computer

रेफ्रिजरेटरच्या डीप फ्रीजरमध्ये लाईट का नसते? कारण तर जाणून घ्या!!

फ्रीज हा आधुनिक स्वयंपाकघरात एक अविभाज्य घटक बनला आहे. म्हणजे इंटेरियर करतानाही फ्रिजची जागा ठरवली जाते. गेल्या वीस वर्षांत फ्रिज घरोघरी पोहोचला. पूर्वी फक्त एक चंगळ किंवा उन्हाळ्यात वापरली जाणारी वस्तू म्हणून फ्रिजची ओळख होती. पण हळूहळू साठवणूक वाढली, नवनवीन अन्नपदार्थ शिजवले जाऊ लागले. तसेच जाहिरातींमधून देखील फ्रिजचे महत्व किती आहे हे बिंबवले गेले. तर असे हे शीतकपाट घरोघरी आले.

आधी सिंगल डोअर फ्रिज, मग डबल डोअर आले. आतातर मल्टी डोअर किंवा साईड बाय साईड म्हणजे एखाद्या कपाटावढे फ्रिज आले आहेत. या सर्वांमध्ये तुम्ही नवनव्या टेक्नॉलॉजी पाहिल्या असतील. पण एक गोष्ट लक्षात आली का? तुम्ही कधी फ्रिजरमध्ये लाईट पाहिलीय?

असे का असेल बरं? इतका मोठा फ्रिज, त्याची अव्वाच्या सव्वा किंमत, फ्रीजमध्ये एक पिवळा दिवा आणि फ्रिजरमध्ये चक्क अंधार! कंपन्या इतका काही चिक्कूपणा करायच्या नाहीत. मग असं करण्यामागचं कारण काय असेल बरं? आज याची माहिती आपण घेऊयात.

एका सर्वेक्षणानुसार ग्राहकांनाच फ्रिजरमध्ये लाईट नाही हे खटकत नाही. कितीही आधुनिक तंत्रज्ञान असलेला फ्रिज घेतला तरीही फ्रीझर लाइट्स जास्त महत्वाचे वाटत नाहीत. ते याची कधीही चौकशी करत नाही. याचे कारण समजण्यासाठी एक अभ्यास घेण्यात आला तेव्हा जास्तीत जास्त ग्राहकांनी हे सांगितले की आम्ही आमचे फ्रीज जितक्यावेळा उघडतो, तितक्या वेळा आम्ही फ्रीझर उघडला जात नाही. त्यामुळे आम्हाला फरक पडत नाही. तसेच फ्रीझर लहान असल्याने त्यात अनेक गोष्टी ठेवायची गरज नसते, त्यामुळे ते दार जास्त वेळ उघडे ठेवले जात नाही.

फ्रिजर लाईट न देण्याचे शास्त्रीय कारण असे आहे की जेव्हा डिफ्रॉस्टिंग होते तेव्हा लाइटमुळे अडथळा येतो. त्यामुळे सेल्फ डिफ्रॉस्टिंग हे तंत्रज्ञान नसण्याच्या काळात फ्रिजरमध्ये लाईट लावले जात नसत. जेव्हा ऑटो डिफ्रॉस्टिंग हा प्रकार आला तोपर्यंत सर्व ग्राहकांना फ्रिजरमध्ये दिवे नसण्याची सवय झाली होती. त्यामुळे कंपन्यांनीसुद्धा फारसा बदल त्यामध्ये केला नाही.

त्यामळे आता जरी एखादी कंपनी आणि त्यांचा नवा फ्रिज "आमच्या फ्रिझरमध्ये लाईट आहे" अशी जाहिरात करत आला आणि त्यासाठी किंमत वाढवून सांगितली, तरी ग्राहक आकर्षित होतील की नाही यात शंकाच आहे.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required