computer

हे हायवे हिप्नॉसिस नक्की काय प्रकरण आहे ?

"अबे साले... ध्यान किधर है? गाडी चला रहा है या मजाक कर रहा है??" हायवे वरून तुम्ही जात असताना एखाद्या वैतागलेल्या ड्रायव्हरने तुम्हाला या शब्दात सुनावलं आणि जोडीसजोड एखाद-दोन शेलक्या शिव्या हासडल्या तर त्याला प्रत्युत्तर करू नका.त्यापेक्षा सावध व्हा.ते जास्त गरजेचं आहे.तो तुम्हाला शिव्या देतोय कारण तुमची तंद्री लागलीये आणि तुम्ही अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण करत आहात.स्वतःसाठी पण आणि इतरांसाठी पण. तेव्हा त्याची शिवी ही ओवीसमान समजा आणि भविष्यात होऊ घातलेल्या संकटापासून वेळीच सावध व्हा.

ही तंद्री लागण्यामागचं कारण आहे हायवे हिप्नॉसिस किंवा रोड हिप्नॉसिस किंवा रस्ता संमोहन.याला अजून एक नाव आहे ते म्हणजे व्हाईट लाईन फीवर. नुकताच सिंदखेडराजा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या अपघातामुळे रोड हिप्नॉसिस हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

याचा अर्थ व्यवस्थित समजून घेऊया.जेव्हा एखादी व्यक्ती शहरातून गाडी चालवत असते,त्यावेळी तिच्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात ज्यांची दखल मेंदू घेत असतो.उदाहरणार्थ अमुक ठिकाणी सिग्नल आहे, तमुक ठिकाणी उजवीकडे वळायचं आहे, रस्त्याच्या बाजूला अमुकअमुक रेस्टॉरंट आहे, पुढे ट्रॅफिक जाम आहे इत्यादी.यामुळे गाडी चालवताना ड्रायव्हर, परिणामी त्याचा मेंदू, कायम 'अलर्ट- मोड'वर असतो.आजूबाजूला दिसणारी दृश्यं, मेंदू आसपास घडणाऱ्या घटनांची नोंद घेत असतो. थोडक्यात क्रियाशील असतो.?

आता तीच गाडी समजा हायवेवरून जात आहे. रस्त्याला फारशी रहदारी नाही आणि आजूबाजूला असलेल्या देखाव्यात जास्त काही बदलही नाही.म्हणजे थोडक्यात समोर लांबच्या लांब पसरलेला रस्ता आणि दोन्ही बाजूला मोकळ्या जागा.अशावेळी गाडी चालवणं ही एक मोनोटोनस किंवा एकसुरी म्हणता येईल अशी क्रिया बनते. यामध्ये फक्त स्टीअरिंग व्हील कंट्रोल करणं एवढंच काम चालकाकडे राहतं.आणि हेच जास्त धोकादायक आहे.
याचं कारण अशावेळी त्या व्यक्तीचा मेंदू जवळपास निष्क्रिय असतो. आजूबाजूला फार काही घडत नाही. समोर फक्त मोकळा आणि लांबच्या लांब पसरलेला रस्ता असतो. या काळात मेंदूला कमीत कमी काम असतं.फार कुठे लक्ष देण्याची,  सतर्क असण्याची गरज नसते. एकाच गिअरमध्ये आणि एकाच प्रकारच्या वातावरणात मेंदू जणू 'स्विच ऑफ' होतो. अशा वेळी त्या ड्रायव्हरचीही तंद्री लागते. अनेकदा याआधी आपण काय पाहिलं किंवा टोल नाका क्रॉस करून किती वेळ झाला या गोष्टीही लक्षात राहत नाही. एखाद्या समाधीसारख्या अवस्थेत तो गाडी चालवत राहतो.आजूबाजूच्या वातावरणाचं भान उरत नाही आणि मग अचानक मागून एखादी कार सणसणीत हॉर्न वाजवून जाते तेव्हा तो भानावर येतो. आपण कुठे हरवलो होतो या विचारात परत एकदा गाडी लक्ष देऊन चालवायचा प्रयत्न करतो.
पण कधी कधी यापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होते आणि अपघात होतात.

लक्षात घ्या, हायवे हिप्नॉसिस हा प्रकार थकवा आणि त्यामुळे येणारी डुलकी यापेक्षा वेगळा आहे.यामध्ये झोप लागत नाही, तर आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचं भानच ड्रायव्हरला राहत नाही. आपल्यासोबत काय घडतंय, आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे लक्षात न येणं हे रोड हिप्नॉसिसचं पहिलं लक्षण.या अवस्थेत असताना डोळे तर उघडे असतात, पण डोळ्यांना जे दिसतं त्याचं मेंदूकडून विश्लेषण होत नाही. गाडी चालवत असताना जर तुम्हाला समोरचं दृश्य दिसत असेल पण आधीच्या दहा-पंधरा मिनिटात काय बघितलं यातलं काहीही आठवत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही हायवे हिप्नॉसिसला बळी पडत आहात.

 

साधारण ड्रायव्हिंगला सुरुवात केल्यानंतर मोकळा हायवे आणि आजूबाजूच्या दृश्यात फारसा बदल न होणं अशी परिस्थिती असल्यास अडीच तासांनंतर या गोष्टीला सुरुवात होते. रात्रीच्या वेळी याची शक्यता जास्त असते.अशावेळी काही गोष्टी करायला हव्यात.
१-ब्रेक घेणं
जेव्हा खूप जास्त अंतर पार करायचं असेल त्यावेळी नियमित अंतराने ब्रेक घेणं महत्त्वाचं.या ब्रेक मध्ये गाडीतून बाहेर पडा आणि थोडे पाय मोकळे करून या.
कॉफी सारखी उत्तेजक पेय घेणं.एरवी निद्रानाशासारखे विकार टाळण्यासाठी कॉफी घेणं अयोग्य मानतात. मात्र ज्यावेळी ड्रायव्हिंग करायचं आहे आणि मेंदू अलर्ट मोडवर असायला हवा, अशा वेळी कॉफी घेतलेली उत्तम.
२- सहप्रवाशांशी गप्पा मारणं
मेंदू सजग राहण्यासाठी बरोबर असलेल्यांशी गप्पा मारत राहणं हा एक चांगला उपाय आहे. यामुळे मेंदू निष्क्रिय बनत नाही.बरोबर कोणी नसेल तर हँड्स फ्री डिव्हाइसेस चा वापर करून तुम्ही फोनवर देखील बोलू शकता. 
जाता जाता, समृद्धी महामार्ग हा रस्ता म्हणून कितीही उत्तम असला, तरी या मार्गावर झालेले बहुतेक अपघात हे रोड हिप्नॉसिसचा परिणाम आहेत, असं अनेकांचं म्हणणं आहे. यावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या लँडस्केपमध्ये ठराविक अंतराने काही बदल करून अपघातांचं प्रमाण नक्कीच कमी करता येईल. तुम्हाला काय वाटतं

-स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required