computer

पक्षी का गातात ? पक्षांच्या गाण्यामागचं विज्ञान तुम्हाला नक्कीच माहित नसेल !!

निसर्गाला सुंदर बनवण्यामागे पक्षांच्या आवाजाचं फार मोठं योगदान आहे. माणसाला वन्य भागात जायला आवडतं त्यामागे हे एक प्रमुख कारण म्हणावं लागेल. जंगलात गेल्यावर डोळे मिटले की कितीतरी पक्षांचे वेगवेगळे आवाज ऐकू येतात. आपल्याकडे साधारणपाने चिमणी, कोकीळ, खंड्या, सुतार, सुगरण असे पक्षी आढळतात. या प्रत्येकाकडे एक विशिष्ट आवाज आहे. हल्लीच्या शहरीकरणामुळे पक्षी नाहीसे होत आहेत ही एक चिंतेची बाब आहे.

तर, आपण वर्षानुवर्ष पक्षांचे आवाज ऐकत आलो आहोत, पण कधी विचार केला आहे का, “पक्षी का गातात ?”. या प्रश्नाचं नेमकं उत्तर फारच कमी लोकांना माहित आहे. चला तर आजच्या लेखातून पक्षांना समजून घेऊया.

मंडळी, आपल्याला पक्षांची भाषा समजत नाही. त्यासही निळावंती ग्रंथ वाचा असं लोक सुचवतात पण त्याची एवढी दहशत आहे की त्याच्या वाट्याला कोणी जात नाही. त्यामुळे आपल्या अल्पज्ञानाप्रमाणे आपण पक्षांच्या आवाजांना पक्षांची गाणी म्हणतो. खरं तर त्या मागची कारणे फारच वेगवेगळी आहेत.

पहिलं कारण म्हणजे नर पक्षी आपल्या आवाजातून इशारा देत असतात, त्यांना हे सुचवायचं असतं की “हा माझा एरिया आहे, इथे येऊ नका.” बरेचदा पक्षी आपल्या जागेच्या मधोमध किंवा सीमेवर जाऊन गातात. त्यांना जागा निश्तिच करायची असते. खासकरून स्वतःच्याच प्रजातीतील पक्षांना ते इशारा देत असतात.

दुसरं कारण आहे जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी. नराची निवड करताना मादी दोन गोष्टींचा विचार करते - नर कसा दिसतो आणि त्याचा आवाज कसा आहे. जर आवाज चांगला नसेल तर बऱ्याच नरांना विणीच्या हंगामात पण मादी भेटत नाही. अभ्यासात असं दिसून आलं आहे की पक्षी विणीच्या हंगामात जास्त गातात. कोकीळ एका विशिष्ट काळातच गाताना आपण ऐकलंच असेल.

प्रत्येक प्रजातीतील पक्षाला वेगळा असतो, याचा फायदा त्यांना आपले भाईबंद ओळखण्यासाठी होतो. जे पक्षी स्थलांतर करतात त्यांना प्रवासादरम्यान इतरांशी संपर्कात राहण्यासाठी आवाजाचा फायदा होतो.

पक्षांमध्ये जास्तीत नर पक्षांना आवाज असतो, पण जगात अशा काही पक्षांच्या जाती आहेत ज्यांच्यात नर आणि मादी दोघेही गातात. आवाजच नसलेले पक्षी असाही एक अपवाद आढळतो. करकोच आणि गिधाडे हे याचं सर्वात चांगलं उदाहरण. गिधाडे काहीवेळा अन्न खाताना एक विशिष्ट आवाज काढतात.

मंडळी, जाता जाता एक गम्मत बघूया. https://coneixelriu.museudelter.cat/ocells.php या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला समोर पक्षी दिसतील. कोणत्याही पक्षावर क्लिक केल्यास त्याचा आवाज ऐकू येतो. किती पक्षी ओळखू येतात पाहा बरं.