computer

२००७ ते २०१९ पर्यंत सापडलेल्या २१ तुटक्या पावलांचं आजवर न उकललेलं मृत्यूंचं गूढ!!

ती तरुणी जिथे उभी होती, त्याच्या बरोब्बर विरुद्ध दिशेला सूर्य उगवला होता, पण इमारती आणि झाडांच्या मागे लपल्यामुळे फक्त त्याचा प्रकाश इथपर्यंत येत होता. तारीख होती २० ऑगस्ट २००७. ब्रिटिश कोलंबियातील जेडेडिया बेटावरील सॅलिश समुद्राच्या किनार्‍यावर सकाळचे सहा वाजले असावेत. जोराचा वारा सुटल्यामुळे आपले उडणारे केस सारखे करत ती तरुणी माॅर्निंग वाॅक घेत होती. सॅलिश समुद्राच्या किनार्‍यावर ती तरुणी दररोज फेरफटका मारायला येत असे. समुद्राला ओहोटी असल्यामुळे दूरपर्यंत समुद्राच्या लाटांचा आवाज येत नव्हता, आणि वातावरणात एक प्रकारची शांतता होती.

काही तुरळक सीगल पक्षी सोडले, तर आकाशात फारशी हालचाल दिसत नव्हती. सीगल पक्ष्यांची खासियत म्हणजे ते इतर अनेक पक्ष्यांप्रमाणे स्वतः भक्ष्य पकडत नाहीत, तर तयार भक्ष्याचा शोध घेतात, ज्याला इंग्रजीत स्कॅव्हेंजर म्हणतात. त्यामुळे सीगल पक्षी सहसा खोल पाण्यात डुबकी मारून मासे पकडताना दिसत नाहीत; फारफार तर ते वरच्यावर दिसणारे मासे टिपतात. त्यादिवशीही काही सीगल तिच्या डोक्यावरून उडत भक्ष्याचा शोध घेत होते.

अचानक त्या तरुणीचं लक्ष तिच्यापासून जवळच चाललेल्या हालचालीकडे वेधलं गेलं. दोन सीगल पक्षी कोणत्यातरी वस्तूशी झटापट करताना तिला दिसले. काही क्षण स्तब्ध उभं रहात ती त्यांची हालचाल न्याहाळत होती. लांबून तिला ती वस्तू ब्रेडच्या लादीसारखी दिसत होती, पण एका क्षणी मात्र तो स्नीकर, म्हणजे बूट होता हे तिने ओळखलं. तिने आणखी जवळ जाऊन पाहिलं, तेव्हा तिला धक्काच बसला. त्या बुटात माणसाचं तुटलेलं पाऊल होतं. प्रचंड घाबरल्यामुळे त्या तरुणीच्या तोंडून शब्द फुटेना. ती जी धावत सुटली ती घर आल्यावरच थांबली.

त्या दिवसापासून ब्रिटिश कोलंबिया, अमेरिका, येथील सॅलिश समुद्राच्या किनार्‍यावर पायापासून वेगळी झालेली कमीतकमी २० पावलं सापडली होती.

कॅनडामधील काॅरोनर म्हणजे अनैसर्गिक मृत्यूचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने डिसेंबर २०१७ मध्ये सांगितले की सर्व तपास अधिकाऱ्यांनी ह्या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे काळेबेरे असण्याची शक्यता नाकारली होती. सापडलेली पावलं अपघातात सापडलेल्या किंवा आत्महत्या केल्यामुळे मरण पावलेल्या लोकांची आहेत आणि माणूस मरण पावल्यावर त्याच्या शरीरात जी सामान्य विघटन प्रक्रिया घडते, त्यामुळे पाय आणि पावलं वेगळे झाले आहेत असा त्यांचा निष्कर्ष होता. मृत माणसाने स्नीकर्स/बूट घातल्यामुळे त्याची पावलं सुस्थितीत होती, असे काॅरोनरचे मत होते. तरीदेखील तो निष्कर्ष अंतिम असू शकत नाही हे अनेकांचं मत होतं. कदाचित त्यामुळेच या प्रकरणावर लवकर पडदा पडेल असं वाटत नव्हतं.

२००७ ते २०१८ दरम्यान कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतात १५ पावलं आणि अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यात ५ पावलं आढळून आली. सापडलेल्या पावलांमध्ये काही एकाच व्यक्तीची होती. ब्रिटिश कोलंबियामध्ये १५ पैकी १३ पावलांची ओळख डीएनए विश्लेषणाद्वारे पटली होती. अमेरिकेमध्ये सापडलेली दोन पावलं पुलावरून उडी मारलेल्या महिलेची होती, तर इतर दोन पावलांपैकी एक पाऊल हरवलेल्या एका मच्छिमाराचे होतं आणि दुसरं पाऊल निराश झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या माणसाचं होतं. त्याच्या कुटुंबीयांच्या विनंतीवरून त्याची ओळख गुप्त ठेवण्यात आली होती.

मग मात्र या घटनांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली. मेलबर्न हेराल्ड सन, द गार्डियन आणि दक्षिण आफ्रिकेतील केप टाईम्स यांसारख्या वृत्तपत्रांच्या हेडलाईन्स बघितल्या तर लक्षात येईल की ह्या घटनेकडे मिडिया पुरेशा गांभीर्याने पहात होती. वाईट बातमी पसरायला वेळ लागत नाही, त्यामुळे सर्वसाधारण जनतेला देखील या प्रकरणी भीतीपूर्ण उत्सुकता वाटू लागली होती. काही समाजकंटक मात्र लगेच कामाला लागले. १८ जून २००८ रोजी व्हँकुव्हर बेटावरील कॅम्पबेल नदीजवळ आणखी एक मानवी पाऊल सापडले, पण रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी तपास केल्यावर ते पाऊल कोणत्यातरी प्राण्याचे होते, आणि पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी समाजकंटकांनी ठेवले होते असं समजलं.

मानवी पायाचा घोटा तुलनेने कमकुवत असल्यामुळे पायापासून वेगळा होऊ शकतो. सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ गेल अँडरसन यांच्या मते हात, पाय आणि डोके शरीरापासून अनेकदा विलग होतात कारण शरीर पाण्यात विघटित होते, परंतु क्वचितच तरंगते.

तरीदेखील मृतदेहाचे फक्त पाऊल सापडतं, पण मृतदेह मात्र सापडत नाही, ह्यावर विश्वास ठेवणं कठीण. बरं एखाद्या जागी एक पाऊल सापडल्यावर त्या व्यक्तीचं दुसरं पाऊल भलतीकडेच सापडत असे, हे कसं काय? एका पोलिस अधिकाऱ्याने स्वतः त्याला "विसंगती" म्हणून संबोधले आहे. तपास अधिकाऱ्यांनी ह्या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे काळेबेरे असण्याची शक्यता नाकारली, तरी सर्वसामान्य जनतेचा त्यावर विश्वास बसणं अशक्य होतं.

या प्रकरणात एखादा 'सिरियल किलर' असू शकतो कां? की तपास अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सापडलेली पावलं अपघातग्रस्त किंवा आत्महत्या केलेल्या व्यक्तींची असावीत? या प्रकरणात अनेक प्रकारच्या शक्यता वर्तविण्यात आल्या आहेत, परंतु कोणताही ठाम निष्कर्ष अजूनपर्यंत तरी निघालेला नाही.

लेखकःचंद्रशेखर अनंत मराठे

सबस्क्राईब करा

* indicates required