computer

एका चुकीमुळे अयशस्वी झालेली नासाची अपोलो-१३ मोहिम!! नक्की काय आणि कुठे चुकले होते?

नासाने आजवर अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या. अपोलो प्रोग्रॅम किंवा अपोलो प्रोजेक्ट हा खास चंद्रावर माणूस पाठवण्यात यशस्वी झाला होता. १९६८ ते १९७२ या काळात अपोलो प्रोजेक्टच्या माध्यमातून नासाने कित्येक अंतराळ मोहिमा यशस्वी झाल्या. ११ एप्रिल १९७० रोजी अपोलो-१३ मोहिमेला सुरुवात झाली होती. या मोहिमेअंतर्गत नासाचे तीन अंतराळवीर चंद्रावर पाठवले होते. या तिघांना चंद्राविषयी अधिक माहिती शोधण्यासाठी तिथे जायचे होते. दुर्दैवाने नासाच्या या अंतराळ मोहिमेचा उद्देश सफल झाला नाही. यानातील ऑक्सिजन टँकमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही मोहीम अर्ध्यावरच सोडून अंतराळवीर पुन्हा पृथ्वीवर परतले होते. ज्या उद्देशाने ही मोहीम सुरु केली होती तो उद्देश साध्य झाला नसला तरी किमान अंतराळात गेलेल्या अवकाशवीरांना सुखरूपपणे पृथ्वीवर आणण्यात तरी ही मोहीम यशस्वी झाली म्हणून हिला अपयशी तरीही यशस्वी मोहीम असे म्हटले जाते.

अपोलो-१३ चांद्रयान मोहिमेमध्ये अशी कोणती चूक किंवा बिघाड झाला होता ज्यामुळे अंतराळवीर अगदी चंद्राच्या कक्षेत पोहोचूनही त्यांना यूटर्न घ्यावा लागला होता, जाणून घेऊया या लेखातून!

११ एप्रिल १९७० रोजी अपोलो-१३च्या यानाने पृथ्वीची कक्षा सोडली आणि ५६ तासानंतर हे यान चंद्राच्या कक्षेत पोहोचले देखील. या मोहिमेत जिम लॉवेल, जॅक स्वीगर्ट आणि फ्रेड हैसे असे तीन अंतराळवीर होते. यातील जिम लॉवेल यांनी याआधीच्या अपोलो-८ मोहिमेतही सहभाग घेतला होता. ते सर्वात अनुभवी आणि अधिक काळ म्हणजे ५७२ तास त्यांनी अवकाशात राहण्याचा अनुभव घेतला होता. हैसे आणि स्वीगर्ट हे तुलनेने नवखे होते. हैसेने याधीच्या अपोलो-८ आणि अपोलो-११ मोहिमेत बॅकअप पायलट म्हणून सहभाग घेतला होता. तर स्विगर्टची प्रत्यक्ष अंतराळात जाण्याची त्याची ही पहिलीच वेळ होती. अंतराळ मोहिमेत सहभाग घेतला तोपर्यंत सगळे काही व्यवस्थित होते. चंद्राच्या कक्षेत जाताच अंतराळवीरांना कसे हलके वाटत आहे आणि ते तरंगत तरंगतच स्वतःचा तोल सावरण्याचा कसा प्रयत्न करत आहेत हेही अंतराळवीरांनी सांगितलं. हा सगळा कार्यक्रम रेडीओ आणि टीव्हीवरून प्रक्षेपित केला जात होता. चंद्राच्या कक्षेत जाताच अंतराळवीरांनी स्पेसवॉकला सुरुवातही केली होती. हे सगळे त्यांनी टीव्हीवर प्रक्षेपित ही केले. यानंतर नियमित कामासाठी यान तयार आहे की नाही आणि यानाला इंधन पोहोचवण्यासाठी आणि इंधनाच्या टँकमधील ऑक्सिजन नॉर्मल रेंजला येण्यासाठी म्हणून टँक सुरु केला आणि अचानक या टँकचा स्फोट झाला. यानाचा इंधन पुरवठा बंद झाल्याने यानातील वीजही गेली आणि त्यामुळे अंतराळवीरांना त्यांची कामेच करता येईनाशी झाली. कसा बसा त्यांनी नासाच्या पृथ्वीवरील सेंटरला आपण अडचणीत सापडल्याचे कळवले. ऑक्सिजन टँक फुटला असताना त्यांना मोहीम पूर्ण करणे अशक्यच होते. त्यांना परत सुखरूपपणे पृथ्वीवर आणण्यासाठी नासाची लगबग सुरु झाली.

एका टँकचा स्फोट झाला आणि त्यामुळे त्याच्या शेजारचा दुसरा ऑक्सिजन टँकही लिक झाला. त्यातून ऑक्सिजनची गळती सुरु झाली. आता आपल्याला चांद्रमोहीम रद्द करून अंतराळात कठीण परिस्थितीत अडकलेल्या या अंतराळवीरांना सुखरूपपणे परत कसे आणता येईल यावर ह्यूस्टनमध्ये चर्चा सुरु झाली. मग अंतराळवीरांना यानाच्या कमांड मोड्यूलपासून बाजूला होत स्वतंत्र मोड्यूलमध्ये येण्याविषयी सांगितले गेले. आता जोपर्यंत यान पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत येत नाही तोपर्यत या अंतराळवीरांनी धैर्य दाखवणे आवश्यक होते. ह्यूस्टनच्या सेंटरवरून त्यांनी काय काय केले पाहिजे याच्या वेळोवेळी सूचना जात होत्या. ११ एप्रिल रोजी चंद्राच्या कक्षेत गेलेले हे यान १७ एप्रिल रोजी सुखरूपपणे पृथ्वीच्या कक्षेत परतले.

या घटनेवरून प्रेरित याच नावाचा एक चित्रपटही हॉलीवूडमध्ये बनवण्यात आला आहे. अमेरिकेजवळच्या सामोआ बेटाच्या परिसरात या अंतराळवीरांनी लँड केले आणि तिघेही अंतराळवीर सुखरूपरित्या पृथ्वीच्या कक्षेत परतले.

अपोलो-१० मोहिमेच्या वेळी जो ऑक्सिजन टँक यानात वापरला होता तोच ऑक्सिजन टँक या यानात वापरला गेला होता. अपोलो-१० संपल्यानंतर ऑक्सिजन टँकमधील ऑक्सिजन पूर्णपणे रिकामा न करताच तो टँक बाजूला केला. पण टँकमध्ये ऑक्सिजन आहे हे समजल्यानंतर तो संपवण्यासाठी टँकला उष्णता देण्यात आली. या प्रयत्नात टँकच्या आतील ऑक्सिजन थंड ठेवण्यासाठी जी यंत्रणा काम करते त्यात बिघाड झाला. अपोलो-१३ ची तयारी करत असताना टँकमध्ये बिघाड झाल्याचे कुणाच्याच निदर्शनास आले नाही त्यामुळे तोच टँक या यानातही बसवण्यात आला. म्हणूनच अंतराळात गेल्यानंतर इंधन पुरवठा होण्यासाठी म्हणून जेव्हा टँक सुरू केला तेव्हा त्या टँकचा स्फोट झाला. सुदैव इतकेच की कुणाला फारसा काही त्रास झाला नाही.

नासाच्या या मोहिमेत बिघाड झाला असून नासाचे अंतराळवीर धोक्यात असल्याचे समजले तेव्हा संपूर्ण जग या तीन अंतराळवीरांसाठी चिंतातूर झाले होते. अगदी अमेरिकेचा कट्टर शत्रू समजला जाणारा रशियासुद्धा यावेळी मदत करण्यास पुढे आला. त्या तीन अंतराळवीरांना सुखरूप पोहोचवण्यासाठी जर काही उपाय असेल तर त्यासाठी आम्ही उदारपणे मदत करायला तयार आहोत असेही रशियाने सांगितले होते. फक्त रशियाच नाही, तर संपूर्ण जग या अंतराळवीरांच्या सुखरूप परत येण्याकडे डोळे लावून बसले होते.

छोट्या छोट्या चुका फक्त लहान लहान कंपनीत किंवा आपल्या घरातच होतात असे नाही, तर नासासारख्या प्रतिष्ठित आणि सन्माननीय विज्ञान संस्थेकडूनही त्या होत असतात. शेवटी काय चूक झाली यापेक्षा ती सुधारता आली आणि त्यामुळे तीन अंतराळवीरांचे प्राण वाचले हे महत्वाचे. नाही का?

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required