computer

ब्रेकअप झाल्यावर लोक sad songs का ऐकतात ?? हे आहे त्या मागचं कारण !!

मंडळी, गाणी डाऊनलोड करण्यासाठी कोणत्याही गाण्याच्या साईट्सवर जा, तुम्हाला वेगवेगळे सेक्शन पाहायला मिळतात. जेव्हा गाणी डाउनलोड करण्याची प्रथा नवी होती त्याकाळी गाण्याच्या साईट्सवर sad songs नावाचा वेगळा सेक्शन असायचा. या सेक्शनमध्ये त्याकाळी प्रसिद्ध असलेले झाडून सगळे गायक असायचे. अगदी मोहम्मद रफी, किशोर कुमार ते कुमार सानू, सोनू निगम, अल्ताफ राजा वगैरे सगळे गायक भरलेले असायचे. लोक पैसे देऊन ही गाणी मोबाईलमध्ये, सीडीवर भरून घ्यायचे.

काळाच्या ओघात तो sad songs चा सेक्शन निघून गेला, पण लोकांची sad songs ऐकण्याची सवय काही सुटलेली नाही. म्हणून तर अरिजित सिंगला लोकांनी डोक्यावर घेतलं आहे. फक्त ब्रेकअपच नाही,  तर काहीही दुःखद घडलं की जवळचे वाटतात ते sad songs.

कधी विचार केला आहे का उदास लोकांना उदास गाणीच का आवडतात ? आज या प्रश्नाचं उत्तर आपण वैज्ञानिक दृष्टीकोनातून घेणार आहोत.

विज्ञान म्हणतं की नैराश्याच्या स्थितीत लोकांना उदास, दर्दभरे गीत जवळचे वाटतात, कारण त्यांना या गाण्यांमुळे मोकळं होण्याची एक संधी मिळते. ज्या भावना ते प्रकट करू शकत नाहीत त्यांना वाट करून देण्याचं काम ही गाणी करत असतात. या गाण्यांमुळे त्यांना सगळं विसरून पुढे जाण्यास मदत मिळते. sad songs ऐकून रडणारी मंडळी तुम्हीही पाहिली असतीलच.

मंडळी, हे उत्तर बरोबर आहे, पण अपूर्ण आहे. कारण काही लोकांना “दुखभऱ्या” गाण्यातून येणारा अनुभव एन्जॉय करायचा असतो. अशा लोकांना त्या गाण्याबरोबर येणाऱ्या दुःखाचा अनुभव तर घ्यायचा असतो, पण त्यांना कुठेतरी हेही माहित असतं की या गाण्यामुळे आपल्या डोक्याला कायमचा शॉट लागणार नाही. उदाहरणच घ्या ना, ज्यांना आयुष्यात कधी प्रेम झालेलं नाही अशी मुलंही ‘चन्ना मेरेया’ ऐकून रडतात, पण दुसऱ्याच मिनिटाला त्यांचा मूड बदलेला असतो.

मंडळी, माणसाच्या याच स्वभावामुळे त्याला भयपट, रोलरकोस्टर राईड, बंजी जम्पिंग सारखे थ्रील आणणारे अनुभव आवडतात.

भावनिक आधारासाठी अशी गाणी किती उपयोगी पडतात ?

संवेदनशील लोकांना या गाण्यांचा उपयोग होतो. या संदर्भात २०१६ साली एक सर्व्हेक्षण करण्यात आलं होतं. १०२ लोकांना उदास गाणी ऐकवण्यात आली होती. ट्विस्ट असा होता की ही गाणी त्यांनी पूर्वी कधीच ऐकली नव्हती. या परीक्षणातून हे तपासायचं होतं की ज्या गाण्यांमध्ये इतरांची दुःखं आहेत अशा गाण्यांचा लोकांवर काय परिणाम होतो. शेवटी असं आढळून आलं की ज्यांना इतरांची दुःखं जाणून घेता येतात अशा लोकांच्या मनावर या गाण्यांनी परिणाम केला होता.

sad songs चे साईड इफेक्ट

मंडळी, प्रत्येक गोष्टीचे साईड इफेक्ट हे असतातच. sad songs चे पण साईड इफेक्ट आहेत. जे लोक निराश आहेत, पण डिप्रेशन सारख्या अवस्थेत गेलेले नाहीत अशा लोकांसाठीच sad songs फायदेशीर ठरू शकतात. डिप्रेशनमधून जाणारे किंवा डिप्रेशनवर उपचार घेणाऱ्या लोकांनी अशी गाणी ऐकल्यास उलट परिणाम झालेला दिसून येतो. या मागचं कारण असं की या गाण्यांमुळे डिप्रेस असलेली व्यक्ती आपलं दुःखं आणखीच कुरवाळत बसण्याची शक्यता असते. खरंतर डिप्रेशनमधल्या व्यक्तीला त्या अवस्थेतून लवकरात लवकर बाहेर पडण्याची गरज असते, पण उदास गाण्यांमुळे त्यांचं दु:ख कमी होण्याऐवजी वाढू शकतं. हां,  आता अपवाद असतात हेही मान्य करायलाच हवं.

तर मंडळी, एकंदरीत उदास गाण्यांनी आपलं मन हलकं होत असलं तरी वेळ आल्यावर जवळच्या माणसांशी आपलं दुःखं शेअर करणं कधीही चांगलंच.

आता एक नोस्टॅल्जिक प्रश्न.

कोणते sad songs तुम्हाला आजही आवडतात ? गाण्यांची यादी कमेंट बॉक्स मध्ये द्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required