computer

म्हणून कोणीही न गेलेल्या चंद्राच्या दक्षिण भागात भारताने यान पाठवलं आहे...

काल महत्वाच्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण झाले. हे प्रक्षेपण अनेक कारणांसाठी महत्वाचे होते. जेव्हा पहिली चांद्रयान मोहीम आखण्यात आली होती तेव्हा त्यातून चंद्रावर पाण्याचे अवशेष शोधण्यात आले होते. त्या दृष्टीने चंद्राचा आणखी अभ्यास करण्यासाठी ही दुसरी मोहीम महत्वाची होती.

चांद्रयान-२ मोहिमेने भारताच्या अवकाश तंत्रज्ञानात मोलाची भर तर घातली आहेच, पण इस्रोच्या नावे एक जागतिक विक्रम देखील केलाय. यावेळची चांद्रयान मोहीम ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या दिशेने आखण्यात आली आहे. चंद्राच्या या भागात आजवर कोणत्याही देशाने आपलं यान पाठवलं नव्हतं.

इस्रोने चंद्राच्या दक्षिण भागातच आपलं यान का पाठवलं ? चला तर या मागची कारणं जाणून घेऊया.

मंडळी, चांद्रयान मोहिम म्हणजे अवकाशातल्या लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी रंगीत तालीम ठरते. इस्रोने चंद्राच्या अभ्यासासोबतच अंतराळाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने चांद्रयान मोहीम आखली आहे.

आता वळूया आपल्या उत्तराकडे. इस्रोच्या मते चंद्राचा दक्षिण गोलार्ध उत्तर गोलार्धाच्या तुलनेने जास्त काळ सावलीत राहतो. या कारणाने दक्षिण ध्रुवावर पाण्याचे अवशेष मिळण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे चांद्रयानच्या पहिल्या मोहिमेतच पाण्याचे अवशेष सापडले होते, पण या दुसऱ्या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर, तसेच आत पाणी किती प्रमाणात आहे हे तपासण्यात येईल. याच्या आधारे चंद्रावर पाणी कसे निर्माण झाले याचं उत्तर शोधलं जाणार आहे.

दक्षिण ध्रुवावर भागात क्रेटर्स म्हणजे विवर(मोठे खड्डे) आहेत. या क्रेटर्समध्ये जीवाश्म सापडण्याची शक्यता आहे. या जीवाश्माच्या आधारे चंद्र आणि पृथ्वीची निर्मिती तसेच आपल्या सूर्यमालेच्या अभ्यासात मोलाची भर पडणार आहे.

तर मंडळी, इस्रोने अशा अनेक गोष्टी डोळ्यांसमोर ठेवून चांद्रयान मोहीम आखली आहे. या मोहिमेच्या यशाने येणाऱ्या पिढ्यांना आपल्या नैसर्गिक उपग्रहाचा आणखी चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल.

सबस्क्राईब करा

* indicates required