computer

फोनचे स्फोट का होतात आणि ते कसे टाळावेत हे जाणून घ्या..

'मोबाईल फोनचा स्फोट' या अश्या बातम्या आपण अनेकदा ऐकत असतो. यात अनेकजण जखमीही झाले आहेत. खिशात फोन ठेवणे हे काही दिखावा म्हणून नाही तर अत्यंत गरजेची गोष्ट झाली आहे. नुकतीच OnePlus Nord 2 मोबाईलच्या स्फोटाची बातमी तुम्ही ऐकली असेल. काल १२ वर्षांच्या मुलाच्या शरीराला मोबाईल स्फोटामुळे मोठी इजा झाल्याची बातमी होती. या अशा वाढत्या घटनांमुळे आपला फोन सुरक्षित आहे की नाही हे कळतच नाही. म्हणून आज आपण समजून घेऊयात की फोनचा स्फोट का होतो? आणि तो रोखण्यासाठी आपण काय करू शकतो?

स्मार्टफोन का फुटतात?

मुख्यतः मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट, प्रोसेसर ओव्हरलोडिंग आणि थर्ड-पार्टी चार्जर वापरणे यासारख्या कारणांमुळे स्मार्टफोनला आग लागू शकते. मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असेल तर कंपनी बऱ्याचदा फोन परत मागवून घेते. अनेक घटना घडल्यास कंपनी तसा निर्णय घेते.

फोनमध्ये वापरण्यात येणाऱ्या बॅटरीमुळे देखील स्फोट होऊ शकतात. बॅटरीचे पडून काही नुकसान झाल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकते. नुकत्याच झालेल्या Nord 2 स्फोटात OnePlus ने तपासणी केली होती. तेव्हा बॅटरीला बाह्य नुकसान झाल्यामुळे फोनचा स्फोट झाल्याचे आढळले होते.

खूप जणांना फोन तासनतास चार्जिंगला लावायची सवय असते, पण जास्त उष्णता आणि जास्त चार्जिंगमुळे सुद्धा बॅटरीचे नुकसान होऊन स्फोट होऊ शकतो. तसेच बॅटरीला पाणी किंवा ओलावा आल्यामुळेसुद्धा फोनला नुकसान होते.

फोनमध्ये वापरल्या जाणार्‍या लिथियम-आयन बॅटरीच्या सेलमध्ये एक तपमान ठरलेले असते. म्हणजे जसे पाणी एका ठराविक तापमान ओलांडले की उकळायला लागते तसेच या बॅटरीचे जेव्हा तापमान ओलांडले जाते, तेव्हा exothermic breakdown होते. Thermal runaway मुळे जास्त उष्णता सोडली जाते आणि फोन कालांतराने खराब होतो. कधी आग लागते किंवा काही प्रकरणांमध्ये स्फोटही होतो. त्यामुळे जास्त वेळ चार्जिंगला फोन लावणे किंवा जास्त उष्णतेत फोन ठेऊ नये.

फोनचा स्फोट रोखण्यासाठी काय करावे?

तुमचा फोन स्फोट होण्यापासून रोखण्याचे असे अनेक मार्ग आहेत.

डिव्हाइस खाली पडणार नाही याची काळजी घ्या. अति तापमान आणि थेट सूर्यप्रकाश टाळा. Original चार्जर वापरा. तो खराब झाल्यास बाजारातून त्याच कंपनीचा चार्जर विकत घेणे योग्य असते. बॅटरीशी छेडछाड करू नका. फोन ज्वलनशील वस्तूंपासून दूर ठेवावा.

महत्वाचे म्हणजे सावध रहा. फोन वापरताना कुठलीही शंका आल्यास दुर्लक्ष न करता सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तपासून घ्या. तुमच्या स्मार्टफोनमधून प्लास्टिक जळत असल्याचा वास येत असेल किंवा तुम्हाला चार्जिंगच्या वेळी विचित्र आवाज येत असतील किंवा फोन अतिगरम होत असल्याचे जाणवत असेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे असे समजावे.

बॅटरी किंवा बॅक पॅनल फुगलेले दिसत असेल, तर फोन चार्ज न करता सर्व्हिस सेंटरमध्ये नेऊन तपासून घ्या.

फोन स्फोटांमुळे अनेक दुर्घटना घटना घडल्या आहेत. Galaxy A21 ला आग लागल्यानंतर अलास्का एअरलाइन्सचे विमान रिकामे करण्यात आले होते. २०२१ मध्ये, चार OnePlus Nord 2 स्फोटांची नोंद झाली आहे. फोनमधून अचानक स्पार्क झाल्याने आग लागल्याने एका भारतीय युवकाचा मृत्यू झाला होता. अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात. त्यासाठी सजग राहून काळजी घ्या.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required