computer

चांद्रयान मोहिमेच्या शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं ?

चांद्रयान मोहीम आपल्या नियोजित पद्धतीने जात होती. इस्रोचे शास्त्रज्ञ समाधानी होते. शेवटच्या टप्प्यात विक्रम लँडर चंद्राच्या भूमीवर उतरणार होता. इतकं झालं की मोहीम यशस्वी होणार होती, पण काही अज्ञात कारणांनी विक्रम लँडरशी शेवटच्या क्षणी संपर्क तुटला.

चांद्रयान मोहिमेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं. मोहीम अवकाशात झेपावून आज ४७ दिवस पूर्ण झाले आहेत. शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रात्री १.४० वाजता चांद्रयान-२ यानातील विक्रम लँडर चंद्राच्या भूमीवर उतरण्यास सुरुवात झाली. यानाची गती कमी करण्यासाठी रफ ब्रेकिंगचा मार्ग अवलंबण्यात आला. ही प्रक्रिया संपल्यानंतर १ वाजून ५० मिनिटांपर्यंत सर्व ठीक चाललं होतं. यावेळेपर्यंत विक्रम लँडर चंद्राच्या भूमीपासून अवघा ४ किलोमीटर लांब होता.

२ वाजून १५ मिनिटानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. इस्रोचे मुख्य  के. शिवन यांनी थोड्याच वेळात बातमी दिली, की विक्रम लँडरशी संपर्क तुटला आहे. विक्रम लँडर चंद्रापासून फक्त २.१ किलोमीटर लांब असताना संपर्क तुटला होता. यानंतर इस्रोने लगेचच डेटा विश्लेषणास सुरुवात केली.

मोहीम अयशस्वी झालेली नाही :

विक्रम लँडरशी संपर्क का तुटला याबद्दल काहीच माहिती मिळालेली नाही. लँडर क्रॅश झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे, पण इस्रोने या बातमीवर शिक्कामोर्तब केलेलं नाही. इस्रो अजूनही तपास करत आहे.

एक गोष्ट लक्ष घेतली पाहिजे, की ही मोहीम फक्त विक्रम लँडरभोवती मर्यादित नव्हती. चांद्रयान-२ चं ऑरबिटर तितकंच महत्वाचं आहे. हे ऑरबिटर चंदाभोवती वर्षभर फिरत राहणार आहे. चंद्राच्या ज्या प्रदेशात इस्रो प्रयोग करणार होती, त्याजागी ऑरबिटर असेल. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण भूभागाचा अभ्यास शक्य होणार आहे. या ऑरबिटरमध्ये ८ पेलोड्स - म्हणजे यानापासून सुटे होऊ शकणारे भाग- आहेत. या पेलोडसच्या माध्यमातून हा अभ्यास केला जाईल. पुढील १ वर्ष यामार्फत माहिती गोळा केली जाणार आहे.

पुढे काय ?

विक्रम लँडरचा संपर्क का तुटला याबद्दल लवकरच इस्रो बातमी देणार आहो. इस्रो सध्या माहिती विश्लेषण करत आहे. विक्रम लँडरशी संपर्क तुटला असला तरी पुन्हा संपर्क होण्याची आशा शिल्लक आहे. शेवटच्या संपर्कात मिळालेल्या माहितीचं परिक्षण केलं जात आहे.

लँडरशी पुन्हा संपर्क मिळवण्यासाठी global deep space network चा वापर केला जात आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे जगभरात पसरलेल्या रडार आणि समर्पक साधनांचा गट आहे. global deep space network ने अवकाशयानाशी संपर्क ठेवला जातो. याचा वापर करून अधिकाधिक माहिती जमा केली जाणार आहे. याखेरीज ऑरबिटरद्वारेही विक्रम लँडरचं लोकेशन बघितलं जाईल.

(विक्रम लँडर)

मंडळी, चांद्रयान-२ च्या शेवटच्या क्षणात मोहिमेला गालबोट लागलं असलं तरी मोहीम अयशस्वी झालेली नाही. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी दाखवलेल्या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमानच राहील.

सबस्क्राईब करा

* indicates required