्वारंटाईन इत्यादी संकल्पना समजून घेऊया.

 

कम्युनिटी ट्रान्समिशन

कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणजेच गर्दीतून विषाणूंचे संक्रमण. सध्या आपल्यावर जे संकट ओढवले आहे त्या काळात जे आपल्याला टाळायलाच हवे आहे ते म्हणजे- गर्दीतून संक्रमण. भारतासारख्या गर्दीच्या देशात एक संक्रमित माणूस गर्दीत मिसळला तर तो अनेक अनोळखी लोकांना व्हायरस देऊन जातो. सोशल डिस्टन्सींग म्हणजे सामाजिक विलगीकरण हा त्यावरचा एकमेव उपाय आहे.

बेसिक रीप्रॉडक्शन नंबर म्हणजे काय?

R0 (रीप्रॉडक्शन रेट) किंवा  बेसिक रीप्रॉडक्शन नंबर म्हणजे काय?

R0 (आर-नॉट) म्हणजे संसंर्ग झालेली एक व्यक्ती कितीजणांना व्हायरस संक्रमित करू शकते ते दर्शवणारी संख्या. दरवर्षी हवेत बदल झाल्याने  होणाऱ्या फ्ल्यूचे उदाहरण घेऊ या. एक फ्ल्यू झालेली व्यक्ती १.३ लोकांना बाधित करू शकते. कोवीडचा हा रेट फार जास्त आहे पण नक्की किती याचा अंदाज अजूनही येत नाही.

अँटीव्हायरल ड्रग काय असतात?

अँटीव्हायरल ड्रग म्हणजे विषाणूंची वाढ कमी करणारी औषधे. अँटीव्हायरल ड्रगचे काम विषाणूंची संख्या वाढवणाऱ्या जैवीक शृंखलेला तोडणे हे असते. स्वाईन फ्ल्यूमध्ये वापरले गेलेले टॅमी फ्ल्यू हे अँटीव्हायरल ड्रगचे उदाहरण सांगता येईल.

व्हॅक्सीन म्हणजे लस नक्की काय करते?

विषाणूशी लढायला शरीराची तयारी करून घेणे हे व्हॅक्सीनचे कार्य आहे. हे करण्यासाठी ज्या जंतूंविरुध्द लढायचे आहे त्यांना मारले जाते किंवा ते अति अशक्त केले जातात. त्यासाठी लस म्हणून मृतवत जंतू शरीरात टोचले जातात. हे शरीरात पोहचले की आपल्या रक्तात अँटीबॉडीज तयार होतात. त्या जंतूंवर हल्ला करून त्यांना नष्ट करतात. अशा प्रकारे पुन्हा तसे, थोडे शक्तीशाली जंतू जरी शरीरात घुसले तरी शरीर त्यांच्याशी लढायला सज्ज असते.

एखादा रोग सार्वत्रिक होण्यापूर्वी व्हॅक्सीन घेणाऱ्यांची संख्या जास्त असली तर त्या रोगाचा प्रसार होत नाही.

करोना व्हायरसवर असे व्हॅक्सीन तयार करण्यासाठी शास्त्रज्ञ रात्रीचा दिवस करत आहेत. थोड्याच दिवसांत मानवी परिक्षणासाठी ही लस तयार असेल असा अंदाज आहे. अशाच व्हॅक्सीनेशन कार्यक्रमातून पोलीओचे उच्चाटन करण्यात आपण यशस्वी झालो आहोत.

सर्दी खोकल्याचे व्हायरस

आपल्या ओळखीचे व्हायरस म्हणजे सर्वसाधारण सर्दी खोकल्याचे व्हायरस. या व्हायरसवरही काही औषध नाही. खवखवणारा घसा, नाकातून पाणी येणे, घसा दुखणे असा सर्दीचा चार पाच दिवसाचा कालावधी असतो. त्यानंतर सर्दी आपोआप जाते. डोळे येणे किंवा कंजक्टीव्हायटीस हा आजार पण व्हायरसमुळे होऊ शकतो.

 

कोरोना व्हायरस

हा व्हायरसच्या जमातीतील एक व्हायरस आहे. त्याचे इतर भाईबंद म्हणजे मिडलइस्ट रेस्पीरेटरी सींड्रोम ज्याला मर्स कोरोना म्हटले जाते. सार्स म्हणजे सिव्हीअर ॲक्यूट रेस्पीरेटरी सिंड्रोम हा वायरस पण गेल्या काही वर्षात काळजीचा विषय होता. सध्या आपल्याला त्रस्त करणारा व्हायरस म्हणजे सार्स कोरोना-2 आहे आणि त्यामुळे होणाऱ्या रोगाचे नाव कोव्हीड-19 आहे. 

हा व्हायरस पूर्णपणे नवीन असल्याने त्याविरुध्द लढण्यासाठी अद्याप कोणीही सक्षम नाही.

फ्लॅटनिंग कर्व्ह

फ्लॅटनिंग कर्व्ह हा शब्द सध्या वारंवार आपल्या वाचनात येत असतो. जर आपण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आणि  संक्रमित होण्यासाठी लागणारा वेळ याचे आलेख काढला तर ती आकृती वर दर्शवल्याप्रमाणे असेल. काळजी घेऊन या आलेखाची उंची कमी करणे याला फ्लॅटनिंग कर्व्ह असे म्हणतात.

हे झाल्यास बाधित व्यक्तींना बरे होण्यास आवशयक व्यवस्था पुरेशी ठरेल. अन्यथा संसर्ग जास्त आणि संसाधने कमी असे होईल.

सोशल डिस्टन्सींग, आयसोलेशन, आणि क्वारंटाईन

सोशल डिस्टन्सींग, आयसोलेशन, आणि क्वारंटाईन हे तीन उपायच सध्या आपल्याला कोरोना व्हायरसपासून वाचवू शकतात. जे संसर्गित नाहीत त्यांनी एकमेकांपासून दूर राहून सुरक्षीत राहणे म्हणजे सोशल डिस्टन्सींग. ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांना पूर्णपणे  वेगळे करून इलाज करणे म्हणजे आयसोलेशन. ज्यांना ससंर्ग झाला असण्याची शक्यता आहे त्यांना काही काळासाठी वेगळे ठेवून संसर्गाची चाचणी करणे म्हणजे क्वारंटाईन. संसर्गाची गती रोखण्यासाठी सध्यातरी याशिवाय काही पर्याय नाही.

मानसिक तयारी 

समाजापासून विलगीकरण झालेल्या लोकांची मानसिक तयारी आणि उपायांवर विश्वास दॄढ करणे ही सध्याची गरज आहे. मन वेगवेगळ्या कामात गुंतवणे, विस्मरणात गेलेले छंद जोपासणे, कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे. उपायांनी हे विलगीकरण सुसह्य करणे हा एकच पर्याय आहे.

लोकहो, कित्येक दिवस लॉकडाऊन होण्याची ही अभूतपूर्व वेळ साऱ्या जगावर आली आहे. ती लवकरात लवकर संपुष्टात यावी यासाठी आपण सर्वांनी सध्यातरी किमान सोशल डिस्टन्सींग आणि जिथे गरज आहे तिथे आयसोलेशन-क्वारंटाईन या गोष्टी कसोशीने अंमलात आणण्याची गरज आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required