निसर्गात निळा रंग बनतच नाही? मग आपण पाहातो ते काय?

विज्ञानाचं म्हणणं आहे की निसर्गात निळा रंग दुर्मिळ आहे. थोडा विचार करून पाहा.. हे खरं आहे का? निळ्या रंगाची फुलपाखरं अस्तित्वात आहेत, निळ्या रंगातले पक्षी पण असतात, फक्त नावापुरता असला तरी ब्ल्यू व्हेल नावाचा मासाही असतो, निळी फुलं असतात, एवढंच काय निळे डोळेही असतात..
पण मग एवढं सगळं असूनही निसर्गात निळा रंग दुर्मिळ आहे, हे खरं आहे का? उत्तर फार सोप्पं आहे...
मंडळी, तुम्हाला वाचून धक्का बसेल. पण निसर्गात निळा रंग तयार होत नाही. सर्वसाधारणपणे प्राणी जे खातात तोच त्यांच्या शरीराचा रंग बनतो. उदाहरणार्थ, फ्लेमिंगो हे जन्मतः राखाडी रंगाचे असतात. पण त्यांच्या अन्नातल्या निळ्या-हिरव्या शेवाळामुळे आणि विशिष्ट जातीच्या कोळंबीमुळे त्यांना गुलाबी रंग मिळतो. रावस माशाचंही तेच आहे. रावस मासे गुलाबी शेलफिश खातात आणि त्यातून त्यांना त्यांचा प्रसिद्ध गुलाबी रंग मिळतो.
आता वळूया आपल्या निळ्या रंगाकडे. निसर्गात दिसणारा बहुतांश निळा रंग हा त्या-त्या प्राण्याच्या शरीरातल्या अणूंच्या विशिष्ट संरचनेचा भाग असतो. हे फारच कठीण झालं. थोडं सोप्पं करूया. उदाहरणार्थ निळ्या रंगाचे ‘ब्लू मॉर्फो’ फुलपाखरू घ्या. या फुलपाखरांच्या पंखांची रचना अशा प्रकारची असते की त्यावर पडणारा प्रकाश एका विशिष्ट पद्धतीने परावर्तीत होतो आणि आपल्या डोळ्यांना निळा रंग दिसतो. प्रकाशाची दिशा योग्य नसेल तर हा रंग दिसणारच नाही. म्हणजे खरं तर तिथे निळा रंग असा काही प्रकारच नसतो.

आता निळ्या रंगाच्या पक्ष्याचं उदाहरण घेऊ. ‘ब्ल्यू जाय’ नावाचा एक निळ्या रंगाचा सुंदर पक्षी आहे. पाहाताच त्याच्या प्रेमात पडावं असाच त्याचा रंग आहे. या ब्ल्यू जायच्या पंखांवर मण्यांसारखे सूक्ष्म घटक असतात. हे घटक प्रकाशातला निळा रंग सोडून बाकी सगळे रंग नष्ट करतात. आपल्या मोराचा पिसाराहीसुद्धा अशाच कारणानं निळा दिसतो. माणसाच्या शरीरात तसा डोळे सोडून इतर कुठे निळा रंग नसतो. जर एखाद्या माणसाचे डोळे निळे असतील तर खरंतर तर तो रंग नसतो, त्या माणसाच्या डोळ्यांमधली रचना अशी असते की आपल्याला ते डोळे निळे दिसतात.

निसर्गात केवळ ‘obrina olivewing’ या जातीची फुलपाखरेच फक्त निळा रंग तयार करतात. हे पाहा ते फुलपाखरु..

निळ्या फुलांचं काय?

फुलांतसुद्धा निळा रंग तयार होत नाही. जी फुले निळी असतात, त्यांना त्यांचा रंग एंथोसायनिन या लाल रंगद्रव्यातून मिळतो. निळा रंग मिळवण्यासाठी लाल रंग? हो मंडळी!! एंथोसायनिन सोबत इतर रंगद्रव्यांचं मिश्रण, शरीरातल्या आम्लता-क्षाराचं प्रमाण आणि प्रकाशाच्या परावर्तनातून हा निळा रंग तयार होतो. २,८०,००० जातीच्या फुलांपैकी केवळ १० टक्क्यांपेक्षा कमी फुलांमध्ये असा हटके ‘केमिकल लोचा’ आढळतो. यावर अजूनही वैज्ञानिक संशोधन करतायत.
निसर्गात ‘निळा रंग’ रंग नसून संरचनेचा भाग का आहे ?

निसर्गाच्या उत्क्रांतीत निळा रंग हा संरक्षण आणि संपर्काच्या हेतूने निर्माण झालाय असं मानलं जातं. या दोन मुलभूत गरजांपोटी काही ठराविकच जीवांच्या शरीर रचनेत बदल झाले आहेत. त्यांना शरीराचा रंग न बदलताही निळा रंग तयार करता येतो.
तर मंडळी, निळा रंग निसर्गात दुर्मिळ का आहे याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालं असणार!!! तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या !!