f
computer

जगातले सगळे डास नष्ट झाले तर काय होईल ? याचं उत्तर आहे बिल गेट्सच्या संस्थेकडे !!

साला एक मच्छर..... जो अनेक आजारांना कारणीभूत असतो तोच जर नष्ट झाला तर ? अगदी कायमचा नष्ट बरं !! असं जर झालंच तर मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका यांसारखे गंभीर आजार होणारच नाहीत. नाही का ? पण विज्ञान या बाबतीत काही वेगळंच सांगतं. चला तर ‘वैज्ञानिक चष्म्यातून’ जाणून घेऊया डास नष्ट झाले तर नेमकं काय होईल.

प्रत्येक डास आपल्यासोबत मलेरिया, डेंग्यू सारखे आजार घेऊन फिरत नाही हे जरी खरं मानलं, तरी डासांचं चावणं व त्यामुळे निर्माण होणारी खाज, शिवाय कानाजवळची चीड आणणारी भुणभुण याचा प्रत्येकालाच त्रास होतो. त्यामुळे सगळेच डास नष्ट झाले तरी काही फरक पडणार नाही.

डास नष्ट कसे होतील याचं उत्तर मिळवण्या अगोदर हे जाणून घेऊया की डास नष्ट कसे करता येतील.

राव, डासांना नष्ट करण्यासाठी त्यांच्यावर विषारी औषध फवारण्याची गरज नाही. त्यांना मारणं अगदी सोप्पं आहे. काही विशिष्ट जनुकीय बदल (genetically modified) केलेले डास वातावरणात सोडायचे. हे डासच पुढे सर्व डासांच्या विनाशाला कारणीभूत ठरतील. पण एक मात्र आहे, सगळे डास नष्ट व्हायला काही पिढ्या तरी नक्कीच लागतील.   

वरील जालीम उपाय शोधून काढलाय बिल गेट्सच्या ‘टार्गेट मलेरिया’ या NGO ने. ते इथेच थांबले नाहीत तर त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला, “डास नष्ट झाल्यानंतरचे परिणाम काय असतील ?’

तूर्तास याचं उत्तर असं मिळालं की, डास नष्ट झाल्यानंतरचा पहिला परिणाम अन्न साखळीवर होईल. वटवाघूळ, मासे आणि इतर कीटक हे मोठ्याप्रमाणावर डासांच्या अळ्यांवर जगतात. वटवाघूळाची संख्या आजच्या घडीला कमी होत चालली आहे. डास नष्ट झाल्यानंतर वटवाघुळांच्या संख्येवर नक्कीच गंभीर परिणाम होईल.

मंडळी, ‘टार्गेट मलेरिया’ आणि ऑक्सफर्ड तर्फे या महिन्यापासून ४ वर्षांच्या संशोधनाला सुरुवात होणार आहे. या संशोधनात मलेरिया पसरवणाऱ्या आफ्रिकेच्या ‘गॅम्बी’ या डासाचा अभ्यास होणार असून हा डास जर नष्ट झाला तर काय परिणाम होतील हे तपासून पाहिलं जाईल. डास नष्ट झाले तर रोगराई पसरवणारे इतर कीटक त्यांची जागा घेतली का हाही एक संशोधनाचा मुद्दा आहे.   

मंडळी, खरं तर डास कोणी गंभीरपणे घेतलाच नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजही कोणत्याच संशोधकाला माहित नाही की डास नष्ट झाले तर नेमकं काय होईल !!