computer

गेली १८ वर्षे हवेतून गायब झालेल्या बोईंग विमानाची गोष्ट. FBI आणि CIAलाही हे कोडं अजून सुटलं नाहीय!!

दागिने, पैसा-अडका, गाड्या, जनावरं, साठवलेली धान्यं, औषध अशा कित्येक वस्तूंची चोरी झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण भलं मोठं बोईंग विमान चोरीला गेल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? विमान अपहरण झाल्याच्या तर कित्येक घटना घडतात, पण चोरीला जाण्याच्या? छे! एवढं मोठं विमान चोरीला जाणं कसं शक्य आहे? तुमचं म्हणणंही खरंच आहे. विमान चोरणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट निश्चितच नाही. पणहे घडलं आहे हे मात्र नक्की.

९/११चा ट्वीन टॉवरवरच्या हल्ल्याला दोनच वर्षं उलटली होती. दहशतवादी कारवायांना ऊत आलेला होता. सगळीकडे यंत्रणा प्रचंड सतर्क होती आणि तरीही हे विमान अशा वातावरणात चोरीला गेले. ही घटना आहे २५ मे २००३ रोजीची!

२५ मे २००३ रोजी बोईंग 727-223, ज्याचा टेल नंबर होता N844AA हे विमान हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला कसल्याच सूचना न देता धावपट्टीवर आले आणि त्याने टेक ऑफ केले. गंमत म्हणजे या घटनेला आज १८ वर्षे पूर्ण होऊन गेली तरी हे विमान कुठे गायब झाले, हे विमान चालवणारे कुठे गायब झाले याचा काहीही पत्ता लागलेला नाही. ९/११ची घटना ताजी असतानाच हे विमान चोरीला गेल्याने अमेरिकन तपास यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यांनी अत्यंत कसोशीने या बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण FBI आणि CIA सारख्या संस्थांनाही याचा थांगपत्ता लागला नाही. बेपत्ता झालेले हे विमान अखेर कुठे गेले असेल. आकाशाच्या पलीकडे की, जमिनीच्या पोटात? कारण धावपट्टीवरून आकाशात झेपावलेल्या विमानाबाबत दोनच गोष्टी होऊ शकतात, एक म्हणजे ते विमान दुसऱ्या कुठल्यातरी धावपट्टीवर उतरणार किंवा आकाशातच ते क्रॅश होणार.

या विमानाचे नेमके काय झाले असेल याचा तपास घेताना तीन कयास बांधण्यात आले. पहिला म्हणजे हे विमान ज्या ऐअरलाइन्सच्या मालकीचे होते त्यांनी इंश्युरन्सचे पैसे मिळवण्यासाठी ते विमान चोरीला गेल्याचा बनाव रचला असेल. पण पुढे हा तर्कही गळून पडला. कारण जर त्यांनी इंश्युरन्सचे पैसे हडपण्यासाठी हा बनाव रचला असता तर विमानाचे तुटके-फुटले पार्ट दाखवल्याशिवाय तर कोणतीही इंश्युरन्स कंपनी त्यांना रक्कम देणार नव्हती. मग त्यांनी जरी बनाव केला असता तरी त्यांना ते विमान अपघातग्रस्त झाल्याचे दाखवून त्याचे मोडके पार्ट्स इंश्युरन्सचे कंपनीसमोर सादर केले असते. पण या विमानच्या बाबतीत तसे काहीच घडलेले नाही. कारण विमानाचे अवशेष सोडा, त्याचा एकदेखील पार्ट कुठे आढळून आलेला नाही.

दुसरी शक्यता म्हणजे हे विमान अपघातग्रस्त झाले असेल किंवा पुढे जाऊन समुद्रात कोसळले असेल. असे असते तरी किमान विमानाचा सांगाडा किंवा ते चालवणाऱ्या पायलटचा मृतदेह वगैरे तरी हाती लागला असता. पण इथे तसेही काही झालेले नाही. त्या विमानात पायलट बेन पॅडिला (ज्याच्याकडे मुळात 727 बोईंग चालवण्याचा परवानाही नव्हता, तो फक्त एक साधारण पायलट होता) आणि त्याचा एक साथीदार जॉन म्युटांटू (जो विमान दुरुस्तीचे काम करत होता) हे दोघेच होते. आश्चर्याची बाब म्हणजे गेली अठरा वर्षे झाली विमानासोबतच हे दोघेही बेपत्ता आहेत. त्यांच काय झालं किंवा ते आता कुठे आहेत याचाही काही मागमूस नाही.

बेन पेडीला हा एक फ्लाईट इंजिनियर, एअरक्राफ्ट मेकॅनिक आणि प्रायव्हेट पायलट होता. त्याला त्या विमान कंपनीच्या मालकाने फक्त बोईंग विमानाची दुरुस्ती करण्यासाठी नेमले होते आणि त्याला एक मदतनीस म्हणून त्याच्यासोबत जॉन म्युटांटू हा सहाय्यक दिला होता. २५ मे २००३ च्या त्या दिवशी हे दोघेही विमानात चढले असल्याचे अनेक जण सांगतात, पण विमान कुणी चालवले आणि कुणी पळवले हे मात्र कुणीच सांगू शकत नाही.

आता ते इंश्युरन्सच्या पैशांसाठी पळवले गेले, की स्वतःच्या फायद्यासाठी पळवले गेले, की दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले हे अजूनही एक गूढच आहे. काही जणांच्या मते बेन पॅडिलाने ते विमान कुठल्या तरी धावपट्टीवर उतरवून त्याचे पार्ट्स विकले असतील असाही काहींनी कयास बांधला. पण किमान ते पार्ट्स तरी कुठे आढळायला हवे होते किंवा बेन तरी कुठे तरी आढळायला हवा होता. पण या दोन्हीपैकी काहीही घडलेले नाही. पॅडिलाची एक बहिण आहे, बेनिटा पॅडिला-किर्कलँड. बेनिटा गेली अठरा वर्षे आपल्या भावाचा शोध घेत आहे. पण तो कुठे आहे? कसा आहे? याचा अजूनही तिला पत्ता लागलेला नाही.

कोणत्याच पद्धतीने विमानाचा काहीच तपास लागत नसल्याने शेवटी सीआयए आणि एफबीआयने ही केस अनसॉर्टिफाइड असा शिक्का मारून बंद केली.

तर ही आहे 727--223 विमान गायब होण्याची कथा. तुम्हाला काय वाटते या विमानाचे नेमके काय झाले असेल?

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required